Marathi Bible Reading | Tuesday 10th May 2022 |4th Week of the Easter |

पुनरुत्थान ४था   सप्ताह 

मंगळवार  १० मे  २०२२ 

“माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.


अविलाचा संत जॉन 
वार्तांसाक्षी (१४९९-१५६९)
 

 प्रभू येशू दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजावून सांगत आहे. प्रथम आपण देवावरील विश्वासात टिकून राहिले पाहिजे,  आणि दुसरे म्हणजे सतत त्याची वाणी ऐकली पाहिजे.. प्रभू येशू म्हणतो, 'माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात.' विश्वासात टिकून  राहण्यासाठी प्रभू येशूची वाणी ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. पवित्र बायबलमध्ये आपण प्रभूची वाणी ऐकू शकतो म्हणूनच परमेश्वराचा शब्द वाचून त्यावर मनन- चिंतन करून तो आत्मसात केला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने कृतिशील  बनून प्रभूला अनुसरू शकतो.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ११:१९-२६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“ते प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू

लागले. " स्तेफानवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, क्रुप्र आणि अंत्युखिया येथपर्यंत फिरून मात्र यहुद्यांना देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री आणि कुरेनेकर होते, ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान येरुशलेममधल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियापर्यंत पाठवले. तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. कारण तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलचा शोध करावयाला तार्सस येथे गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. मग त्यांनी तेथे वर्षभर मंडळींमध्ये मिळूनमिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८७:१-७
प्रतिसाद :   अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा!

१ पवित्र डोंगरावर प्रभूचे नगर उभारलेले आहे. 
याकोबच्या कुठल्याही नगरापेक्षा
 वेशीच्या आतले सियोन त्याला अधिक प्रिय आहे.
 देवाच्या नगरा, तुझ्या भावी ऐश्वर्याच्या गोष्टी 
सांगण्यात येत आहेत!

२ "माझ्या अंकितांमध्ये मी इजिप्त आणि 
बाबिलोन यांचा समावेश करीन. फिलिस्ती,
 टायर आणि इथिओपिया यांची 
जन्मभूमी हीच मानतील." 
सियोनविषयी म्हणतील की, 
हे लोक काय आणि ते काय ?
 साऱ्यांचा जन्म येथलाच!

३ परमपरात्पर देव स्वतः ते नगर उभारील. 
लोकांची नावनिशी करताना प्रभू लिहील : 
"अमुक इथे जन्मला होता, " गाणारे 
आणि नृत्य करणारे म्हणतील : 
"तूच आमचे सुखनिधान!"

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आम्हांला प्रकाशित केले आहे. त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १०:२२-३०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “मी आणि पिता एक आहो."

येरुशलेममध्ये मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शलमोनच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून विचारले, "तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार ? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हांला उघड सांगा." येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात, यहुदी लोकांच्या प्रश्नावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, तेअविश्वासी होते. होय, येशू कोण होता हे त्यांना माहित होते. परंतु त्यांचा येशूवर विश्वास नव्हता, म्हणजेच ते येशूच्या मेंढरांपैकी नव्हते. सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या काळात, अजूनही बरीच लोक अविश्वासी आहेत. होय, त्यांना येशूविषयी माहिती आहे. परंतु त्यांचे ज्ञान तेथेच संपते. त्यांना ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव आलेला नाही आणि त्याच्यावर त्यांचा दृढ विश्वास नाही. मग आपण यासाठी काय करू शकतो? आपल्या सर्वांसमोरील आव्हान खूपच सोपे आणि सरळ आहे. आपण येशूवर असलेला आपला विश्वास इतरांबरोबर वाटायला शिकायला पाहिजे. जेणेकरून जे विश्वास ठेवत नाहीत. ते आता विश्वास ठेवतील. त्यांचा विश्वास दृढ होईल आणि जे येशूला ओळखत नाहीत, त्यांना त्याची ओळख पटेल का? कारण आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगण्याचे धाडस केले पाहिजे. मी सुद्धा यहुद्यांसारखा अविश्वासू आहे का ? येशूवर असलेला माझा विश्वास इतरांबरोबर वाटायचा मी काय प्रयत्न करत आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला सर्वस्वी जाणण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे तुला अनुसरण्यास धैर्य व प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या