Marathi Bible Reading | Wednesday 11th May 2022 |4th Week of the Easter |

पुनरुत्थान ४था   सप्ताह 

बुधवार ११ मे  २०२२ 

“मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे."


लाकोनीचे संत इग्नेशिअस

- वर्तनसाक्षी (१७०१-१७८१)
 

परमेश्वर प्रेमळ व न्यायी आहे. देव न्यायी असल्यामुळे आपल्याला शिक्षा देऊ शकतो परंतु  आपल्यावरील प्रेमामुळेच त्याने आपल्या तारणाची योजना अमलात आणली.
 प्रभू येशू न्याय करण्यासाठी नव्हे तर  तारण करण्यासाठी आला. कोणीही अज्ञानाच्या अंधकारात राहू नये म्हणून प्रभू  येशू प्रकाश असा आला आहे. कोणीही पापाच्या व दुष्टतेच्या बंधनात असू नये| म्हणून प्रभू येशूने प्रेम, दया, क्षमा, शांती व सेवेचा महामंत्र सर्वांना दिला.  प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या दैवी दयेनुसार पापी शोमरोनी स्त्रीला , व्यभिचारी स्त्रीला, जकातदारांबरोबर भोजन घेतले. त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली. अशाप्रकारे प्रभू येशू न्याय करण्यासाठी नव्हे तर सर्वांना तारणप्राप्ति मिळवून देण्यासाठीच ह्या जगात आला.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १२:२४-१३:५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"बर्णबा आणि शौल ह्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. "

देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला. बर्णबा आणि शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानला बरोबर घेऊन यरुशलेमहून माघारे आले.
अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक कुरेनेकर, जो बालपणापासून हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे आणि शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, "बर्णवा आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा." तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
ह्याप्रकारे पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी देवाच्या वचनाची यहुद्यांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६७:२-३,५-६,८
प्रतिसाद :    हे देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत.

१) देवाने आमच्यावर दया करावी, 
आम्हाला आशीर्वाद द्यावा.
 त्याची तेजस्वी मुद्रा आमच्याकडे वळलेली असावी. 
मग साऱ्या विश्वाला तुझी इच्छा कळेल. 
तू देत असलेली मुक्ती सगळ्या राष्ट्रांना दिसेल.

२ )राष्ट्रांना आनंद होवो, ती आनंदाने गावोत.
 कारण तू लोकांना योग्य न्याय देशील. 
भूतलावरील राष्ट्रांना मार्गदर्शन करशील.

३) देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत. 
तुलाच सगळी राष्ट्रे धन्यवाद देवोत 
देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. 
पृथ्वीच्या पाठीवरचे सगळेजण त्याचे भय बाळगोत.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
प्रभू जो क्रुसावर आमच्याकरिता टांगलेला होता तो थडग्यात उठलेला आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १२:४४-५०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू जगात प्रकाश असा आला आहे."

येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंध:कारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे आणि जो माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो आणि माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जी वचने मी सांगितली, तीच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करतील. कारण मी आपल्या स्वतःचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. ह्यास्तव जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू त्याच्या पवित्र शब्दांचे आपण अनुसरण केले नाही तर त्याचा शब्द आणि आमची कृतीच आम्हाला दोषी ठरवेल याविषयी शिकवत आहे. जर आपण येशूचा शब्द ऐकला. परंतु त्याचे पालन केले नाही, उदाहरणार्थ आपल्या स्वतःच्या चुका लक्षात न घेता. आपल्या शेजाऱ्यांच्या चुका आपण दाखवून दिल्या तर येशू आपल्याला आता दोषी ठरवणार नाही. परंतु जे शब्द त्याने बोलले आहेत ते शब्द आपल्याला शेवटच्या दिवशी दोषी ठरवतील. येशू आमच्या स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी प्रथम मेहनत करण्यात सांगत आहे. म्हणून जर आपण येशूच्या शब्दांचे अनुसरण केले नाही तर त्याचा शब्द आणि आमची कृतीच आम्हाला दोषी ठरवेल. मी ख्रिस्ताचा शब्द ऐकून तो कृतीत उतरविण्यासाठी काय प्रयत्न करीत आहे? मी स्वतःच्या चुका लक्षात न घेता, माझ्या शेजाऱ्यांच्या चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करते / करतो का ? मी माझ्या स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी कोणती मेहनत घेत आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू करुणेचा व दयेचा महासागर आहेस. श्रद्धेने खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला आत्मिक बळ दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या