पुनरुत्थान ४था सप्ताह
गुरुवार १२ मे २०२२
"मी तुम्हांला सत्य सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही.
अगदी चौथ्या शतकापासून संत नेरियस, आखिलिस आणि डॉमिटिला ह्यांची भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे. एकदा त्यांच्या सणाच्या शुभप्रसंगी रोम शहरात संत ग्रेगरी महान ह्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले "ह्या जगातील सर्व प्रकारची सुखे आणि समृद्धी ह्या रक्तसाक्ष्यांच्या चरणाशी लोटांगण घालत होती. त्याचवेळी त्यांनी आपल्या सुखासीनतेवर लाथ मारली आणि सर्व उपभोग पायाखाली चिरडून टाकले." संत ग्रेगरी ज्या चर्चमध्ये हे प्रवचन देत होते ते चर्च ह्या संतांच्या थडग्यावर उभारण्यात आलेले होते आणि पोप झा नात्याने ते त्यांचे अठ्ठाविसावे प्रवचन होते.
नेरियस आणि आखिलियुस हे प्रेटोरियन सैनिक होते आणि फ्लेविया डॉमिटिला हिच्या घरी पंढ म्हणून काम करीत होते. ख्रिस्ती श्रद्धेसाठी जेव्हा डॉमिटिला हिला हद्दपार करण्यात आले होते तेव्हा या दोघांनी तिला पाठिंबा दिला. त्यामुळे टेरासिना बेटावर दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आणि ट्राजन सम्राटने मूर्तीपूजा करण्यास नकार देणाऱ्या डॉमिटिला हिला जिवंत जाळून टाकले.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:१३-२५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“दावीदच्या वंशजातून देवाने इस्त्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला."
पौल आणि त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून येरुशलेममध्ये परत गेला. नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखिया येथे पोहचले आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे आणि संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की, "बंधुजनहो, तुम्हांजवळ लोकांकरिता काही बोधवचन असले तर सांगा.' तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला :
"अहो इस्राएल लोकांनो आणि देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक इजिप्त देशात परके असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी बाहूने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून येथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली." त्यांनंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, “मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते ? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडायला मी पात्र नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-३,२१-२२,२५,२७
प्रतिसाद : प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना
तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन.
तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.
तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२) "माझा सेवक दावीद मला मिळाला आहे.
आणि पवित्र तेलाने मी त्याला राज्याभिषेक केला आहे.
त्याच्यावर माझा वरदहस्त राहील
आणि माझ्या हाताने मी त्याला समर्थ करीन.
३) मी त्याच्यावर प्रेम करीन, त्याच्याशी एकनिष्ठ राहीन.
माझ्या नाम सामर्थ्याने त्याचा उत्कर्ष होईल.
तो मला म्हणेल, तूच माझा पिता,
माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग व मुक्तिदाता आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता ख्रिस्त, मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १३:१६-२०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. "
येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यावर तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहित आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, तो मी. आहे. मी तुम्हांस ठामपणे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :दुसऱ्यांची सेवा करणे ह्यापेक्षा दुसरा कोणताही मोठा आशीर्वाद असूच शकत नाही. आजच्या शुभवर्तमानात, ख्रिस्त आपल्याला इतरांची सेवा करण्यास आमंत्रित करत आहे. इतरांचा सेवक होणे सोपे नाही. कारण त्यासाठी आपण नम्र असले पाहिजे. येशूसाठीसुद्धा हे सोपे नव्हते. परंतु त्याला आम्हावर प्रीती व आमची सेवा करण्याची एक प्रेरणा होती. सेवा करणे हा एक आशीर्वाद आहे आणि इतरांची सेवा करण्यासाठी, आपल्याकडे येशूसारखे प्रेमळ अंतःकरण असणे गरजेचे आहे. कारण प्रेमामुळेच हे जग बदलू शकते. जर आपणांस इतरांची सेवा करण्याची प्रेरणा असेल आणि आपल्याकडे प्रेम करण्याची देणगी असेल तर आपण ख्रिस्तासारखे ह्या जगातील प्रत्येक आत्म्याला जिंकू शकतो आणि त्याच्यासारखे नम्र, प्रेमळ सेवक नक्कीच बनू शकतो. येशूप्रमाणे इतरांवर प्रेम करणे व त्यांची सेवा करणे मला जमते का ? खिस्तासारखे प्रेमळ अंतःकरण माझ्याकडे आहे का? प्रेमामुळेच हे जग बदलू शकणार असेल तर मी काय पुढाकार घेणार आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला अंतःकरणापासून तुझे अनुकरण करण्यास प्रेरणा, धैर्य व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या