Marathi Bible Reading | Friday 13th May 2022 | 4th Week of the Easter |

पुनरुत्थान ४था   सप्ताह 

शुक्रवार १३ मे  २०२२

"देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा."

 


ख्रिस्तसभा आज फातिमा येथे दर्शन दिलेल्या मरिया मातेचा सन्मान  करीत आहे. १३ मे ते १३ ऑक्टोबर १९१७ साली सतत सहा वेळा फ्रान्सिस्को, जसिंटा व लुसी ह्या तीन मुलांना दर्शन देऊन पवित्र मरियेने पवित्र जपमाळेची प्रार्थना भक्तिभावाने करण्याचा संदेश दिला आहे. आपल्या जीवनात  पवित्र मरियेची भक्ती वाढावी आणि कौटुंबिक प्रार्थना व्हावी म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करु या.
फातिमा गावी पवित्र मरियेने काही भाकिते केली (ज्याला 'फातिमाची रहस्ये किंवा 'गुपिते' ह्या नावानेदेखील संबोधण्यात आले आहे). त्यापैकी पहिले भाकीत पवित्र मरियेने तिच्या तिसऱ्या दर्शनामध्ये १३ जुलै १९१७ साली केले. हे पहिले भाकीत/रहस्य नरकाविषयी होते. पवित्र मरियेने जेव्हा आपले दोन्ही हात उघडले, तेव्हा तिच्या हातांतून बाहेर पडलेल्या प्रकाशमय किरणांनी पृथ्वी दुभंगली आणि तिन्ही मुलांना आगीसारखासमुद्र दिसला, त्या आगीत भूते (demons) आणि मानवी आत्मे आक्रोश आणि वेदना ह्यांमध्ये बुडालेले होते. नरकाचा हा दृष्टांत पाहून मुले भयभीत झाली, परंतु पवित्र मरियेने त्यांना धीर देत म्हटले, "तुम्ही नरक पाहिला आहे जेथे पापी लोकांचे आत्मे जात आहेत. त्यांना वाचवण्यासाठी परमेश्वर माझ्या निष्कलंक हृदयाची भक्ती जगामध्ये प्रस्थापित करू इच्छितो. मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही केले तर अनेक जिवांचे रक्षण होईल आणि जगात शांती प्रस्थापित होईल.” पवित्र मरियेने मुलांना (म्हणजेच मुलांद्वारे संपूर्ण जगाला) दररोज रोझरी करण्याचे आणि पाप्यांच्या परिवर्तनासाठी स्वार्थत्याग करण्याचे आव्हान केले. १३ जून २०१७ च्या दर्शनामध्ये मुलांना - मरियेने जी प्रार्थना शिकवली होती ती परत १३ जुलै २०१७च्या दर्शनामध्ये त्यांना रोझरीच्या प्रत्येक रहस्यानंतर म्हणायला सांगितली : “हे माझ्या येशू, आमच्या पापांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना स्वर्गाकडे ने, विशेषकरून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे.”

प्रभू येशू आपल्या अस्वस्थ शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिष्यांना व आपल्या सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे. ‘विश्वास ठेवा’. देवावरील आणि प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवू शकतो,जो कोणी त्याच्यावर विश्वास | • ठेवून त्याला अनुसरतो त्याला जीवनाचे 'सत्य' कळते आणि आपण खऱ्या  अर्थाने प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार बनतो.
 
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:२६-३३
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“देवाने जे वचन दिले होते, ते येशूला मेलेल्यांतून उठविल्याने परिपूर्ण झाले. "
अत्युंखियातील सभास्थानात पौल म्हणाला, "अहो  बंधुजनहो, आब्राहामच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण येरुशलेमवासियांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशीवाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्याने ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातला विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेली सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरुन खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलीहून येरुशलेममध्ये आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते जे त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलांबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, 'तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे. !'
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २: ६-११
प्रतिसाद :   तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.

१) "सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर, 
मी माझा राजा प्रस्थापित केला आहे."
 प्रभूचे फर्मान मी जाहीर करीन. 
प्रभू मला म्हणाला, "तू माझा पुत्र आहेस. 
आज मी तुला जन्म दिला आहे."

२) "तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन, 
थेट सीमेपर्यंत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन. 
लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील,
 कुंभाराच्या मडक्यासारख्या त्यांच्या ठिकऱ्या उडवशील."

३) तेव्हा, अहो राजांनो, सुज्ञता बाळगा,
 पृथ्वीवरील सत्ताधिशांनो, बोध घ्या. 
प्रभूची आदरयुक्त भीती बाळगा. 
कंपित व्हा, त्याचे प्रभुत्व मान्य करा.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे.
हे आपणाला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १४:१-६
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे." थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार ?" येशूने त्याला म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :प्रभू येशूला माहित आहे की, आपण सर्वजण आपल्या जीवनात अनेक वेदना अनुभवत असतो. त्याला आमच्याबद्दल सहानुभूती आहे आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात तो आपल्याला धीर देत म्हणतो, “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका.” येशू उत्साहाने भरलेला आहे. आपल्या जीवनात बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडत असल्या तरीही तो आपल्याला वाळीत टाकत नाही. त्याला आपली काळजी आहे आणि त्यामुळेच आपण सर्वजण धन्य आहोत. कारण तोआम्हा सर्वांसाठी परत येणार आहे आणि आम्हाला तो त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. आमच्या दुःखांवर, संकटावर मात करण्यासाठी आणि सार्वकालिक शांती प्रदान करण्यासाठी. मला आज कशाची चिंता आहे? माझ्या अस्वस्थ अंतःकरणाला येशूच्या ह्या सांत्वनपर शब्दांद्वारे मलमपट्टीसारखा स्पर्श करू देण्यास मी तयार आहे का ?

प्रार्थना : हे पवित्र मरिया माते, देवप्रीतित वाढण्यास व श्रद्धापूर्ण जीवन जगण्यास  प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या