पुनरुत्थान ४था सप्ताह
शनिवार १४ मे २०२२
मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे,
संत मत्थियास
- प्रेषित आणि रक्तसाक्षी (पहिले शतक)
संत मत्थियास विषयीची माहिती आपल्याला प्रेषितांची कृत्ये अध्याय १ मध्ये वाचावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ज्युदासची जागा भरून काढण्यासाठी अकरा प्रेषितांनी चिठ्ठ्या टाकून निवड केली.
संत मत्थियास हा ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यापासून स्वर्गारोहणापर्यंतच्या सर्व घटनांचा साक्षीदार होता. एका ख्रिस्ती परंपरेनुसार संत मत्थियास ह्याने यहुदीया व इथिओपिया येथे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना क्रुसावरील मरण पत्करले. तर काहींच्या मते त्याचा येरुशलेममध्ये शिरच्छेद करण्यात आला.
संत मत्थियास हा शिंपी, सुतार आणि व्यसनमुक्त लोकांचा आश्रयदाता आहे. देवी रोगावर उपचार म्हणून त्याचा धावा केला जात होता.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१५-१७,२०,२६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मथियासची चिट्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा
प्रेषितांबरोबर गणण्यात आले."
पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये )
उभा राहून म्हणाला, "बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट
दाखवणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे
जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये
गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता.
स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे,
'त्याचे घर उजाड पडो,
आणि त्यात कोणीही न राहो' आणि
‘त्याचा हुद्दा दुसरा घेवो.'
म्हणून योहानच्या स्नानसंस्कारापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला
आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये
येत जात असे त्या सगळ्या काळात, ही जी माणसे आपल्या
संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या
पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते
तो बर्सबा म्हटलेला योसेफ आणि मथियास, ह्या दोघांना त्यांनी पुढे
आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली : "हे सर्वांची हृदये जाणणाऱ्या
प्रभू, हे सेवकपद आणि प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या
यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस
ते दाखव." मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्यावर मथियासची
चिट्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११३: १-८
प्रतिसाद : परमेश्वर गरिबांना आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. किंवा आलेलुया !
१) परमेश्वराचे स्तवन करा.
परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा,
परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा.
येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो.
२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे,
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी
राजासनारूड आहे, जो आकाश आणि
पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो,
त्याच्यासारखा कोण आहे ?
४ ) तो कंगालांना धुळीतून उठवतो,
गरिबांना उकिरड्यावरून उचलतो
आणि त्यांना अधिपतींच्या,
पंक्तीला बसवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला निवडले आणि
तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की,
तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १५:९-१७
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे, तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
“जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला जीवनात सखोल आनंद घेण्यासाठी आणि त्याच्या प्रीतीत राहण्यासाठी आमंत्रित करत आहे. त्याची इच्छा हीच आहे की, त्याच्या प्रत्येक अनुयायाने त्याने बहाल केलेल्या अपार आनंदात त्यांचे जीवन जगावे. ख्रिस्त स्वतः एक आनंदी जीवन जगला. परंतु त्याच्या ह्या आनंदी जीवनाची रेसीपी काय होती? प्रार्थना व एकांतवासाद्वारे त्याच्या स्वर्गीय पित्याबरोबर त्याचा संबंध दृढ करून तो परिपूर्ण जीवन जगला, त्याने नेहमीच जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीत देवाचे आभार मानले, आणि त्याच्या पित्याच्या इच्छेशी तो आज्ञाधारक राहिला. त्याने त्याच्या सर्व वैयक्तिक सुखसोयी व इच्छा आकांक्षेचा त्याग करून त्याच्या मिशनकार्याशी तो पूर्णपणे विश्वासू राहिला आणि सर्व प्रकारच्या वेदना सहन करून तो कुसावर मरण्यासही तयार झाला. खरा आनंद मिळविण्याची हीच रेसीपी येशू आपल्या हाती सोपवितो. यासाठी आपल्याला फक्त त्याच्या आज्ञा पाळून सदैव त्याच्या प्रीतीत राहायचे आहे. ख्रिस्ताचा आनंद मिळविण्यासाठी माझे काय प्रयत्न चालू आहेत? त्याने दिलेली आनंदी जीवनाची रेसीपी मला सोपी वाटते की कठीण ? त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहणे मला जमते का? ह्यावर विचार मंथन करू या.
प्रार्थना : हे प्रभू, तुझ्या मळ्यात सेवाकार्य करण्यास मला प्रेरणा दे, तुझ्या सुवार्ता प्रसाराचे मला साधन बनव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या