पुनरुत्थान ५ था रविवार
१५ मे २०२२
तुमचे एकमेकांवर प्रेम असले म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा."
“तुम्ही एकमेकांवर प्रिती करावी.”
संत पौल व बर्णबा ह्यांनी प्रभू येशूची सुवार्ता पसरवित असताना मंडळीना बोध करुन विश्वासात टिकून राहण्यास सांगितले. ख्रिस्त प्रेमाने झपाटलेल्या पौलाने सर्वत्र देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी अथक प्रयत्न केले. परमेश्वर सर्वांचे अश्रू पूसून नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीत असे. आजच्या दुसऱ्या वाचनात म्हटले आहे. परमेश्वराची वचने विश्वसनीय व सत्य असतात म्हणूनच पुनरुत्थित प्रभूचे दर्शन विश्वासणाऱ्यांना होत असते..
आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव प्रेमाचा वारसा घेतलेला आहे. हे प्रेम स्वतःपुरते व आपल्या स्वकीयांपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभू येशू आज आपल्याला आवाहन करीत आहे. प्रभू येशू म्हणत आहे की, 'जशी मी तुम्हावर प्रीति केली', म्हणजेच आपली प्रीति सर्वांचे हीत साधणारी असावी. आपल्या प्रीतिमध्ये स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वांबरोबर समेट, शांति व सलोखा असावा. आपण प्रभू येशूसारखे गरजवंत, गरीब, अनाथ व अपंगांच्या साहाय्याला धावून जावे. परस्पर प्रीति आचरणात आणण्यासाठी ख्रिस्तसभेने जाहीर केलेली दयाकृत्ये करण्यासाठी आपण उत्सुक बनले पाहिजे.”
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १४:२१-२७
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपण देवाच्या सहवासात असताना देवाने आपणाकरिता कायकाय केले हे त्यांनी सांगितले."
पौल आणि वर्णवा हे लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया ह्या नगरात परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडीलजन निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलिया येथे उतरले. तेथून ते अंत्युखियाला जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना काय काय केले आणि परराष्ट्रायांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४५: ८-१३
प्रतिसाद : हे राजा, माझ्या देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन.
१) परमेश्वर कृपाळू आणि कनवाळू आहे,
तो मंदक्रोध आणि प्रेमस्वरूप आहे.
परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे.
त्याची कृपा त्याने केलेल्या सगळ्या कृत्यांवर आहे.
२) हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुतिस्तोत्रे गातात
आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि
तुझा पराक्रम कथन करतात, तुझे पराक्रम आणि
तुझ्या राज्याचे प्रबळ वैभवही ते मानवजातीला कळवतात.
३) तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे;
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्यांचा आहे.
दुसरे वाचन प्रकटीकरण २१:१-५
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन २१:१-५
“परमेश्वर त्याच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील."
मी, योहानने, नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी, नवी येरुशलेम, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या." तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
येशूने म्हटले, मी तुम्हांला नवी आज्ञा देतो, जसे मी तुम्हांवर प्रेम केले, तसे तुम्ही एकमेकांवर करा.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १३:३९-३५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी तुम्हांला नवी आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे."
यहुदा बाहेर गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे. देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करील. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही, तसे तुम्हांलाही आता सांगतो. मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे. जसे मी तुम्हांवर प्रेम केले, तसे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करावे. तुमचे एकमेकांवर प्रेम असले म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :मनुष्य सतत नवनव्या गोष्टींच्या शोधात असतो. त्याचे एक कारण म्हणजे जीवनातील तोच तोपणा किंवा चाकोरीबद्ध जीवनशैली त्याला नकोशी झालेली असते. मात्र केवळ नाविन्यासाठी काहीतरी नवीन केले की, ते लगेच जुने होत राहते आणि मग मनुष्य उथळ व वरवरचे जीवन जगत राहतो. पुनरुत्थित ख्रिस्त सर्व गोष्टी नवीन करतो. त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला एक नवीन दिव्य दृष्टी प्राप्त होत असते. सर्वसामान्य गोष्टींमध्ये तिला काहीतरी आगळेवेगळे पाहायला मिळत असते.
१. पुनरुत्थित ख्रिस्त श्रद्धावंतांच्या जीवनाच्या कक्षा रुंदावत असतो : आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगण्यात येते की, संत पौल आणि त्याचे सोबती सुवार्तेसाठी अतोनात छळ सहनकरायला तयार होते. त्यांच्या पहिल्याच मिशनरी दौऱ्यात परमेश्वराने त्यांना भरभरून यश दिले. परमेश्वर त्यांच्यासाठी नवनवीन समुदायांमध्ये श्रद्धेचे दार उघडत गेला. खरा ख्रिस्ती श्रद्धावंत चार भिंतीच्या आड अडकून पडूच शकत नाही. त्याच्या अंतःकरणातील सुवार्तेचा सुगंध सर्वत्र दरवळत जातो.
२. पुनरुत्थित ख्रिस्त श्रद्धावंताचा वर्तमानकाळ व भविष्यकाळ उजळून टाकतो: आजच्या दुसऱ्या वाचनात संत योहानाला नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांचा दृष्टान्त होतो. इथे आकाश हे आध्यात्मिक जीवनाचे तर पृथ्वी हे भौतिक जीवनाचे प्रतिक आहे. समुद्रही राहिला नाही कारण समुद्र हे दृष्ट शक्तीचे आणि विकृत जीवनाचे प्रतिक आहे. इथे अश्रूंना म्हणजे दुःखाला जागा नाही कारण पुनरुत्थित ख्रिस्ताचा आनंद संपूर्ण जीवन व्यापून टाकतो.
३. पुनरुत्थित ख्रिस्त श्रद्धावंताला देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी नवी उर्मी देतो : आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या प्रेषितांना प्रीतीची एक नवी आज्ञा देतो. ही आज्ञा तशी जुन्या करारात देण्यात आलेली आहे. परंतु आता पाळण्यासाठी ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक नवी उर्मी देतो. पुनरुत्थित ख्रिस्तावरील प्रेमाखातर श्रद्धावंतांनी आता एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायचे आहे.
आत्मपरीक्षण : पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सहवासाचा अनुभव घेतल्यामुळे आपल्या जीवनातील कोणकोणत्या क्षेत्रात नूतनीकरण घडून येत आहे? ख्रिस्ताठायी सर्व गोष्टींचे नूतनीकरण करण्याच्या मार्गात कोणकोणते अडथळे आहेत ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुजवर आणि जसे स्वतःवर तशीच परस्परांवर प्रेम करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या