Marathi Bible Reading | Monday 16th May 2022 | 5th Week of the Easter |

पुनरुत्थान ५ वा  सप्ताह 

सोमवार  १६ मे  २०२२

“ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील."


 संत सायमन स्टॉक 

वर्तनसाक्षी (११६५-१२६५)


सायमन स्टॉक ह्यांनी कार्मेलाईट संस्थेच्या आचारसंहितेमध्ये देखील अत्यंत मौल्यवान सुधारणा सुचविल्या. १६ जुलै १२५१ रोजी त्यांना पवित्र मरियेने दर्शनदिले आणि तपकिरी रंगाची बेंतीन त्यांना दिली असे म्हटले जाते. ही बेंतीन वापरणाऱ्याचे सार्वकालिक नाशापासून रक्षण होईल असे आश्वासनसुद्धा पवित्र मरियेने संत सायमन स्टॉक ह्या ऋषीतुल्य महापुरूषाला दिलं. तपकिरी रंग हे तपस्वी जीवनाचे प्रतीक मानले जाते (अधिक माहिती कार्मेल माता: सण १६ जुलै मध्ये वाचा).धन्य कुमारी मरियेने सायमन स्टॉक ह्यांना दिलेल्या दर्शनात म्हटलेले होते, कार्मेलाईट संस्थेची जी व्यक्ती या तपकिरी रंगाच्या वेषात मृत्यू पावेल तिला सार्वकालिक जीवन लाभेल.

संत पौलाद्वारे प्रभू येशूच्या नावाने एक पांगळा माणूस बरा झाला आणि  लोकांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला.
परमेश्वरावर आपण संपूर्ण मनाने व हृदयाने प्रेम करावे अशी आज्ञा जुन्या  करारात दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तिच आज्ञा नव्या करारात मांडून  देवप्रीति व परस्पर प्रीतिची आज्ञा सांगितली. प्रभू येशूने दिलेल्या आज्ञेत सर्व दहा आज्ञांचे सार आहे. आजच्या शुभ वर्तमानात प्रभू म्हणतो, 'ज्याची  माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील.' प्रभूच्या काही वचनांवर आपण चिंतन करू या.  

✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १४:५-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो."

पौल आणि बर्णबा यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता परराष्ट्रीय आणि यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते, हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र आणि दर्बे ह्या नगरात आणि त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले.
लुस्त्र येथे पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलचे बोलणे ऐकत असे. पौलने त्याच्याकडे दृष्टी लावून आणि त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून, मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा." तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. मग पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत!" त्यांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले आणि पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजाऱ्याने बैल आणि माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा आणि पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, "गृहस्थांनो, हे काय करता? आम्ही आणि तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपआपल्या मार्गानी चालू दिले. तथापि त्याने स्वतःला साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य आणि फलदायक ऋतू तुम्हांस दिले आणि अन्नाने आणि हर्षाने तुम्हांस मन भरून तृप्त केले." असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११६: १-४,१५-१६
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या नामाचा गुणगौरव होवो.

१) आमचा नको प्रभू, आमचा नकोच. 
पण तुझे वात्सल्य आणि सत्य यांच्याखातर
 तुझ्या नामाचा गुणगौरव होवो. 
राष्ट्रांनी काय म्हणून विचारावे,
“आता कुठे आहे तुमचा देव ?" 

२) आमचा देव तर स्वर्गात आहे.
 योग्य दिसेल ते तो करतो. 
त्याच्या मूर्ती म्हणजे केवळ सोनेरुपे, 
मानवी हातांच्या कृती.

३) स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता प्रभू
तुम्हांला आशीर्वाद देवो. स्वर्ग हा प्रभूचाच स्वर्ग आहे. 
पृथ्वी मात्र मानवजातीला दिली आहे.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे 
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १४:२१-२६
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्याला पिता पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतः त्याला प्रकट होईन." यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही ?" येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले आहे त्याचे आहे."
मी तुम्हांजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण देईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :

आजच्या शुभवर्तमानात, येशू शिष्यांना आणि आपल्याला आठवण करून देत आहे की, जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर पिता आणि पुत्र दोघेही आपल्यावर प्रीती करतील. या जगात यापेक्षा आणखी आनंद देणारी कोणती गोष्ट असू शकते का? प्रीती ही या पृथ्वीवरील सर्वात मोठी देणगी आहे. आपल्याकडे पैसा, सत्ता, चांगले आरोग्य आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी असतील, परंतु आपल्यावर कोणी प्रीती केली नाही तर आपण या जगातील सर्वात गरीब व्यक्ती आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्म्यामध्ये फक्त शुद्ध आणि बिनशर्त प्रीती आहे आणि आपण काहीही केले किंवा आपण कसेही वागलो, तरी त्याचे आपल्यावरील प्रेम कधीच कमी होत नाही. त्यांचे प्रेम आमच्यासाठी निरंतर वाहत राहते. तर आज आपण पवित्र त्रैक्याच्या बिनशर्त आणि निरंतर प्रीतीसाठी त्यांचे आभार मानू या आणि आजपासून त्यांच्या प्रेमाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यासाठी मला काय अडचणी येत आहेत? माझ्या जीवनात मी पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या बिनशर्त आणि निरंतर प्रीतीचा अनुभव घेतला आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व तुजवर आणि माझ्या बंधु-भगिनींवर प्रेम करण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या