Marathi Bible Reading | Tuesday 17th May 2022 | 5th Week of the Easter |

पुनरुत्थान ५ वा  सप्ताह 

मंगळवार १७ मे  २०२२

“तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, "



 संत पास्काल बेलॉन
-वर्तनसाक्षी (१५४०-१५९२)
स्पेनमध्ये पेन्टेकॉस्ट या दिवसाला पवित्र आत्म्याचा “पास्का " असे म्हणतात. त्याच दिवशी जन्म झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला पास्काल असे नाव देण्यात आले. त्याला अगदी बालपणापासून पवित्र मिस्साविषयी विलक्षण आदर वाटत असे..
वयाच्या २२ व्या वर्षी तो अल्कान्ताराच्या सुधारणावादी परंतु अत्यंत शिस्तप्रिय संस्थेमध्ये प्रापंचिक धर्मबंधू म्हणून शिक्षण घेऊ लागला. या संस्थेच्या स्पेनमधील विविध शाखांमध्ये त्याने नम्रपणे द्वारपालक म्हणून काम केले. गोरगरीब व अभागी बंधुभगिनी ह्यांच्याविषयी त्याच्या मनात कमालीची कळकळ होती.
अतिपवित्र साक्रामेंतासमोर तो बऱ्याचदा तासन्तास बसलेला आढळत असे. कधीकधी तो साक्षात्कारी अवस्थेत दंग असलेला दिसून येई. अशाच अवस्थेमध्ये त्याला धर्माविषयीच्या चिरंतन सत्याचे अगाध ज्ञान प्राप्त होई. त्याचे शिक्षण अल्प असले तरी आध्यात्मिकतेमध्ये तो पुरेपूर मुरलेला होता. त्यामुळे त्याच्या समकालीन तज्ज्ञांबरोबर तो सारख्याच पातळीवर आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करीत असे. त्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी सर्व थरांतील लोक त्याच्याकडे येत.
जीवनात येणारी संकटे, दु:खे, आजार, अपयश, निराशा आणि गोंधळात टाकणारी स्थिती ह्यामुळे माणसे अस्वस्थ बनतात. बाह्य जगात  चाललेला भ्रष्टाचार, दहशत, अन्याय व अत्याचार ह्यांमुळे माणसे भयभीत  झालेली आपण पाहतो. जीवनातील अशी अस्वस्थता, भीती अनिश्चितता  ह्यांमुळे आपण चिंताग्रस्त बनतो.

जगाचा अधिकारी म्हणजेच सैतान अशा भयग्रस्त स्थितीचा  गैरफायदा घेऊन माणसांच्या अंतःकरणाचा ताबा घेऊ पाहतो.  आपल्या जीवनात  उद्भवणाऱ्या सर्व समस्यांवर प्रभू येशूची शांती सर्व प्रकारच्या अनिष्टामध्ये  आपल्याला धीर देते. कठीण परिस्थितीत धैर्याने जीवन जगण्यास प्रेरणा देणारी  शांती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. गोंधळलेल्या व भयभीत झालेल्या शिष्यांना प्रभू येशूने शांतिचे वरदान बहाल केले आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिष्यांनी त्याची सुवार्ता जगभर पसरविली. तीच शांती प्रभू येशू आज आपल्या सर्वांना देत आहे.

✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १४:१९-२८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपण देवाच्या सहवासात असताना देवाने आपणांकरिता काय काय केले हे त्यांनी सांगितले. "

अंत्युखिया आणि इकुन्या येथून कित्येक यहूदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर काढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला आणि नगरात निघून आला, मग दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दवें येथे गेला.
त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य बनविल्यावर लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया ह्या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यानी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडीलजन निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याकडे त्यांना सोपवले.
मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन  सांगितल्यावर ते अत्तलिया येथे उतरले. तेथून ते अंत्युखियाला जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४५: १०-१३,२१
प्रतिसाद : प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात.

१) प्रभो, सारा प्राणिमात्र तुझे स्तवन करतो, 
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
तुझ्या राज्याचा ऐश्वर्य ते वर्णितात आणि 
तुझा पराक्रम कथन करतात;

२) तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव 
ते मानवजातीला जाहीर करतात 
तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य. 
तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.

३) माझ्या तोंडी प्रभूचे स्तवन असेल,
 त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद 
सारा प्राणीमात्र युगानुयुग गावो.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
 प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १४:२७-३१
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी माझी शांती तुम्हांस देतो."
 येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, मी जातो आणि तुम्हाकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकार येतो. तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या निरोपाच्या वेळी शांतीची भेट देतो. तो कोणत्या प्रकारची शांती देतो? ख्रिस्ताची शांती आमच्या समस्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याची शांती फक्त आपल्या भल्यासाठीच आहे आणि तो चांगल्या गोष्टीद्वारेच आपल्याला त्याची शांती प्रदान करतो. आज ह्या जगाचा शांततेकडे बघण्याचा दृष्टीकोन त्रास टाळणे आणि हिंसेपासून दूर राहणे एवढाच आहे. परंतु येशू जी शांती आम्हाला बहाल करतो ती आपल्या भीती व चिंतांवर विजय मिळविणारी आहे. ह्या जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या शांततेपासून दूर नेऊ शकत नाही. दुःख, यातना किंवा या जगाचा कोणताही धोका येशूची शांती आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तर आमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ द्यायची काहीच गरज नाही, कारण ख्रिस्ताची शांती अनंतकाळ आपल्याबरोबर आहे. ह्या जगातील कोणत्या गोष्टींमुळे मी माझ्या मनाची शांती हरवून बसलेलो / ली आहे ? मी कधी ख्रिस्ताच्या शांतीचा अनुभव घेतला आहे का ? माझ्या समस्यांपेक्षा प्रभूची शांती सर्वश्रेष्ठ आहे असे मला वाटते का?

प्रार्थना : हे शांती प्रदाता, प्रभू येशू ख्रिस्ता, धैर्याने व विश्वासाने जीवन जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हाला तुझी शांती बहाल कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या