पुनरुत्थान ५ वा सप्ताह
बुधवार १८ मे २०२२
जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळदेतो."
संत जॉन पहिले
परमगुरू, रक्तसाक्षी(५२६)
आपले सर्वांचे जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामावलेले असावे आणि आपण त्याच्या अविरत कृपेपासून विभक्त होऊ नये हीच प्रभूची इच्छा आहे. प्रभू स्वतः द्राक्षवेल आहे व आपण त्याचे फाटे आहोत. आपल्याकडून प्रभूला फळाची अपेक्षा आहे. फळ न देणारा फाटा प्रभू काढून टाकतो.
प्रभू येशू आपल्याला त्याच्या जीवनात सहभागी होण्याचे म्हणजेच त्याच्या सारखे जीवन आचरण करण्यासाठी पाचारण करीत आहे. प्रभूच्या जीवनाशी सहभागितेचे जीवन जगल्याने आपण शुद्ध, पवित्र आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो. प्रभू येशू ठायी आपले जीवन फलद्रूप बनू शकते.
पवित्र ख्रिस्त शरीर संस्कारात स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पोषणासाठी अखंड कृपेचा साठा ठेवला आहे. आपण त्याच्या शरीराचे अवयव बनून फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील बनू या. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनावा म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १५:१-६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलजन ह्यांच्याकडे पौल आणि बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी जावे असे ठरवण्यात आले. "
काही प्रेषितांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली : “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची : सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल आणि बर्णबा ह्याचा त्यांच्याशी बराच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहीनी ह्या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची रवानगी केल्यावर ते फेनिके आणि शोमरोन ह्यांमधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते येरुशलेमला पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे घडवले ते त्यांनी सांगितले. तरीपण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे येऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे." मग प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यासाठी जमले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२२: १-५
प्रतिसाद : आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ.
१) "आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या दारात आमचे पाय उभे आहेत.
२) हे येरुशलेम, मजबूत रचलेल्या
नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश चढून जातात.
३) कारण परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण
करणे होच इस्त्राएलची साक्ष होय.
तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्याची
सिंहासने मांडली आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १५:१-८
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणितसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :येशूविना तुमचे आयुष्य कसे आहे ? अर्थहीन, शून्य ? त्याच्याशी आपले संबंध मजबूत ठेवले नाही तर आपले जीवन नक्कीच निरर्थक बनते. आपल्याला या जगाने खूप काही विपुल प्रमाणात दिले आहे. परंतु, हे सर्व तात्पुरते आहे आणि हे सर्वकाही आपण एक दिवस इथेच सोडून जाणार आहोत. ह्या ऐहिक गोष्टींमुळे आपल्याला मानसिक शांतीही मिळणार नाही आणि त्यामुळे आमच्या मनाला त्राससुद्धा नक्कीच होणार. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला त्याच्यामध्ये राहण्याची व त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही याची आठवण करून देत आहे. म्हणूनच आपण नेहमी ख्रिस्ताबरोबर पवित्र मिस्सामध्ये आपल्या उपस्थितीद्वारे, साक्रामेंताद्वारे, आराधना आणि त्याच्या पवित्र शब्दांद्वारे भक्कम नाते जोडण्याचे ठरवूया. कारण जर आपण त्याच्याशी कायमचे जोडलेलो राहिलो तर त्याच्यापासून आम्हांला कोणीच वेगळे करू शकत नाही आणि हीच तर ख्रिस्ताची खरी खासियत आहे. ख्रिस्ताशी माझा संबंध किती मजबूत आहे? सदैव प्रभूमध्ये राहण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या द्राक्षवेल रुपी जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यासव तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
.jpg)
0 टिप्पण्या