Marathi Bible Reading | Thursday 19th May 2022 | 5th Week of the Easter |

पुनरुत्थान ५ वा  सप्ताह 

गुरुवार १९ मे  २०२२

“माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, "



 संत पीटर सेलेस्तीन पाचवे 
परमगुरू, वर्तनसाक्षी (१२१५-१२९६)

चिंतन: “देवाशी जर हृदयाच्या अंतहृदयाने सुसंवाद साधायचा असेल तर  आपण केवळ त्याच्याच सहवासात राहण्याचा ध्यास घेतला पाहिजे." संत पीटर सेलेस्तीन

सर्वांनी आनंदी व समृद्ध जीवन जगावे हीच परमेश्वराची इच्छा आहे. जुन्या करारात देवाने इस्त्राएली जनतेला मोशेद्वारे दहा आज्ञा दिल्या ह्या आज्ञा पाळतांना देवाच्या प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला यावा आणि परस्परप्रीतिने सर्वांनी आनंदी असावे हीच देवाची योजना होती. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच दाहा  आज्ञांचे सार देवप्रीति व परस्परप्रीति ह्या आज्ञांमध्ये सांगितले आहे.
आनंद हा पवित्र आत्म्याच्या फळांपैकी एक आहे व तो प्रत्येकाला लाभावा आणि परिपूर्ण व्हावा अशी प्रभू येशूची इच्छा आहे. 
प्रभू येशूच्या प्रीतित राहणे म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या अमृततुल्य वचनाप्रमाणे आचरण करणे होय. सर्वांना आनंदी व समृद्ध जीवन जगता यावे व शेवटी सर्वकाळच्या आनंदात सहभागी होता यावे म्हणून प्रभू येशूच्या प्रीतित वाळू या.

✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १५:७-२१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “माझे मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये."
पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला: "बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हांमध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जो जोखड आपले पूर्वज आणि आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्याच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे."
तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि वर्णबा आणि पौल ह्यांना आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे आणि अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला,
“बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनने सांगितले आहे आणि ह्यांच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की, ह्यानंतर मी परत येईन आणि दावीदचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा, हे जे त्याला युगादिपासून माहित आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.ह्यास्तव माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून • देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून • पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.' "
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९६: १-३,१०
प्रतिसाद :   देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. 
प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद गा.

२) त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा, 
देशोदेशी त्याचा महिमा वर्णा, 
साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

३) सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, “प्रभू राजा आहे.” 
जगाची स्थापना करा, “प्रभू राजा आहे." 
जगाची स्थापना झालेली असून ते अढळ आहे.
 तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
 येशूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य." 
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १५:९-११
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "माझ्या प्रीतीत राहा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल."
येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :येशूने त्याच्या आज्ञा आमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी दिलेल्या नाहीत, तर आपल्याला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखविण्यासाठी आणि आपण अधिक प्रेमळ बनावे म्हणून दिल्या आहेत आणि यामागे त्याचा एकच हेतू आहे: “त्याचा आनंद आम्हामध्ये असावा आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” आपण एक आनंदी जीवन जगावे ही ख्रिस्ताची इच्छा आहे आणि हा आनंद आपल्याला ख्रिस्तामध्ये जोडलेले राहिल्यामुळे मिळतो. इतरांवर प्रेम केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळत असते. आपण अशा जीवनाचा अनुभव घेत असतो ज्याचा आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही. आणि हे सर्व ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहिल्यामुळेच शक्य आहे. त्याची शांती व त्याचा आनंद सदासर्वदा आम्हाबरोबर राहो हीच प्रार्थना. ख्रिस्ताचा आनंद माझ्यामध्ये परिपूर्ण करण्यासाठी मी काय प्रयत्न करीत आहे ?

प्रार्थना : हे प्रेमळ बापा, तुझ्या प्रीतित वाढण्यास आणि विशेषप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आनंदी जीवन जगून तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रेरणा आमेन. 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या