Marathi Bible Reading | Friday 20th May 2022 | 5th Week of the Easter |

पुनरुत्थान ५ वा  सप्ताह 

शुक्रवार २० मे  २०२२

"जशी मी तुम्हांवर प्रीतो केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. 



 सिएनाचा संत बर्नाडिन
•वर्तनसाक्षी (१३८०-१४४४)

२० मे १४४४ रोजी आपल्या मृत्यूशयेवर असताना त्यांनी पुढील शब्दांत आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला. “पित्या, मी तुझे नाव प्रकट केलेले आहे, आता मी तुजजवळ परतत आहे.” अवघ्या ६ वर्षांनी १४५० साली त्यांना संतपद देण्यात आले.

चिंतन : आपल्या सर्व कृत्यांमध्ये प्रथम देवाला आणि त्याच्या राज्याला अग्रक्रम द्या. बंधुत्वाचे नाते दृढ करा. इतरांना जे शिकवायचे ते प्रथम आचरणात आणा. -संत बर्नाडिन

मैत्रीमध्ये जवळीकता असते, सहभागिता असते. मैत्रीमध्ये एकमेकांचा आदर व सन्मान केला जातो. मित्र एकमेकांना समजून घेतात, क्षमा करतात आणि एकमेकांसाठी त्याग करायला तयार असतात. खरी मैत्री ही  निखळ प्रेमावर उभारलेली असते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर त्याच्या  क्रुसावरील मरणापर्यंत प्रेम केले. आजही प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला त्याच्या  प्रेमाचा सहभागिदार बनण्यासाठी आवाहन करीत आहे.
✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १५:२२-३१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींविषयी तुम्हावर जास्त ओझे लादू, असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. "

पौल आणि बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहुदा आणि सीला ह्यांना अंत्युखिया येथे पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले. त्यांच्या हाती असे लिहून पाठवले:
“अंत्युखिया, सुरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रीयातले बंधुजन ह्यांना प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहीनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते. ह्यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णवा आणि पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हांकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा आणि सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो."
त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखिया येथे गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५७: ८-१२
प्रतिसाद : प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन.

१) माझी मनोमन निष्ठा आहे देवा, 
माझी मनोमन निष्ठा आहे. 
मी गाईन, मी गुणगान गाईन. 
माझ्या आत्म्या, जागृत हो, सतार आणि वीणा हो, 
तुम्हीही जागृत व्हा. मी सूर्याला जागृत करीन.

२) प्रभो, लोकांसमक्ष मी तुझे आभार मानीन, 
राष्ट्रांमध्ये तुझे गुणगान गाईन. 
कारण तुझे अनंत प्रेम स्वर्गाला पोहचले आहे. 
आणि तुझे सत्य गगनाला भिडले आहे. 
हे देवा, वर आकाशात तुझे ऐश्वर्य प्रकट कर, 
साऱ्या  पृथ्वीवर तुझा गौरव होवो !.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
 मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १५:१२-१७
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
   “तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जशी मी तुम्हांवर प्रीतो केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रोती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्हीमाझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला पटवून देतो की, तो आमचा मित्र आहे आणि तो आपल्यावर मनापासून आणि कोणतीही अट न ठेवता प्रेम करतो. त्याने आपल्यावर जशी पूर्ण अंतःकरणाने प्रीती केली आहे तशीच आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. येशूच्या प्रेमात एवढे सामर्थ्य आहे की, ते आमचे अंतःकरण भरून टाकते आणि आमचे विचारही बदलून इतरांची प्रेमाने सेवा करण्यास आम्हांला प्रेरणा देते. जर आपण त्याच्या प्रेमासाठी आपली अंतःकरणे उघडली आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे ह्या त्याच्या आज्ञेचे पालन केले तर आपण नक्कीच आपल्या जीवनात अशी बरीच फळे देऊ की जी अनंतकाळ टिकून राहतील. येशू मला त्याचा मित्र / मैत्रिण म्हणत असल्याचे ऐकून मला कसे वाटते? मी माझ्या आयुष्यात ख्रिस्ताच्या बिनशर्त प्रेमाचा अनुभव घेतला आहे का ? प्रभूच्या प्रेमात राहून फलदायी होण्यासाठी मी काय प्रयत्न करीत आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, अमृततुल्य असे मैत्रीचे नाते जोपासण्यास व माझ्या बंधु  भगिनींची सेवा करण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या