पुनरुत्थान ५ वा सप्ताह
शनिवार २१ मे २०२२
"मी तुम्हाला जगातून निवडले आहे.”
मार्सेलीसचे संत व्हिक्टर
• रक्तसाक्षी (२९०)
देवाच्या निवडलेल्या प्रजेने आपल्या देवाचा महिमा वर्णावा, त्याच्या मुक्ततेचा संदेश आपल्या मागून येणाऱ्या पिढीला द्यावा व देवाच्या आज्ञात राहावे हीच देवाची योजना त्यामध्ये होती.
प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आवाहन करुन सांगत आहे, "मी तुम्हाला जगातून निवडले आहे”. ही निवड परमेश्वराची तारणदायी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी व देवराज्याची आणि ख्रिस्ताची साक्ष जगाच्या अंतापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेली आहे. आपल्या बाप्तिस्माद्वारे आपण देवाची मुले बनतो. दृढीकरण संस्काराद्वारे आपल्या देवावरील श्रद्धेत आपण दृढबनतो. ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपल्याला ख्रिस्ताच्या शरीर व रक्तामध्ये सहभागिता मिळते व आध्यात्मिक बळ प्राप्त होते. प्रायश्चित्त संस्काराद्वारे आपण सतत देवाबरोबर व बंधु भगिनींबरोबर समेट साधतो. विवाह संस्काराद्वारे आपण देवाच्या प्रेमाचे व निर्मितीचे साक्षीदार बनतो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचे निवडलेले आपण सर्व अनुयायी देवप्रीतिचे साक्षीदार बनण्यास लायक बनतो.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:१-१०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर."
त्यानंतर पौल दर्बे आणि लुस्त्र येथे आला. तेथे तिमथी नावाचा शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेल्लेणी होता. त्याला लुस्त्रातले आणि इकुन्यातले बंधू नावाजत होते. त्याने आपल्याबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती. तेव्हा ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता येरुशलेमातील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळायला नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.
नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतिया ह्या प्रांतांमधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर विथुनिया येथे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसला गेले. तेथे रात्री पौलला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे : "इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर." त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगायला देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १००: १-३,५
प्रतिसाद :पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा.
१) पृथ्वीवरील सर्व लोकहो,
प्रभूचा जयजयकार करा.
आनंदाने प्रभूची सेवा करा.
आनंदगीते गात त्याच्यासमोर या..
२) प्रभू हाच देव आहे याची जाणीव ठेवा.
आमचा निर्माणकर्ता तोच, आम्ही त्याचेच,
त्याचे लोक, त्याच्या कुरणातला कळप आहो.
३) खरोखर प्रभू चांगला आहे,
त्याचे वात्सल्य अनंतकाळ टिकते.
त्याची सात्त्विकता पिढ्यान्पिढ्या टिकते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १५:१८-२१
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही जगाचे नाही, परंतु मी तुम्हांला जगातून निवडले आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धन्यापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही •पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :
एक पापी माणूस या जगात पापमय जीवन जगत असताना त्याला अनपेक्षितपणे आध्यात्मिकतेचा अनुभव येतो. आणि हे असे घडले जेव्हा त्याने अचानक त्याचे बायबल उघडून आणि आजच्या शुभवर्तमानातील येशूचे वचन वाचले. "तुम्ही जगाचे नाही." हे वचन वाचल्यानंतर, तो करत असलेल्या प्रत्येक पापाचा तो द्वेष करायला लागला आणि त्याने वाईट संगतीत असलेल्या मित्रांनाही पूर्णपणे सोडले, ज्यांनी त्याला पाप करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्या ह्या कठोर निर्णयामुळे त्याला त्याच्या मित्रांनी वेडे ठरविले. परंतु तो या जगाचा नाही तर ख्रिस्ताचा झाला. एकदा का आपण प्रभूशी एकनिष्ठ राहण्याचे ठरविले की मग हे जग आमचा द्वेष करील, आपले ह्या जगातील मित्रसुद्धा आपला तिरस्कार करतील. परंतु आपल्याला या ऐहिक निंदेबद्दल चिंता करण्याची काहीच गरजनाही. कारण ख्रिस्तालाही हे सर्व सहन करावे लागले होते आणि तो आपल्याबरोबर आहे व आपण त्याचे आहोत. मी सुद्धा माझ्या पापी जीवनाचा आणि या जगातील वाईट मार्गाचा द्वेष करायला तयार आहे का ? मला जीवनात किती वेळा आध्यात्मिकतेचा अनुभव आलेला आहे ? आणि माझे आयुष्य बदलण्यासाठी माझे कोणते प्रयत्न चालू आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी साक्ष जगाला देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल तुझे मी आभार मानतो. मला सबळ कर, मला प्रेरणा दे . व मला तुझ्या कृपेचे दान दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या