पुनरुत्थान ६वा रविवार
२२ मे २०२२
ज्याला पिता पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील. "
जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे."
पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा नव्याने प्राप्त व्हावी यासाठी आपण अपात्र असतांना पिता परमेश्वर आपणासर्वांसाठी आध्यात्मिकतेची विविध कृपादाने घेऊन येणारा पवित्र आत्मा पाठवू इच्छितो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे आपणास पवित्र जीवन जगण्यास आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यास प्रेरणा मिळते. पवित्र आत्मा ख्रिस्ताचा अभिषेक करणारा आत्मा असल्याने आपल्यामधील पापांचा कलंक धुतला जाऊन परिवर्तनाची कृपा आपणास प्राप्त होते.
आज आपण पवित्र आत्म्याच्या आगमनाची जणू तयारी करीत आहोत. कैवारी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वरपित्याची स्तुति करु या,
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १५:१-२,२२-२९
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हांवर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हांला योग्य वाटले."
काही प्रेषितांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, "मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही." तेव्हा पौल आणि बर्णवा ह्यांचा त्यांच्याशी बरेच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल आणि वर्णबा ह्यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने येरुशलेमेतले प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.
तेव्हा पौल आणि बर्णवा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख वर्शव्या म्हटलेला यहुदा आणि सीला ह्यांना अंत्युखिया येथे पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळींसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले :
"अंत्युखिया, सुरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रीयातले बंधुजन ह्यांना प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम! आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते. म्हणून आमच्यात एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा आणि पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हांकडे पाठवावीत. ह्याकरिता यहुदा आणि सोला ह्यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुम्हांवर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर हित होईल. क्षेमकुशल असो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६७: २-३,६,८
प्रतिसाद : हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
१) हे परमेश्वरा, आम्हांवर दया कर आणि आम्हांला आशीर्वाद दे,
तू आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड..
ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा,
सर्व राष्ट्रांना तुझे तारण समजावे.
२) राष्ट्रे हर्षोत आणि जयघोष करोत,
कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस.
आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस.
३) हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत;
सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
देव आम्हांला आशीर्वाद देवो आणि
पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत..
दुसरे वाचन प्रकटीकरण २१:१०-१४,२२-२३
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
“त्याने मला पवित्र नगरी स्वर्गातून उतरताना दाखवली. "
मी योहान आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी देवाचे तेज होते. तिची कांती अतिमोलवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलच्या संतानाच्या बारा वंशाची होती. पूर्वेकडून तीन वेशी, उत्तरेकडून तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला बारा पाय होते, त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची नावे होती.
त्या नगरीत मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभुदेव आणि हे कोकरू हेच तिचे मंदिर होत. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हेच कोकरू तिचा दीप आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
येशूने म्हटले, माझ्यावर प्रेम करणारा माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १४:२३-२९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्याला पिता पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे."
मी तुम्हांजवळ राहात असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण देईल. मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हांकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :माणसाने एकदा का पुनरुत्थित ख्रिस्ताठायी नवजीवन जगायला सुरूवात केली की त्याचे अवघे जीवन तात्काळ किंवा हळूहळू का होईना परंतु बदलून जाते. त्याच्या धार्मिक जीवनात जिवंतपणा येतो. त्याच्या आध्यात्मिक जीवनाला सद्गुणांचा बहर येतो आणि विशेष म्हणजे त्याचे प्रभूशी असलेले नातेसंबंध सुधारत जातात.
१. श्रद्धावंत आपले धार्मिक जीवन सुरळीतपणे जगू लागतो : आपली मुळे यहुदी धर्मामध्ये रुतलेली आहेत हे सत्य समजून घेताना प्रारंभीच्या खिस्तसभेला सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. आजच्या पहिल्या वाचनात गुंतेचा प्रश्न चर्चिण्यात आलेला आहे. आब्राहामापासून मोशेपर्यंत सुंता ही कराराची खूण मानण्यास येत होती. पुढे ती धर्मप्रवेशासाठी आवश्यक बाब मानली जाऊ लागली. मात्र त्याच यहुदी धर्मातून पुढे ख्रिस्ती धर्म उदयास आला तेव्हा काही यहुदी ख्रिस्ती लोकांनी परराष्ट्रीयांकडे ख्रिस्ती होण्याआधी सुंता करण्याचा आग्रह धरला. आजच्या पहिल्या वाचनामध्ये सुंता ह्या बाह्य खुणेपेक्षा नैतिक व शुद्ध धार्मिक जीवन अधिक महत्वाचे आहे, असा निर्वाळा देण्यात आला. त्यानंतर ख्रिस्ती श्रद्धा यहुद्यांप्रमाणे परराष्ट्रीयांमध्ये फोफावू लागली.
२. श्रद्धावंत आपल्या आध्यात्मिक जीवनाची नव्याने आखणी करतो धार्मिक जीवन हे बाह्य स्वरूपाचे असते तर आध्यात्मिक जीवन हे आंतरिक स्वरुपाचे असते. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये स्वर्गीय जेरूसलेमेचे पाये असलेले बारा प्रेषित ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ह्या नगरीमध्ये मंदिर नव्हते कारण प्रभू स्वतः तिचे मंदिर व प्रकाश होता. श्रद्धावंत अशाप्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनाची बांधणी करतो की, त्याच्या जीवनाकडे पाहून पुष्कळांचे परिवर्तन होते.
३. श्रद्धावंत प्रभूशी असलेले नाते नव्याने दृढ करीत राहतो आजच्या शुभवर्तमानात पुनरुत्थित ख्रिस्ताशी असलेल्या नात्याचे चार पैलू नमूद करण्यात आलेले आहेत : प्रीती, शांती, श्रद्धा आणि पवित्र आत्मा. ह्या पैलूंना श्रद्धावंत एक नवा प्रतिसाद देतो. तो इतरांवर प्रीती करतो श्रद्धेचे व शांतीचे जीवन जगतो. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने प्रभूशी ऐक्य साधतो.
आत्मपरीक्षण : माझे धार्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन व प्रभूशी असलेले माझे नाते ह्यांचे नूतनीकरण करण्यासाठी मी कोणती कृतियोजना आखलेली आहे? ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी शरीर, जग व सैतान कोणते अडथळे आणीत आहे असे मला वाटते ? त्यावर मला कसा विजय मिळविता येईल ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताठायी आम्हा सर्वांस पवित्र आत्म्याची वरदाने प्राप्त व्हावीत म्हणून आम्हांवर तुझा वरदहस्त ठेव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
.jpg)
0 टिप्पण्या