पुनरुत्थान ६ वा सप्ताह
सोमवार २३ मे २०२२
"जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल,
संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी
- वर्तनसाक्षी (१६९८-१४)
"सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल."
पवित्र त्रैक्यामधील पवित्र आत्मा परमेश्वर पिता आणि पुत्र ह्यांचे सामर्थ्यशाली कृपादान आहे. पवित्र आत्मा आपल्याला शहाणपण, ज्ञान, समंजसपणा, सामर्थ्य अशा प्रकारच्या दानांचा वर्षाव घेऊन येतो आणि त्याद्वारे परिपूर्ण जीवन जगण्यास प्रेरणा देतो.
पवित्र आत्मा अनेक स्तरांवर कार्य करीत आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचे अनुकरण करणाऱ्यांमध्ये पवित्र आत्म्याची फळे अनुभवण्यास मिळतात. प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन ही सर्व पवित्र आत्म्याची फळे त्याच्या सामर्थ्यशाली कृपेशिवाय प्राप्त होत नाहीत.
पवित्र आत्म्याच्या वरदानांसाठी आपण विशेष प्रार्थना करु या देवाठायी लीन व नम्र बनू या..
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:११-१५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"लुदियेचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिचे लक्ष दिले. "
त्रोवसा पासून हाकारून आम्ही नीट संथारा येथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो, तेथून फिलीपी येथे गेलो, ते माझेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती, ती चुनतीरा नगरची असून जांभळी वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा आणि तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली, "मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा.' तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५०: १-६,९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१ परमेश्वराचे स्तवन करा!
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या सभेत त्याचे स्तुतिस्तोत्र गा.
इसाएल आपल्या निर्माणकर्त्यांच्या ठायी आनंद करो,
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा यांवर त्याला स्तुतिस्तोत्रे गावोत.
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
तो दीनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो
हे त्यांच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमे बराचे स्तवन करा
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
खिस्त मेलेल्यातून उठला आहे.
आणि आम्हाला प्रकाशित केले आहे.
त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १५:२६-१६:४
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सत्याचा आत्मा माझ्याविषयी साक्ष देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहा."
"तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हांस सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण व्हावी."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला 'सत्याच्या आत्म्याबद्दल सांगतो. तो त्याच्याविषयी साक्ष देण्यासाठी व सत्य काय आहे जे समजावून देण्यासाठी पित्याकडून येणार आहे. येशू आपल्याला आश्वासन देतो की, आपणसुद्धा त्याच्या सत्याच्या शिकवणुकीची साक्ष देत असताना एकटे पडणार नाही. पवित्र आत्मा, आमचा कैवारी आहे, त्याच्याद्वारे आमचे सांत्वन व ख्रिस्ताच्या सत्याचे समर्थन होईल. जसे पिता आणि पुत्र आपल्याबरोबर आहेत, तसाच पवित्र आत्मासुद्धा आपल्याबरोबर असेल. आपल्याला फक्त पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या सत्याला चिकटून राहण्यास व त्याची साक्ष देण्यास सदैव तयार राहणे गरजेचे आहे. जीवनातील कठीण काळात सत्याच्या आत्म्याद्वारे माझे कधी सांत्वन झाले आहे का? त्याची साक्ष देण्यासाठी मी काय धडपड करीत आहे ? ख्रिस्ताच्या सत्याला चिकटून राहणे मला जमते का ?
प्रार्थना : हे पवित्र आत्म्या ये आणि आम्हाला ख्रिस्ताच्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास प्रेरणा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या