सामान्य काळातील १०व सप्ताह
बुधवार ८ जुन २०२२
“जो कोणी आज्ञा पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."
संत मरियम तेरसिया
खिस्तसभा आज संत मरियम तेरसिया हीचा स्मृतीदिन साजरा करीत आहे. बालपणापासूनच तेरसीयाला देवाच्या प्रेमाची गोडी लागली व तिने स्वत:ला प्रार्थनामध्ये समर्पित केले. गरीब, आजारी आणि गरजवंतांच्या सेवेसाठी तिने स्वत:चे जीवन ख्रिस्तचरणी समर्पित केले आहे. बिशपांच्या विनंती करुन तिने फ्रान्सिस्कन क्लॅरेटस् संस्थेची स्थापना केली. तिच्या प्रार्थनेद्वारे संत तेरसीयाने आध्यात्म्याची उच्च पातळी गाठली होती. संत मरियम तेरेसीयाचा आदर्श समोर ठेवून आपण सेवाकार्य करण्यास प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन : १राजांच्या १८:२०-३९
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन “हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये तुझ्याकडे पुन्हा वळवत आहेस, याची या लोकांस जाणीव होऊ दे."
राजा अहाबाने सर्व इस्राएल लोकांस बोलावणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. एलिया सर्व लोकांच्या जवळ येऊन म्हणाला, "तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल ? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्यांला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. नंतर एलिया लोकांना म्हणाला, “परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे, बआलचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत. आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे. त्यापैकी त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोऱ्हा घ्यावा, त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्याला अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोऱ्हयाचे तसेच करून तो इंधनावर रचीन आणि त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव ठरावा." सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.” एलिया बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही वाटेल तो गोऱ्हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका." मग त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत बआलचे नाव घेत आणि “हे बआल, आमचा धावा ऐक!” असे म्हणत राहिले, पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.
दोन प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, "मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे." ते मोठ्यामोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी आणि भाल्यांनी आपणांस घाव करून घेऊ लागले. एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.
मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, "माझ्याजवळ या,' तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. “तुझे इस्राएल हे नाव पडेल,” असे याकोबला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली. दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली. त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोऱ्हा कापून आणि तुकडे करून ते इंधनांवर रचले. मग तो म्हणाला, "चार घागरी पाणी
भरून होमबलीवर आणि इंधनांवर ओता." तो पुन्हा म्हणाला, "दुसऱ्यांदा तसेच करा." तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, "तिसऱ्यांदा तसेच करा" आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहू लागले आणि ती खळगीही पाण्याने भरली.
संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा', आब्राहाम, इसहाक, आणि इस्त्रायल यांच्या देवा इस्राएलमध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना जाहीर कर. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक, हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये तुझ्याकडे पुन्हा वळवत आहेस, यांची या लोकांना जाणीव होऊ दे." तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी आटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!"
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,४-५,८,११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे.
१) हे देवा, माझे रक्षण कर,
कारण मी तुझा आश्रय घेतला आहे.
मी परमेश्वराला म्हटले, "तूच माझा प्रभू आहेस."
२) जे परमेश्वराला सोडून अन्य दैवतांच्या
भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील.
ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात तशी मी अर्पिणार नाही
मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही.
३) परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे.
म्हणून मी ढळणार नाही.
४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील,
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे
तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:१७-१९
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“नियमशास्त्र रद्द करायला मी आलो नाही तर ते पूर्ण करायला आलो आहे.'
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका, मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : येशूच्या मनात आपल्या यहुदी संस्कृती बद्दल आदर होता. पण जेव्हा जेव्हा आपली संस्कृती लोकांवर निर्बंध लादून, त्यांच्यावर अत्याचार करत असे त्यावेळी येशूने त्यांना आव्हान केले. आजच्या शुभवर्तमानात येशू सांगत आहे की, मी सर्व नियम नष्ट करण्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे. येशू आपल्याला सांगत आहे की, आपला आपल्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा केवळ संस्कृतीचा निषेध करणे किंवा आदर करणे नसून प्रत्येक नियम आणि कायदे हे |लोकांच्या भल्यासाठी असावेत, जे एकमेकांशी प्रेम, जिव्हाळा निर्माण करतात आणि जेव्हा आपली संस्कृती नागरिकांवर न सोसणारे नियम लादते, लोक त्याखाली दबले जातात, त्या विरुद्ध पाऊल उचलण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला पाचारण करीत आहे. आपल्या चर्चमध्ये किंवा घरामध्ये असे नियम आहेत का जे एकमेकांशी प्रेम व आदर निर्माण करत नाही ?
प्रार्थना :हे प्रभू, तुझ्या हाकेला योग्य तो प्रतिसाद देण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास मला कृपा दे, आमेन,
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या