सामान्य काळातील १०व सप्ताह
मंगळवार ७ जुन २०२२
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात."
सन्माननीय थॉमस केंपिस
- वर्तनसाक्षी (१३७९-१४७१)
दुष्काळात देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत असलेल्या एलिया संदेष्टाचा वृत्तांत आजच्या पहिल्या वाचनात दिला आहे. परमेश्वराने त्याला सारफथ येथील विधवे कडे पाठविले. ती विधवा गरीब असून स्वत:चे पोट भरणे देखील तिला कठीण होते. मात्र देवाच्या संदेष्टा एलीयाला तिने आश्रय दिला आणि स्वतःच्या ताटातील थोडे जेवण दिले. त्या विधवेला परमेश्वराच्या आशीर्वाद मिळाला. त्यानंतर त्या विधवेचे पीठाचे मडके कधीच रिकामे झाले नाही व तेलाची कुपी आटली नाही.
आपण सर्वजण पुनरुत्थित प्रभू येशूच्या प्रकाशांची लेकरे बनलो आहोत. पापाच्या अंधकारातून आपल्या सर्वांना जीवनाच्या प्रकाशात आणले आहे. आपण आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनात प्रकाश निर्माण करायचा आहे. अंधारात आणि पापात असलेल्या सर्वांसाठी मार्ग दाखविणारा प्रकाश आपल्याला बनता आले पाहिजे.
✝️
पहिले वाचन : राजांच्या १७:७-१६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन "परमेश्वर एलियाद्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही."
काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण साऱ्या इस्राएल देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तेव्हा एलियाला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की :
“चल, सिदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा. पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.” त्याप्रमाणे तो सारफथ येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, “मला एका पात्रात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये," ती पाणी आणायला जात असता त्याने तिला आणखी एकदा हाक मारून सांगितले, “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा माझ्यासाठी घेऊन ये." ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू." एलिया तिला म्हणाला, “भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज. कारण इस्राएल देव परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही," तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती आणि तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४:२-३,४-५,७-८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हांवर पाड.
१) हे माझ्या न्यायदात्या देवा,
मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक.
मला तू पेचातून मोकळे केले आहेस,
माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.
अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची
अप्रतिष्ठा कोठवर चालणार ?
तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार?
तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार ?
२) तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने आपणासाठी
भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे.
मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.
त्याची भीती बाळगा, पाप करू नका,
अंथरुणात पडल्यापडल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा.
३) "आमचे कल्याण कोण करील ?"असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड.
धान्याची आणि द्राक्षरसाची समृद्धी झाली
म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद
तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो..
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:१३-१६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्ही जगाचा प्रकाश आहा.'
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: "तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल ? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही."तुम्ही जगाचा प्रकाश आहा. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.' "
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आपल्या दैनंदिन जीवनात मीठ ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मिठाचे प्रामुख्याने तीन फायदे आहेत. प्रथम ते चव देते, दुसरे म्हणजे मीठ पदार्थाचे जतन करण्यासाठी वापरले जाते आणि तिसरे म्हणजे मीठ विशिष्ट आजारपणासाठी औषध म्हणून देखील वापरले जाते. यहुद्यांसाठी मीठ शुद्धतेचे प्रतीक आहे. जेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात", तेव्हा तो त्यांना त्यांची ओळख आपले अनुयायी म्हणून करून देत आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपल्याला या पृथ्वीवर मिठासारखे जगले पाहिजे. ख्रिस्ताची घोषणा करून आणि आपल्या रोजच्या प्रार्थनेद्वारे आपण इतरांच्या जीवनात मिठासारखी चव आणली पाहिजे. आपण ख्रिस्ती जीवनाचे मूल्ये अनुसरून जगलो पाहिजे. आपण आपल्या शेजाऱ्यांच्या जीवनात आजारपणासाठी औषध म्हणून जगलो पाहिजे. आज आपल्याला पापाचा प्रसंग टाळून मिठासारखे शुद्ध राहण्यास देखील सांगितले आहे. अशाप्रकारे आपण स्वर्गात जाण्यासाठी स्वतःची तयारी करू. आपण स्वतःला विचारूया, मी पृथ्वीचे मीठ आहे का? मी इतरांच्या जीवनात आनंद आणतो का ?
प्रार्थना : हे प्रभू, तुझी तारणदायी वचने आत्मसात करुन प्रकाशात चालण्यास व इतरांना तुज जवळ आणण्यास आम्हांला, सामर्थ्य व प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या