सामान्य काळातील १०व सप्ताह
सोमवार ६ जुन २०२२
आईला म्हटलें, बाई, पाहा, हा तुझा मुलगा, मग त्यानें त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई!
पवित्र मारिया ख्रिस्तसभेची माता
आजचा सण 'पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता' हा असून २०१८ साली पोप फ्रान्सिस ह्यांनी पवित्र आत्म्याच्या सोहळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी तो साजरा करण्यात यावा असे घोषित केले. पॅन्टेकोस्टच्या दिवशी पवित्र मरियेसह प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला
पोप पॉल सहावे ह्यांनी मरिया देवाची माता हा सोहळा १९७० साली अधिकृतपणे साजरा केला. हा सोहळा आपण नववर्षाच्या दिनी १ जानेवारीला साजरा करतो. देवानेच ध. कु. मरियेची निवड देवपुत्राची माता होण्यासाठी केली होती. (लूक१:२६-३८) मरियेचा जन्म निष्कलंक गर्भसंभवाने झाला हे ख्रिस्तसभा मान्य करते.
मरिया प्रभू येशूच्या जन्मापासून ते त्यांच्या वधस्तंभावरील मरणापर्यंत त्याच्या बरोबर होती. प्रभू येशू वधस्तंभावर यातना सहन करीत असतानाच त्याने आपल्या आईला जगाची माता म्हणून जाहीर केले. येशूने आपल्या आईला म्हटले, 'बाई पाहा, हा तुझा मुलगा' शिष्याला म्हटले, 'पाहा ही तुझी आई.' अशाप्रकारे मरिया माता योहानाची आणि सर्वांची आई बनली. प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर माडीवरील खोलीत प्रार्थनेत सहभागी होत असे. मरिया मातेच्या मार्गदर्शनानुसार प्रेषिताचा विश्वास बळकट होत गेला म्हणूनच ती सर्व प्रेषितांची माता आणि राणी बनली. आजच्या पहिल्या वाचनात सांगितले आहे की एवा संपूर्ण जिवधारी जनांची माता होती, आणि तिच्या अधःपतनानंतर मरियामातेद्वारे तारणारा जन्मणार होता त्यामुळे मरिया माता सर्वांची माता बनली होती आणि ती आज प्रत्यक्षपणे संपूर्ण जगाची माता बनली आहे, हे आपण मान्य करतो.
ख्रिस्तसभेत मरियामातेला देवाची माता आणि संपूर्ण ख्रिस्तसभेची माता असा सर्वोच्च सन्मान आपण देतो. आपल्या सर्वांसाठी मरिया मातेच्या मध्यस्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्या मध्यास्थीने ख्रिस्तसभा वैभवाने व डौलाने उभी आहे. ती संपूर्ण ख्रिस्तसभेची माता बनून आपल्याला तिच्याद्वारे कृपा व आशीर्वाद लाभत आहे.
✝️
पहिले वाचन : उत्पत्ती ३:९-१५.२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन"तू आणि स्त्री यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन."
आदामने बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस ?" तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय ?’’
आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले," परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस ?" स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला,
"तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस.
तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील.
तू आणि स्त्री,
तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.
ती तुझे डोके ठेचील
आणि तू तिची टाच फोडशील."
आदामाने आपल्या पत्नीचे नाव एवा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८७:१-३,५-७
प्रतिसाद : परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
याकोबाच्या सर्व वसतीस्थानांहून सीयोनेची द्वारे
त्याला अधिक प्रिय आहेत.
२) हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात;
सीयोनेविषयीं म्हणतील कीं, हा आणि
तो तिच्यांतच जन्मले होते, आणि
परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
३) लोकांची नांवनिशी करितांना ह्याचा
जन्म तेथलाच, असें परमेश्वर लिहील.
गायन व नृत्य करणारे म्हणतील :
"माझे सर्व उगम तुझ्याच ठायीं आहेत."
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
कारण 'त्याने' आपल्या 'दासीच्या दैन्यावस्थेचें
अवलोकन केलें आहे.' पाहा, आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १९:२५-३४
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई. त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटलें, बाई, पाहा, हा तुझा मुलगा, मग त्यानें त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई! आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर, आतां सर्व पूर्ण झाले आहे हें जाणून येशूनें शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, मला तहान लागली आहे. असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूनें आंब घेतल्यानंतर, पूर्ण झाले आहे,' असे म्हटलें; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या कुशीत भाला तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशीं शरीरें वधस्तंभावर राहूं नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावें अशीं यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वध स्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले; परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत; तरी शिपायांतील एकानें त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : जेव्हा येशू मरिया मातेला क्रुसावरून असे म्हणतो, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा” तेव्हा ती ख्रिस्तसभेची आई होते. तिथेच मरियेने आपल्या मुलाची शेवटची इच्छा स्वीकारली. क्रुसाच्यापायाशी असलेल्या संत योहानाच्या स्वीकृतीमध्ये तिने संपूर्ण ख्रिस्तसभेला आपले लेकरू म्हणून मिठी मारली. तर मरिया आपल्या सर्वांची आई आहे. मरिया ही देवी नाही! ती फक्त एक आई म्हणून आम्हाला दिली आहे. ती दयाळू प्रेमळ आणि साधी आई आहे. म्हणून तिच्याकडे आम्ही सांत्वन व मदत मिळवण्यासाठी नेहमीच जातो. ज्यावेळी शिष्यांना गरज भासली तेव्हा तिने त्यांना सोडले नाही. तसेच ती आम्हाला कधीही सोडणार नाही. आजचा दिवस हे स्मरण करून देतो की मरिया ही आमची आई आहे. ती आमच्या गरजेनुसार मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. आज आपण आपल्या मरिया मातेकडे जाऊया, ती एका आईसारखी आमचे म्हणणे ऐकण्यास सतत तयार आहे. ख्रिस्तसभेची आई या नात्याने पवित्र मरियेला माझ्या जीवनात कोणते स्थान आहे ?
प्रार्थना : हे पवित्र मरिया माते, तू आमची माता आहेस. तुझ्या मध्यस्थिने, तुझ्या उदाहरणाद्वारे, तुझ्या उपस्थितीद्वारे आणि तुझ्या दर्शनाने तू आम्हाला प्रभूची सुर्वाता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या