पवित्र आत्म्याच्या आगमनाचा रविवार
५ जुन २०२२
"तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो."
(पवित्र आत्म्याचे आगमन सोहळा)
पुनरूत्थानाच्या दिवशी संध्याकाळी भीतीने दारे बंद करून राहात असलेल्या ठिकाणी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना दर्शन दिले. प्रभू येशूच्या दर्शनाने शिष्यांची भीती नष्ट झाली आणि ते आनंदित झाले. त्यानंतर प्रभू येशूने त्यांना म्हटले, 'तुम्हास शांती असो.' शांती वर्षाव करुन प्रभूने प्रेषितांना त्यांच्या कार्याची दीशा दाखवली. त्यानंतर शक्ती, सामर्थ्य व कृपेचा वर्षाव करणारा पवित्र आत्मा त्यांना दिला व म्हटले, 'पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्याचबरोबर प्रभू येशूने सर्व प्रेषितांना पाप क्षमा करण्याचा अधिकार दिला.
सार्वजनिक हितासाठी पवित्र आत्म्याद्वारे ज्ञान, विद्या, विश्वास, आरोग्य व संदेश अशा कृपा दानांचे वरदान प्राप्त होत असते.
पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त कृपादानांच्या प्रेरणेने सेवा कार्य करण्यासाठी सर्वांना पाचारण करण्यात आले आहे. पवित्र आत्म्याठायी आपणा सर्वांना शांती, मुक्ती व प्रेरणा लाभावी आणि पवित्र आत्म्याची फळ जीवनात दिसून यावी म्हणून आज विशेष प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले. "
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या सुसाट्यासारखावाऱ्याचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोधंळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आह्वयनि थक्क होऊन म्हणाले, "पाहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदीया, कप्पुदुकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंफूलिया, इजिप्त आणि कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहुदी आणि यहुदीयमतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगतांना ऐकतो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०४: १,२४,२९-३१,३४
प्रतिसाद : प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर !
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस.
हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!
तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे.
२) तू त्यांचा श्वास काढून घेतोस
तेव्हा ते मरून मातीत मिळतात.
तू आपला आत्मा पाठवतोस
तेव्हा ते उत्पन्न होतात आणि
तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
३) परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो !
परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो!
मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो.
परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.
दुसरे वाचन करिंथ १२:३-७,१२-१३
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे."
पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही "येशू हा प्रभू आहे" असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पवित्र आत्म्या, ये, तुझ्या श्रद्धांवतांची हृदये व्यापून टाक आणि तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर आलेलुया!
आलेलुया !
शुभवर्तमान योहान २०:१९-२३
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा."
त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : यहुदी लोक वर्षातून तीन वेळा जेरूसलेमची वारी करीत. वल्हांडण सण, मंडपांचा सण आणि पेन्टेकॉस्टचा सण. इजिप्तच्या गुलामगिरीतून झालेली सुटका, सिनाई पर्वतावर देवाने त्यांच्याशी केलेला करार आणि त्यांच्या पूर्वजांनी केलेला प्रवास ह्यांची आठवण त्यानिमित्ते साजरी केली जाई. पुढे यहुदी धर्मातून ख्रिस्ती झालेले येशूचे शिष्य वल्हांडणऐवजी पवित्र मिस्सा साजरी करू लागले. पेन्टेकॉस्ट ह्या यहुदी सणाच्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरल्याने ते हा सोहळा साजरा करू लागले. हा सोहळा पवित्र आत्म्याचे ख्रिस्तसभेतील स्थान अधोरेखित करतो.
१. पवित्र आत्मा ख्रिस्तसभेचे मिशनकार्य व्यापक बनवितोः पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरल्यानंतर ते विविध भाषांमधून देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. त्यावेळी एकूण तेरा ठिकाणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ह्या तेरा ठिकाणांहून जेरूसलेमला आलेल्या लोकांनी प्रेषितांना आपापल्या भाषेतून बोलताना ऐकले. ह्याच भाषांच्या देणगीचा वापर करून प्रेषित जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले व तिथे त्यांनी ख्रिस्तसभेचे मिशनकार्य सुरू केले.
२. पवित्र आत्मा ख्रिस्ती श्रद्धावंताला जागतिक व पापी प्रवृत्तीशी सामना करण्याची शक्ती देतोः
आजचे दुसरे वाचन देहाची कर्म आणि पवित्र आत्म्याची फळे ह्यांच्यातील फरक आपल्यासमोर सादर करते. फळांवरून झाडाची परीक्षा करता येते असे आपल्या शिष्यांना येशूने शिकविलेले आहे. खिस्ती श्रद्धावंत जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत / वागत राहिला तर तो पवित्र आत्म्याची फळे (प्रीती, आनंद, शांती...) धारण करतो. तो जर देहाची कर्मे करीत राहिला तर तो कृपेच्या अवस्थेतून पापाच्या अवस्थेत जातो.
३. पवित्र आत्मा ख्रिस्तसभेला व ख्रिस्ती व्यक्तीला देवाची योजना प्रकट करतो : आजच्या शुभवर्तमानात सत्याचा आत्मा आपल्या प्रेषितांना कशाप्रकारे सत्य प्रकट करील आणि सर्व सत्यात नेईल, त्याविषयी येशू मार्गदर्शन करतो. ख्रिस्तसभा महत्वाच्या प्रसंगी पवित्र आत्म्याकडे विशेष प्रेरणा, ज्ञान, शहाणपण व कृपा मागते व मगच आपले प्रकल्प राबवीत असते. ख्रिस्ती व्यक्तीने देखील नेहमी पवित्र आत्म्याचे सहाय्य घ्यायला हवे.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात पवित्र आत्म्याची फळे जास्त प्रमाणात दिसून येतात की देहाची कर्मे ?
प्रार्थना : हे परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आमचा प्रेरक व मार्गदर्शका, आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर व आम्हाला प्रभूची सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या