पुनरुत्थान ७ वा सप्ताह
शनिवार ४ जुन २०२२
प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याची सुवार्ता पसरवित असताना त्याचे चमत्कार पाहण्यासाठी किंवा त्याच्याद्वारे आरोग्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्याचा स्वीकार केला असेल. त्या सर्वांनी त्याची सुवार्ता पसरविण्याचे कार्य केले किंवा नाही हे ठाऊक नाही मात्र त्याच्या बारा शिष्यांवर प्रभूने विशेष रितीने ही जबाबदारी सोपविली.
संत पेत्रावर ख्रिस्त मंडळीची जबाबदारी देत असतानाच प्रभू येशू आपल्या सर्वांना बोलवित आहे व म्हणत आहे 'माझ्या मागे ये.' येशूच्या मागे जाणे म्हणजे त्यागमय जीवन जगणे, क्रुसाला स्वीकारणे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, प्रभूची वचने व आज्ञा पाळून पवित्र जीवन जगणे आणि प्रभूची सुवार्ता पसरविणे.
आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास प्रेरणा व कृपा मिळावी म्हणून आपले सर्वस्व प्रभू ठायी समर्पित करु या.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २८:१६-२०,३०-३१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पौल रोम शहरात राहिला. तेथे तो देवाच्या राज्याची घोषणा करीत असे."
आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली, तीन दिवसानंतर पौलने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, "बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरूद्ध आणि पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेममध्ये बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रांवर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुम्हांबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले, इस्राएलच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे." तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११:४-७
प्रतिसाद : हे प्रभो, सज्जनांना तुझे दर्शन होईल.
१) परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे.
परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे.
त्याचे नेत्र मानवांना पाहतात.
त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.
२) प्रभू सज्जनांची आणि दुर्जनांचीही परीक्षा करतो.
पण अत्याचारी माणसांचा त्याला
अगदी मनापासून वीट येतो.
३ परमेश्वर न्यायी आहे,
त्याला धार्मिकता प्रिय आहे.
सज्जनांना त्याचे दर्शन होईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा,
तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे,
तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा
आलेलुया !
शुभवर्तमान योहान २१:२०-२५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहितआहे."
पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे ?" असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, "प्रभू ह्याचे काय ?" येशूने त्याला म्हटले, "मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये." ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वाच्यता बंधुवर्गामध्ये पसरली, तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ?" असे म्हटले होते,जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो आणि ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या कलाकौशल्याने आशीर्वादित केले आहे. देव प्रेम आहे आणि आपण प्रेमळ व्यक्ती व्हावे अशी त्याची इच्छा आहे. येशू, देवाच्या प्रेमाची घोषणा करण्यास व देवाच्या नावाचे गौरव करण्यास या भूतलावर आला होता. हे त्याचे कार्य होते. देवाने प्रत्येकाला जगात तेच कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून देवराज्याचा संदेश सर्व जगापर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे. शुभवर्तमानात जेव्हा पेत्राने शिष्यांच्या भूमिकेविषयी व त्याच्या कार्याविषयी विचारपूस केली तेव्हा येशूने अगदी स्पष्ट उत्तर दिले, “पेत्रा, काहीही असो, तू माझ्या मागे ये." आणि तेच पाचारण देव आज आपणा प्रत्येकांस देत आहे. आपण कोणती सेवा करतो किंवा आपणकुठले कार्य करतो ह्याची पर्वा न करता आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याला येशूचे अनुसरण करण्यासाठी बोलावले आहे. आपले धैर्य देवाच्या प्रेमाची घोषणा करण्यास व देवाच्या नावाचे गौरव करण्यास असले पाहिजे. आपण स्वतःला विचारूया, मी देवाच्या राज्याची सेवा कशी करत आहे? मी कुठलेही सेवाकार्य करत असताना स्वतःचा गौरव करतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझ्या आज्ञेप्रमाणे आचरण करून तुझ्या मागे चालण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या