Marathi Bible Reading | Friday 3rd June 2022 | 7th Week of the Easter |

पुनरुत्थान ७ वा  सप्ताह 

शुक्रवार ३ जुन   २०२२

"होय प्रभू, मी आपणांवर प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे."


संत चार्लस् ल्वांगा व सहकारी 
 रक्तासाक्षी (   १८८६-१८८७)
 
 श्रद्धावंतांची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी धर्मगुरु, धर्मबंधू व धर्मभगिनींवर आहे, त्याचप्रमाणे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची व त्यांना दयाळू व प्रेमळ पित्याजवळ आणण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती माणसाची आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करून त्याची सुवार्ता पसरविण्याच्या पवित्र कार्यासाठी सर्वांना सामर्थ्य, धैर्ध्य व कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

.✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २५:१३-२१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
   "मृत झालेला येशू जिवंत आहे असे पौल म्हणतो. "

अग्रिप्पा राजा आणि बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी येरुशलेममध्ये गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी आणि वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरूद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी आणि वादी हे समोरासमोरयेऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. ह्यास्तव येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी आणि जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा आणि त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी चालवावी हे मला सुचेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, येरुशलेममध्ये जाऊन तेथे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे."

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०३:१-२,११-१२,१९-२०
प्रतिसाद :  परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा,त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर.
 हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
त्याचे सर्व उपकार विसरू नको.

२) कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे, 
तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. 
पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
 तितके त्याने आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.

३) परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे. 
त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, 
जे तुम्ही बलसंपत्र आहा आणि
 त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करता, 
ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी जात आहे पण पुन्हा तुम्हांकडे येईन आणि तुमची हृदये आनंदाने परिपूर्ण होतील. 
आलेलुया !

शुभवर्तमान योहान २१:१५-१९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
      "माझी कोकरे चार, माझी मेंढरे चार. 
न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्रला म्हटले, “योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?" तो त्याला म्हणाला “होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, "माझी कोकरे चार." पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, "योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रीती करतोस काय ?" तो त्याला म्हणाला, "होय प्रभू, मी आपणांवर प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, "माझी मेंढरे पाळ." तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय ?" असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, "प्रभू आपणांला सर्व ठाऊक आहे, मी आपणांवर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे." येशूने त्याला म्हटले, "माझी मेंढरे चार. मी तुला सत्य सांगतो. तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. (तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला) आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, "माझ्या मागे ये."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू पेत्राला एकच प्रश्न तीन वेळा विचारतो. जेव्हा पेत्र येशूसमोर उभा होता तेव्हा येशूला जाणीव होती की, पेत्र तीन वेळा त्याला नाकारणार आहे. पण येशूला त्याच्या चुका दाखवायच्या नव्हत्या. तू मला नाकारशील याबद्दल तो त्याला सल्ला देत नाही, पण येशू पेत्राचे लक्ष प्रेमावर केंद्रित करतो. येशू पेत्राला सांगतो, “मला माहित आहे की तू चुकला आहेस, पण मला हेदेखील माहित आहे की, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे, की मी माझ्या मेंढरांना तुझ्या स्वाधीन करतो." काहीवेळा आपण पेत्राप्रमाणे पाप करतो आणि येशूच्या विरुद्ध जातो. त्या क्षणी आपण आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित करतो. परंतु येशू प्रेमावर लक्ष केंद्रित करतो. आज जर येशूने तुम्हांला तोच प्रश्न विचारला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय ?" 'तुम्ही काय उत्तर देणार ? तुम्हांला येशूला काय म्हणायचे आहे? आज आपण येशूच्या प्रेमावर लक्ष केंद्रित करूया. आपण याच क्षणी येशूला सांगूया कारण येशू आपले ऐकत आहे. आपल्या चुका त्याच्या स्वाधीन करू या.
प्रार्थना :  हे प्रभू येशू, ख्रिस्तसभेतील सर्व व्रतस्थांना आणि प्रापंचिकांना सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास विशेष कृपा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या