Marathi Bible Reading | Thursday 2nd June 2022 | 7th Week of the Easter |

पुनरुत्थान ७ वा  सप्ताह 

गुरुवार २ जुन   २०२२

"हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे


संत मर्सलीन व पीटर 
 रक्तासाक्षी (   ०-३०४)

 

 आपल्या सर्वांमध्ये द्वेष, मत्सर, स्वार्थ, अहंकार, दुष्टता व पापवासना नसावी तर देवाची प्रीति असावी, देवाचे अस्तित्व असावे. सौम्यता, नम्रता,  विश्वासूपणा, चांगुलपणा अशाप्रकारचे दैवी गुण असावेत. विशेषतः ख्रिस्त म्हणतो, “मी त्यांच्यामध्ये असावे”, म्हणजेच आपल्या विचारात, बोलण्यात,  कृतीत व सर्वप्रसंगी ख्रिस्त आपल्यामध्ये असावा. आपल्याद्वारे इतरांना ख्रिस्ताचे दर्शन घडावे म्हणून आपण आज विशेष प्रार्थना करू या.

.✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २२:३०,२३:६-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
  "आता तुला रोम शहरात साक्षी द्यावी लागेल."

यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, "बंधुजनहो, मी परुशी आणि परुश्याचा पुत्र आहे, आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे." तो हे बोलत आहे तोच परुशी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही, असे सदुकी म्हणतात; परुशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुश्याच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, "ह्या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे ?" असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलला मारुन टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, "खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे."त्याच रात्री प्रभू पौलपुढे उभा राहून म्हणाला, "धार घर जशी तू येरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.

१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण 
मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. 
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि
 प्याल्याचा वाटा आहे, 
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.

२) परमेश्वराने मला बोध केला आहे, 
त्याला मी धन्यवाद देतो. 
माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते. 
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
 तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाही.

३) यास्तव माझे हृदय आनंदित होते, 
माझा आत्मा उल्हासतो; 
माझा देहही सुरक्षित राहतो. 
कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
 तू आपल्या भक्ताला कुजण्याचा 
अनुभव येऊ देणार नाहीस.

४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, 
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, 
तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १७:२०-२६
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
    "बापा, त्या सर्वांनी एक होऊन पूर्ण व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, "हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक • व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहे तसे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आणि कळवीन. ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आजच्या युगात आपण अतिशय एकटेपणाचे जीवन जगत आहोत. कित्येक वेळा आपल्याला एकमेकांना पहायला मिळते की, लोक कुटुंबात राहत असले तरी त्यांचे हृदय एकमेकांपासून खूप दूर आहे. आयुष्यातल्या आपल्या वैयक्तिक निवडी आणि अटी आपल्याला काही वेळा आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर नेतात. बऱ्याचदा आपल्या लक्षात हे येत नाही की, ही परिस्थिती आपल्याला दुखावते आणि अस्वस्थ करते. आजच्या शुभवर्तमानात येशू प्रार्थना करतो की, त्याच्या शिष्यांनी प्रेमात एक व्हावे. जसे येशू आणि देव पिता एक आहेत, आपण सुद्धा एक व्हावे अशी येशूची इच्छा आहे. त्यांच्यामधील प्रेम निःस्वार्थी आहे. त्यांना वेगळे करणारे काहीही नाही. त्यांच्यामध्ये परस्पर एकीकरण आणि जीवनाचा समजूतदारपणा आहे. त्यांनी एकमेकांपासून काहीही लपवले नाही. आपण सुद्धा असेच जीवनजगावे ही येशूची प्रार्थना आहे. "मी आणि पिता एक आहोत." आपण स्वतःला विचारूया, मी येशूबरोबर आहे का? मी माझ्या नातेसंबंधांच्या प्रेमात एकत्र आहे का? मी आणि माझे कुटुंबातील सदस्य एक आहोत, असे मी म्हणू शकतो का?

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमची प्रत्येक कृती तुझ्या परिपूर्ण प्रेमाची साक्ष असावी व आम्हाद्वारे तूच प्रतिबिंबीत व्हावास म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन 


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या