पुनरुत्थान ७ वा सप्ताह
बुधवार १ जुन २०२२
"हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे
रक्तासाक्षी (१००-१६६)
चिंतन : "केवळ आपल्या प्रभू ख्रिस्तासाठी छळ सहन करण्याइतके दुसरे काहीही महान नाही. ह्याच छळामध्ये सार्वकालिक आनंद आणि आपला आत्मविश्वास दडलेला आहे.” संत जस्टीन
श्रद्धेत टिकून राहण्यासाठी परमेश्वराच्या कृपेची व दयेची गरज आहे. देवराज्याची सुवार्ता पसरवितांना होणाऱ्या विरोधाची आणि येणाऱ्या संकटांची जाणीव प्रभूला होती म्हणूनच प्रभूने प्रार्थना करीत म्हटले, 'हे बापा, तू त्यांना सत्यात समर्पित कर.'
आपणा सर्व श्रद्धावंतांना देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण केलेले आहे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून प्रभू येशू आपल्यासठीसुद्धा मध्यस्थी करीत आहे. प्रभू येशूला अपेक्षित देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आपण श्रद्धेत दृढ राहून आध्यात्मिकतेत वाढत राहावे म्हणून प्रयत्नशील बनू या.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २०:२८-३८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुम्हांस तुमची वाढ करावयास आणि तुम्हांला तुमचे वतन द्यावयास समर्थ असलेल्या प्रभूकडे सोपवतो."
पौलने इफिसच्या सभास्थानातील वडीलवर्गाला पुढील शब्दांनी उद्देशून म्हटले, "तुम्ही स्वतः कडे आणि ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हांमध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हांपैकीही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. ह्यास्तव मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकाला बोध करण्यास खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा. आता मी तुम्हांला प्रभूकडे आणि त्याच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाढ करायला आणि पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये वतन द्यायला समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वत: जाणून आहा. सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे." असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.
असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले आणि त्यांनी पौलच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. "माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही," असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६८:२९-३०,३३-३६
प्रतिसाद : पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.
१) तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे.
हे देवा, तू आम्हांसाठी जे केले आहे
ते दृढ कर येरुशलेमातील तुझ्या मंदिराकरिता
राजे तुला भेटी आणतील.
२) पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा
प्रभूची स्तोत्रे गा.
पुरातन आकाशांच्या आकाशावर
आरूढ होऊन जो स्वारी करतो,
त्याची स्तोत्रे गा. पाहा, तो आपला शब्द,
सामर्थ्याचा शब्द उच्चारतो.
देवाच्या बलाचे वर्णन करा.
३) इस्राएलवर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात
त्याचे बल आहे. तुझ्या पवित्र स्थानातून कार्य करणारा देव
भयप्रद आहे.इस्राएलचा देव आपल्या लोकांना
बल आणि सामर्थ्य देतो.देवाचा धन्यवाद होवो।
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी देईल. अशासाठी की, त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा राहावे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १७:११-१९
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, "हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आपल्या शिष्यांनी जगामध्ये असावे पण जगाचे होऊ नये, अशी येशूने मनापासून प्रार्थना केली, “जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही” - (१ योहान २:१५). आज जग असत्य आणि खोटेपणाने भरलेले आहे. लोक क्वचितच प्रामाणिक आणि सत्याचे जीवन जगतात. येशू आपल्याला खरे आणि प्रामाणिक जीवन जगण्यास आमंत्रण देतो. शिष्यांनी सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करितो. सत्यात समर्पित केलेले म्हणजे ते सत्याच्या आत्म्याने जगतात. शिष्यांनी चांगले व सत्याचे जीवन जगावे, आणि ते पवित्र व्हावे, अशी येशूने पित्याकडे प्रार्थना केली. आपले अनुयायी एकनिष्ठ, प्रामाणिक आणि सत्यवादी लोक व्हावेत अशी येशूची इच्छा आहे. आज आपण स्वतःला विचारूया, मी सत्यवादी व्यक्ती आहे का? मी कोणाची फसवणूक केली आहे का? मी खोटे बोलतो/ते का? आपण सत्यवादी व्यक्ती होण्याचा दृढ निःश्चय करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुजवर पूर्णपणे विसंबून राहण्यास व धैर्याने सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या