Marathi Bible Reading | Thursday 9th June 2022 | 10 week in ordinary Time

सामान्य काळातील १०व सप्ताह 

गुरुवार ९ जुन २०२२
ख्रिस्त, युगानुयुगीच्या प्रमुख याजक

जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल 

संत एफ्रेम

उपधर्मगुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३०६-३७३)
प्रभू येशूख्रिस्त प्रमुख याजक हा सण १९७३ साली स्पेन मध्ये सुरु झाला. विशेष म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनानंतरच्या गुरुवारी तो साजरा करण्यात येतो. १९८७ साली दैवी उपासना भक्तीच्या (Divine Worship) रोममधील ल अधिकारखाली त्याची उपासना तयार करण्यात आली.
प्रभू येशू ख्रिस्त महायाजक असून त्याने धर्मगुरुपदाची स्थापना केली. त्याचबरोबर  ख्रिस्तयज्ञबली (मिस्सा) समर्पित करण्यासाठी व सेवाकार्य करण्यासाठी तो  धर्मगुरु बनण्यास पाचारण करीत असतो. आजच्या दिवशी सर्व धर्मगुरुंसाठी आपण विशेष प्रार्थना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धर्मगुरुंनी त्याच्या पाचारणासंबंधाने आपल्या जीवनावर चिंतन मनन करण्याचा हा दिवस आहे. त्याचप्रमाणे बाप्तिस्मा स्वीकरलेली प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति प्रभू येशूचे राजेपण,  याजकपण आणि संदेष्टपण ह्यामध्ये सहभागी झालेली आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली प्रीतिची आज्ञा आपल्या जीवनाद्वारे आपण आचरणात आणून ख्रिस्ताच्या शरीराचे व रक्ताचे खरे सहभागीदार बनायचे आहे. प्रभू येशूख्रिस्त आपला महायाजक व आपण सर्वजण देवाची प्रजा  आहेत. ख्रिस्तानुकरण करीत असताना आपण आज सर्व धर्मगुरुंसाठी प्रार्थना  करु या.
✝️   
पहिले वाचन : १राजांच्या   १८:४१-४६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
  “एलियाने प्रार्थना केली आणि आकाशातून पाऊस पडला."

एलिया आहाबला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे." मग अहाब खाण्यापिण्याकरिता वरती गेला. इकडे एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव." त्याने जाऊन पाहिले आणि म्हटले, "काही दिसत नाही." एलिया म्हणाला, “आणखी सातदा जा." सातव्या खेपेस तो म्हणाला, "पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे." एलिया म्हणाला, “अहाबकडे जाऊन सांग, 'रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.' " थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान ह्यांनी आकाश काळेभोर झाले आणि धो धो पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलला चालला होता. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबपुढे इज्रेलच्या वेशीपर्यंत धावत गेला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६५:१०-१३
प्रतिसाद :  हे देवा, सियोनात तुझी स्तुती होवो.

१) तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस,
तू तिला फार फलद्रूप करतोस.
देवाची नदी जलपूर्ण आहे, 
भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.

२) नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस, 
तिचे उंचवटे सपाट करतोस, 
तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस, 
तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.

३ )तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस. 
तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत, 
रानातली कुरणेही समृद्ध होतात.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ५:२०-२६
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही.
"खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडाला पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच ) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल आणि जो कोणी त्याला 'अरे मूर्खा', असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेला पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खरोखर सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आज आपल्याला येशू एक क्षमाशील व्यक्ती होण्यासाठी बोलावीत आहे. येशू यहुद्यांच्या खोट्या प्रामाणिकपणाबद्दल नाराज होता. त्याने त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले की त्यांचे हृदय देवापासून दूर आहे. ते नियम जसे आहेत तसे पाळत होते, परंतु नियमशास्त्राचा गाभा नाही. पण त्याचा त्यांच्या जीवनावर काहीच परिणाम झाला नाही. आपल्या प्रत्येकावर समान गोष्ट लागू होते. आपण नियमशास्त्राच्या आत्म्याचे अनुसरण करावे अशी येशूची इच्छा आहे. नियम आपल्याला सांगतो की, कुणाचे प्राण घेऊ नका, पण आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांचा द्वेष करतो, त्यांच्याविषयी वाईट बोलतो, त्यांना फसवतो हेच प्राण घेणे आहे. जी व्यक्ती आपल्याला कमीपणाने बघते, आपला द्वेष करते त्यांना क्षमा करा आणि त्यांच्याशी मैत्री करा असे येशू आज आपल्याला सांगत आहे. जर तुम्ही कोणाला तुमच्या शब्दांनी, कृत्यांनी दुखवले असेल तर परमेश्वराकडे प्रार्थना करण्याअगोदर तुम्ही त्या व्यक्तीकडून क्षमा मागा त्यानंतरच प्रार्थना करा. आज आपण मनन करून पाहूया की, आपण कोणाला दुखावले किंवा कमीपणा तर |दाखवला नाही ना ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू महायाजक बनून आम्हा सर्वांना परमेश्वर पित्याच्या देवराज्याचे सहभागीद्वारे बनवले आहेस. आम्हाला तुझी तारणदायी कृपा बहालकर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या