Marathi Bible Reading | Friday 10th June 2022 | 10 week in ordinary Time

सामान्य काळातील १०व सप्ताह 

शुक्रवार १० जुन २०२२

तुझा उजवा डोळा तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो उपटून काढून दे,



संत ऑलिविया 
प्रभू येशू स्पष्ट करीत  आहे की, आपला विचार बाह्य स्वरूपात प्रकट करणारे अवयव म्हणजे डोळा,  हात, पाय ह्याबद्दल चिंतन करावयास प्रवृत्त करीत आहे. आपली प्रत्येक कृती  महत्त्वाची आहे. म्हणूनच ती कृती करताना आपला उद्देश आणि आंतरिक हेतू तपासून पाहायला हवा. देहाच्या प्रेरणेने नाही तर आपण अंतरात्म्याच्या प्रेरणेने शुद्ध जीवन जगण्यास प्रभूकडे प्रेरणा मागू या.
शेवटी प्रभू येशू विवाह संस्काराचे महत्व पटवून देत असताना देवाची  एकनिष्ठेची आज्ञा पाळायला सांगत आहे. आपले वैवाहिक जीवन केवळ  शारीरिक नव्हे तर मानसिक सामाजिक आणि महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक  पातळीत वेळोवेळी तपासून पहावे.
✝️   
पहिले वाचन : १राजांच्या   १९:९,११-१६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
   "तू येथून बाहेर जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा."

एलिया तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्यांला प्राप्त झाले, त्याने त्यांला म्हटले, "तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा; तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरून सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारीत आणि खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलिया, तू येथे कशासाठी आलास?" तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेदी मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत." परमेश्वर त्याला म्हणाला, "तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा; तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलला अभिषेक करून अरामावर राजा नेम. निमशीचा पुत्र येहू याला अभिषेक करून इस्त्राएलवर राजा नेम, तसेच आबेल-महोला येथील शाफाटचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २७:७-९,१३-१४
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.

१) मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे, 
हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, 
माझी याचना ऐक.
“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, 
तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले:

२ )हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला
उत्सुक झालो आहे, 
तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस.
 आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस;
तू माझे सहाय्य होत आला आहेस.

३) ह्या जिवंतांच्या भूमीवर 
परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. 
परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर. 
परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे,
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ५:२७-३२
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने व्यभिचार केलाच आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ “व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते,' हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो उपटून काढून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापाला प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
'कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे,' हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा परित्यक्ता स्त्रीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला व्यभिचाराबद्दल शिकवण देत आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीचे लग्न झालेले आहे आणि तरीही आपण त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा मनात बाळगतो, ह्याला व्यभिचार करणे म्हणतात. येशू आपल्याला सांगत आहे की, जर आपण एखाद्या स्त्री - पुरुष याकडे वाईट नजरेने जरी पाहिले. तर तो मनुष्य आपल्या मनात त्या स्त्री - पुरूषाविषयी व्यभिचार करतो. येशू आपल्याला हे सांगत आहे. कारण मनुष्य स्त्रीकडे लैंगिक समाधानाची वस्तू म्हणून पहातो. काही लोक लहान मूल मुलींकडे वाईट नजरेने पाहतात. हे पाप आहे. इतर स्त्री किंवा पुरुष हे स्वतःची शारीरिक गरज भागविण्यासाठी नाही. ही आज्ञा फक्त लैंगिक संबंधाबद्दल नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेची आहे. आपल्या शरीराचा आणि दुसऱ्याच्या शरीराचा आदर करण्यास शिकवत आहे. आज स्वतःला विचारूया की आपण कोणाकडे वाईट नजरेने पाहिले आहे का ? अंतःकरणात असा विचार केला असेल तर देवाजवळ क्षमा मागूया.

प्रार्थना : हे प्रभू येशू शुद्ध विचाराने जीवन आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या