Marathi Bible Reading | Saturday 11th June 2022 | 10 week in ordinary Time

सामान्य काळातील १०व सप्ताह 

शनिवार ११ जुन २०२२
घरात जाताना 'तुम्हाला शांती असो.' असे म्हणा


संत बर्णबा
•प्रेषित आणि रक्तसाक्षी (इ. स. १-६०)

सायप्रेस (कुप्र) बेटामध्ये एका उच्च कुलीन लेवी वंशात जन्मलेला बर्णबा हा मूळात यहुदी धर्मीय होता. शौलबरोबर तोसुद्धा गमलिएल ह्या विद्वान शास्त्र्याच्या चरणाशी बसून शिकलेला असावा असे मानले जाते. पेन्टेकॉस्टच्या जगप्रसिद्ध घटनेनंतर तो तात्काळ ख्रिस्ती झाला आणि त्याने आपली सर्व मालमत्ता प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवली (प्रे. कृ. ४).
पुढे शौलचे परिवर्तन झाल्यानंतर ह्याच बर्णबाने प्रेषितांना पौलची ओळख करून दिली. पहिल्यांदा प्रेषित पौलला पाहून भ्याले परंतु ख्रिस्ती लोकांचा छळ करणाऱ्या पौलला खुद्द ख्रिस्ताचाच साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्टीकरण बर्णबा ह्याने प्रेषितांना दिले. त्यानंतर पौल प्रेषितांबरोबर मिळून मिसळून राहू लागला.
शौलच्या स्वभावाविषयी बर्णबाला पूर्ण कल्पना असल्यामुळे एकदा हाती घेतलेले कुठलेही काम तडीस नेल्याशिवाय तो राहणार नाही ह्याची बर्णबाला खात्री पटलेली होती. पौल आणि बर्णबा ह्या दोहोंनी ख्रिस्तसभेच्या काळात सुवार्ता प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. त्यामुळे ख्रिस्तसभेने त्या दोहोंना १२ प्रेषितांसमान “प्रेषित” हे पद बहाल केलेले आहे.
आपल्या जन्मभूमीतील सायप्रसमधील आणि कुरेने येथील काही शिष्यांनी अंत्युखिया येथल्या ग्रीक लोकांमध्ये ख्रिस्ती श्रद्धेचा जो प्रसार केलेला होता त्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी पुढे बर्णबा तिथे जाऊन पोहोचला. ते पाहून आपले यहुदी पूर्वग्रह बर्णबाने सोडून दिले. परमेश्वर फक्त यहुदी लोकांमध्येच नव्हे तर परराष्ट्रीयांमध्येसुद्धा त्याची तारणयोजना पूर्णत्वास नेत असल्याचे पाहून पुढील एक संपूर्ण वर्ष त्याने तार्सिसहून आलेल्या शौलबरोबर तिथे सुवार्ता प्रसार करण्यात घालविले.
इ. स. ४५ साली येरूशलेम येथे मोठा दुष्काळ पडलेला होता. ह्या दोन प्रेषितांनी अंत्युखिया येथून येरुशलेमच्या ख्रिस्तसभेसाठी मोठी वर्गणी गोळा करून आणली. तिथून परत जाताना आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्यासाठी त्या दोघांनी योहान मार्क ह्याला आपल्या बरोबर घेतले आणि ते सायप्रस (क्रूप) बेटात सुवार्ताप्रसार करू लागले.
त्यानंतर ह्या दोघांनी आशिया मायनर (तुर्कस्तान) मध्ये ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास सुरूवात केली परंतु तिथे त्यांना मोठ्या विरोधास तोंड दयावे लागले. तरीही त्यांनी तिथे बऱ्याच ख्रिस्तमंडळ्या स्थापन केल्या व स्थानिक नेतृत्व घडविले.
इ. स. ४९-५० साली येरुशलेम येथे भरलेल्या धर्मपरिषदेनंतर (प्रे. कृ. १५) बर्णबा योहान मार्क ह्यांच्यासह पुन्हा एकदा सायप्रस येथे आला. परंतु त्यानंतरचे त्याचे जीवन व मरण ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही. इ. स. ६१ साली त्याला दगडमार करण्यात आला आणि त्यातच त्याचा अंत  झाला असावा असे मानण्यात येते. त्यावेळी योहान मार्क हा रोममध्ये तुरूंगात असलेल्या ऋषीतुल्य पौलची सेवा करीत होता.
बर्णबा हा सौम्य, सभ्य आणि सुज्ञ होता. (संत) पौलनंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत होऊन गेलेले ते एक अत्यंत आकर्षक असे व्यक्तिमत्व होते. पुढे इ. स. ४८२ साली सायप्रस बेटावर त्याचे अवशेष सापडले. बर्णबा ह्याचा अर्थ बोधपुत्र आणि त्याच्या ह्या नावाला तो अखेरपर्यंत जागला.
ख्रिस्तसभा आज संत बर्णबा ह्या संत पौलाबरोबर ख्रिस्ताची सुवार्ता घोषविणाऱ्या प्रेषिताचा सण साजरा करीत आहे. संत वर्णबाचे अनुकरण करण्यास आपण प्रेरणा घेऊ या.
✝️   
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये ११:२१-२६,१३:१-३
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकांतून घेतलेले वाचन
"तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता."
पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्याच्याविषयीचे वर्तमान येरुशलेममधल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बार्नाबसला अंत्युखियापर्यंत पाठवले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करायला तार्सास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याला अंत्युखियाला आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.
अंत्युखियाच्या मंडळीत बार्नाबस, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बार्नाबस आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९८:१-६
प्रतिसाद :   परमेश्वराने (राष्ट्रांसमक्ष स्वतः सिध्द केलेले ) तारण प्रकट केले आहे.

१.) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुतकृत्ये केली आहेत. 
त्याच्या उजव्या हाताने, 
त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२. )परमेश्वराने स्वतः सिध्द केलेले तारण प्रकट केले आहे.
 राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
 इसराएलाच्या घराण्यातील आपली दया 
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३.) पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे.
अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.

४. )परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, 
वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा. 
कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल 
आम्ही तुझी स्तुती करतो.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १०:७-१३
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."

येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, "जात असताना अशी घोषणा करत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' आजाऱ्यांना बरे करा, मेलल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुध्द करा, भुते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना 'तुम्हाला शांती असो.' असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आज आपण संत बार्नाबस, प्रेषित ह्याचा सण साजरा करत आहोत. प्रेषितांची कृत्ये १३:२मध्ये आपण पाहतो, देवाने स्वतः बार्नाबसला बोलाविले आणि त्याच्या कार्यासाठी वेगळे केले. खरोखर, जेथे जेथे देवाच्या पवित्र आत्म्याने त्याचे नेतृत्व केले तेथे तेथे तो सुवार्ता गाजवण्यास गेला. बार्नाबससारखे आपल्या सर्वांना सुवार्ता गाजवण्याच्या कार्यासाठी देवाने पाचारण केले आहे. देवाच्या राज्याची घोषणा करण्याची जबाबदारी बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे प्रत्येकावर सोपवण्यात आली आहे. प्रत्येकाला गरीब आणि गरजवंतांची सेवा करण्याची जबाबदारी देवाने दिली आहे. खरे तर सुवार्ता गाजवणे कठीण आहे. आज आम्ही पाहतो की प्रभूने आपल्या शिष्यांना सांगितले की, तुम्ही झोळी, दुसरा अंगरखा, वाहणा बरोबर घेऊ नका. म्हणजेच तुम्ही या जगाचा आनंद व सुख सोयी यातून पूर्णपणे अलिप्त राहा. जेणेकरून तुम्ही तुमच्यावर सोपविलेल्या कार्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. आज हा सण साजरा करताना आपण स्वतःला विचारूया की, आपण बार्नाबसप्रमाणे सुवार्ता सांगण्यास पूर्णपणे तयार आहोत का? सुवार्तेच्या कार्यापासून आपल्याला विचलित करणारी कोणतीही गोष्ट त्याग किंवा सोडण्यास तयार आहात का ? बार्नाबसप्रमाणे आपण इतरांना देवाशी एकनिष्ठ राहण्यास प्रोत्साहीत करतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने पाळण्यास, तुझ्या आज्ञेप्रमाणे वागण्यास व तुझ्या मागे चालण्यास मला तुझे सामर्थ्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या