रविवार १२ जुन २०२२
पवित्र त्रैक्याचा सोहळा
जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे.
तीन व्यक्ती आणि एकच परमेश्वर ही त्रैक्यस्वरूप
ख्रिस्तसभा आज पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करीत आहे. परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र आणि परमेश्वर पवित्र आत्मा ह्या त्रैक्याचे रहस्य खूप महान आहे. त्याचे आकलन मानवी बुद्धिच्या पलिकडचे आहे.
परमेश्वर पिता निर्माता आहे.
परमेश्वराचा पुत्र सर्वांचा तारणदाता आहे आणि
पवित्र आत्मा पवित्र जीवनदाता आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताने पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याचे व सुवार्ता प्रसाराचे आवाहन आपल्याला केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे आपल्या सर्वांना पित्याचे दर्शन घडविले आहे. त्याची जीवनदायी वचने व कृपासंस्कार आपल्याला त्याच्याशी एकरुप बनवत असतात व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपणास प्रेरणादायी जीवन मिळते.
पवित्र त्रैक्य हे आपल्या ख्रिस्ती जीवनाचे अविभाज्य रहस्य आहे. पवित्र त्रैक्याचे रहस्य दररोजच्या जीवनात आपणाला अनुभवता यावे आणि त्याच्या कृपा सामर्थ्याने प्रभूची सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचविता यावी म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : नीतिसूत्रे ८:२२-३१
वाचक : नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन "ज्ञान पृथ्वीच्या पूर्वी जन्म पावले"८:२२-३१
परमेश्वराचे ज्ञान मोठयाने म्हणते,परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य असे मला पैदा केले.
अनादिकाली, प्रारंभापासून, पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापन झाल्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले, त्या वेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापले तेव्हा मी होते, जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते, त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे, त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी, मनुष्यजातीच्या ठायी मला आनंद होई.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८:४-९
प्रतिसाद : प्रभो, साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे !
१)आकाश जे तुझे अंगुलिकार्य आणि
त्यात तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे,
हे सगळे मी पाहतो. तू मर्त्य मानवांची आठवण करावी,
क्षुद्र मानवजातीची तू पर्वा करावी असा तो कोण?
कनिष्ठ केले आहे, त्याला वैभव आणि
मोठेपणा ह्यांनी अलंकृत केले आहेस,
२.) तरीपण तू त्याला देवापेक्षा किंचित आपल्या
हातच्या कलाकृतींवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस,
सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.
३). शेरडेमेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे,
आकाशातली पाखरे, समुद्रातले मासे,
सागरात संचार करणारे प्राणी देखील
तू त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेत.
दुसरे वाचन रोम ५:१-५
वाचक: संत पौलाने रोमकरांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन
“पवित्र आत्म्यामार्फत आम्हावर वर्षाव करण्यात आलेल्या प्रीतीने ख्रिस्ताद्वारे परमेश्वराकडे."
आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो, त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू जो आहे, जो होता व जो येणार आहे,
त्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांस गौरव असो.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १६:१२-१५
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, आत्मा जे माझे आहे ते घेऊन तुम्हाला कळवील."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : तीन व्यक्ती आणि एकच परमेश्वर ही त्रैक्यस्वरूप परमेश्वराविषयीची शिकवण हा ख्रिस्ती धर्माचा वेगळेपणा आहे. केवळ देव एकच आहे एवढे म्हणने पुरेसे नाही किंवा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन देव आहेत असेही म्हणणे योग्य नाही असे परमेश्वराचे निराळेपण ख्रिस्ती धर्मश्रद्धा जोपासते. ह्या धर्मश्रद्धेचा प्रभाव पुढील चार गोष्टींवर पडलेला दिसतो.
१. ख्रिस्ती प्रार्थना : ख्रिस्ती धर्मातील सर्व प्रार्थना पवित्र क्रुसाच्या खुणेने होत असतात. त्यात पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाचा उल्लेख असतो. तसेच सर्व प्रार्थना पवित्र त्रैक्याला गौरव देऊन संपविल्या जातात. पवित्र मिस्सामधील प्रारंभीचे अभिवादन (आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हांबरोबर असो.) आणि इतर प्रार्थना ह्या देवपित्याला उद्देशून पवित्र आत्म्याच्या ऐक्यात प्रभू ख्रिस्ताद्वारे केल्या जातात. याचाच अर्थ ख्रिस्ती प्रार्थना त्रैक्यस्वरूप परमेश्वराला संबोधून केल्या जातात.
२. प्रवेश साक्रामेंते : बाप्तिस्मा, दृढीकरण आणि ख्रिस्तशरीर ही साक्रामेंते ख्रिस्ती धर्मप्रवेश साक्रामेते मानली जातात. बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे व्यक्ती देवपित्याचे लेकरू बनते, ख्रिस्तशरीर साक्रामेंताद्वारे ती ख्रिस्ताचे शरीर असलेल्या ख्रिस्तसभेचा अवयव बनते. तर दृढीकरण साक्रामेंताद्वारे ती पवित्र आत्म्याचे मंदिर बनते. थोडक्यात पवित्र त्रैक्य व्यक्तीठायी। कार्यरत होते. त्यामुळे ही तीन साक्रामेते स्वीकारल्याशिवाय सेवेची साक्रामेंते (गुरुदीक्षा व लग्न) स्वीकारता येत नाहीत.
३. देवप्रीती :देवावर प्रेम करायचे म्हणजे नक्की कोणावर प्रेम करायचे. ह्या प्रश्नाचे उत्तर पवित्र त्रैक्यात सापडते. निर्माणकर्त्या देवपित्यावर, तारणकर्त्या देवपुत्रावर आणि सांत्वनकर्त्या देव-आत्म्यावर प्रेम करायचे ते केवळ कर्तव्य भावनेपोटी नव्हे तर कृतज्ञतापूर्वक म्हणजे आभाराच्या भावनेने होय.
४. सामुदायिक जीवन : पवित्र त्रैक्यामधील प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. तरीही त्यांच्यात ऐक्य असते. सामुदायिक जीवन जगताना देखील प्रत्येक व्यक्ती अप्रतिम किंवा अद्वितीय आहे हे सत्य जोपासतानाच सर्वांशी मिळून मिसळून वागणे गरजेचे असते. एकीकडे आपले निराळेपण कसे जपायचे तर दुसरीकडे इतरांशी एकरूप होऊन संघटितरित्या कार्य कसे करायचे ते पवित्र त्रैक्याकडून शिकायला मिळते.
आत्मपरीक्षण : माझे प्रार्थनामय जीवन त्रैक्यस्वरूप आहे का? पवित्र त्रैक्य माझ्याठायी वसती करते हे माझ्या जीवनातील निराळेपणा व ऐक्य ह्यांच्या संयोगातून दिसून येते का ?
प्रार्थना : हे पवित्र आत्मा, ये आणि आम्हांला तुझ्या कृपादानांनी भरुन टाक, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या