सामान्य काळातील ११वा सप्ताह
सोमवार १३ जुन २०२२
"जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर;
पादुआचे संत अंतोनी
वर्तनसाक्षी, धर्मपंडित (११९५-१२३१)
पोर्तुगालमधील लिस्बन शहरात जन्मलेला फर्डिनंड बुइलॉन प्रारंभी संत अगस्तीनच्या संस्थेत दाखल झालेला होता. परंतु पुढे १० वर्षानी जेव्हा फ्रान्सिस्कन रक्तसाक्ष्यांचे देह मोरोक्कोहून पोर्तुगालला आणण्यात आले तेव्हा त्याच्याठायी रक्तसाक्षी बनण्याची तीव्र उत्कंठा उत्पन्न झाली. त्याच्या धर्मबंधूंनी त्याला भिक्षुकांच्या संस्थेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. एक फ्रान्सिस्कन भिक्षुक म्हणून त्याने अंतोनी हे नाव धारण केले.
पुढे मोरोक्को येथे पोहोचल्यानंतर तो गंभीररित्या आजारी झाला. त्यामुळे आपण आपल्या मिशनकार्यावरून माघारी परतावे असा त्याने निर्णय घेतला, परतताना मात्र त्याचे जहाज वादळात सापडले व ते सिसिलीच्या किनाऱ्याला लागले. त्याचवेळी असिसी येथे फ्रान्सिस्कन संस्थेची परिषद भरलेली होती. इ. स. १२२१ सालच्या त्या परिषदेला ३००० फ्रान्सिस्कन उपस्थित होते. त्या परिषदेला खुद्द संत फ्रान्सिस असिसीकर हे उपस्थित होते.
अत्यंत नम्र वृत्तीने त्याने आपली पुढे शिकण्याची इच्छा संत फ्रान्सिसजवळ व्यक्त केली. काही काळ त्याला फॉर्लीनजीकच्या एका मठात काबाडकष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी एका धर्मगुरूदीक्षेच्या प्रसंगी त्याने केलेल्या भाषणामुळे त्याला वक्तृत्वाची देणगी असल्याचे सिद्ध झाले.पवित्र शास्त्रातील उताऱ्यावर अंतोनी तर अत्यंत नम्रपणे इतके सुंदर स्पष्टीकरण देत असे की (संत) फ्रान्सिसने त्याला आपल्या धर्मबंधूचे ईशज्ञानाचे वर्ग घेण्यास नियुक्त केले. मात्र हे करीत असताना त्याची भक्ती आणि प्रार्थनाशील वृत्ती यावर परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेण्यास सांगितले! त्यानंतर अंतोनीने दक्षिण फ्रान्समध्ये आणि उत्तर इटलीमध्ये आपल्या स्पष्ट, खणखणीत व मधूर आवाजात प्रवचनाद्वारे सुवार्ताप्रसाराचे कार्य हाती घेतले.
वक्तृत्व आणि विद्वत्ता या कलागुणांव्यतिरिक्त देवाने त्याला चमत्कार करण्याचे, अन्य भाषेत बोलण्याचे आणि संदेश देण्याचे पैलू दिले होते. दहशतवाद, द्वेष, तिरस्कार अशा विकृतींवर त्यांनी आपल्या प्रभावी वक्तव्याने घणाघाती हल्ले चढविले. "पांखडवाद्यांवर उगारलेला हातोडा" असे नामाभिमान प्राप्त झालेल्या अंतोनी ह्याची प्रवचने ऐकण्यासाठी कधीकधी ३०,००० लोक येत असत. त्यांच्या प्रवचनानंतर प्रायश्चित्त संस्कार घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असायची की त्यापुढे धर्मगुरूचा फार मोठा तुटवडा पडत असे.
त्यांच्या प्रवचनानंतर काहींच्या जीवनातील शत्रूत्व कायमचे नाहीसे झाले, अनेकांची कर्जे माफ केली गेली, बऱ्याच जणांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. मोठमोठे दरोडेखोर एकदम प्रामाणिक जीवन जगू लागले. लबाडी करणाऱ्यांनी आपल्याकडील चोरीच्या वस्तू परत केल्या. भ्रष्टाचार टाळण्यासाठी सरकारने कायदे कडक केले.
असा हा प्रभावी सुवार्तिक १३ जून १२३१ रोजी वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी मरण पावला. केवळ एका वर्षातच त्याला संतपद बहाल करण्यात आले. इ. स. १९४६ साली पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना धर्मपंडित ही पदवी दिली.
त्यांना पोर्तुगालचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आलेले आहे. प्रवासी, गर्भवती व निःसंतान स्त्रिया ह्यांचाही तो आश्रयदाता संत मानला जातो. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी आणि वादळात बचाव होण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
चिंतन : पवित्र मरियेचे नाव आपल्या ओठांना मधापेक्षाही गोड, आपल्या कानांना कोणत्याही मधुर गीतापेक्षा श्रवणीय आणि आपल्या हृदयाला अतिशुद्ध आनंदापेक्षा अधिक मौल्यवान असे आहे. -पादुआचे संत अंतोनी
✝️
पहिले वाचन : १राजां २१:१-१६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन "नाबोथास दगडमार होऊन तो मेला. "
इज्रेलकर नाबोथ याचा द्राक्षाचा मळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा आहाब याच्या राजवाड्यापाशी होता. आहाब नाबोथला म्हणाला, "तुझा द्राक्षाचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षाचा मळा देतो किंवा इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो." नाबोथ आहाबला म्हणाला, "माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो." "मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही." असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून आहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.
तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे?" तो तिला म्हणाला, "इज्रेलकर नाबोथ याला मी म्हणालो की, 'पैसे घेऊन मला तुझा द्राक्षाचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षाचा मळा देतो,' यावर तो म्हणाला, 'मला आपला द्राक्षाचा मळा तुला द्यावयाचा नाही." त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलवर आपली राजसत्ता आहे ना? चला, ऊठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इज्रेलकर नाबोथचा द्राक्षाचा मळा मी आपणाला मिळवून देते." मग तिने आहाबच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्यांवर त्याची मुद्रा केली आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन आणि सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले: “उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोथला लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि दोन अधम मनुष्ये त्याच्यासमोर बसवा, 'त्याने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला' अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.” इजबेलच्या पत्रांतील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी आणि सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोथला लोकांसमोर उच्चस्थानी बसवले. दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले. त्या अधम पुरुषांनी लोकांसमोर नाबोथविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला आहे." यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांने इजबेलला सांगून पाठवले की, “नाबोथला दगडमार केला आणि तो मेला."
नाबोथला दगडमार होऊन तो मेला हे इजबेलने ऐकले तेव्हा ती आहाबला म्हणाली, "उठा, जो द्राक्षाचा मळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे." इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे आहाबने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५:२-३,५-७
प्रतिसाद : हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.
१) हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे.
माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.
हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझा धावा ऐक;
कारण मी तुझी प्रार्थना करत आहे.
२) तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस,
दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत.
३) सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे,
असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस.
खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जे वचन सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात
आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:३८-४२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, " 'डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात' असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : निर्गम या पुस्तकात 'डोळ्याबद्दल डोळा आणि दातांबद्दल दात असा नियम लिहिला आहे. परंतु येशूने हा नियम पूर्णपणे बदलला. तो आपल्याला रागाऐवजी दयाळूपणा दाखवण्यास शिकवतो. संत पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात येशूची ही शिकवण अत्यंत संक्षिप्तपणे व्यक्त केली आहे. “वाईटावर वाईट करून विजय मिळवू नका, तर चांगल्या गोष्टींनी वाईटावर विजय मिळवा.” हे आपल्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे, परंतु ते अशक्य नाही. गांधीजी, मार्टिन ल्यूथर किंग, डिट्रिच बोनहॉफर आणि डोरोथी डे, यांनी येशूच्या या शिकवणुकीचे पालन केले. आपली मानवी वृत्ती बऱ्याचदा सूड उगवण्याची असते. आपल्यावर झालेले सर्व शोषण आणि अत्याचाराविरुद्ध येशूने हिंसाचाराचा बदला घेतला नाही, त्याने अहिंसेचा मार्ग पत्करून वाईटावर विजय मिळविला. केवळ ईश्वरीय मदतीने आपण वाईटावर विजय मिळवू शकतो. क्रोध व द्वेषाच्या क्षणी शांत राहण्यास आपण पवित्र आत्म्याची कृपा मागु या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, पश्चातापस, समेट व सहभागितेने जीवन जगून गरजवंतांना सहाय्य करण्यास आम्हांला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या