सामान्य काळातील ११वा सप्ताह
मंगळवार १४ जुन २०२२
तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
संत मेथोडिअस
- कॉन्स्टान्टिनोपलचे पेट्रिआर्क (...८४७)
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मारेकऱ्यांना परमेश्वराने क्षमा करावी म्हणून प्रार्थना करीत म्हटले, 'हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही' (लूक २३:३४). परमेश्वराठायी आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत, तर मग द्वेष कुणी कुणाचा करायचा? देवाने आपल्याला प्रेमाची महान देणगी दिलेली आहे; परंतु आपल्या मानवी स्वभावामुळे आपण द्वेषाला कारणीभूत होत असतो. आपले अंतःकरण परमेश्वराच्या प्रीतिने भरून टाकू या. सर्व प्रकारच्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याजवळ असलेले मुक्तीचे महान हत्यार म्हणजे प्रार्थना.सतत प्रार्थना करणारी व्यक्ती परमेश्वराच्या सहवासात असते, म्हणून अशा माणसावर कुठल्याही अष्ट घटनेचा परिणाम होत नाही. प्रार्थना करणारी व्यक्ती निराशा, अपयश, दुःख व संकटे आली असता आपला तोल कधीच ढळू देत नाही. आज प्रभू येशू आपल्याला म्हणतो, 'जे (तुमचा) छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.'
आपल्या बंधु भगिनीच्या अपराधांबद्दल त्यांना क्षमा करून आपण त्यांच्या परिवर्तनासाठी प्रभूकडे प्रार्थना करू या..
✝️
पहिले वाचन : १राजां २१:१७-२९
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन"तू इस्त्राएल लोकांना पाप करायला लावले."
एलिया तिश्बी याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “ऊठ, शोमरोननिवासी इस्राएलचा राजा आहाब याच्या भेटीला जा." तो नाबोथच्या द्राक्षाच्या मळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो गेला आहे. तू त्यांना सांग, 'परमेश्वर म्हणतो, "तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे काय ?" 'परमेश्वर आणखी म्हणतो: “ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोधचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील."
आहाब एलियाला म्हणाला, "माझ्या वैऱ्या , तू मला गाठलेस काय ?" तो म्हणाला, "होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू आपणास विकून टाकले आहेस. पाहा, तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझा धुव्वा उडेल आणि आहाबचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. तू मला संताप आणला आणि इस्राएल लोकांना पाप करायला लावले, यास्तव मी तुझ्या घराण्याचे नवाटचा पुत्र यराबाम आणि अहियोचा पुत्र बाशा यांच्या घराण्यांप्रमाणे करीन. इजबेलविषयी परमेश्वर असे म्हणतो, 'इजेलच्या तटावर इजबेलला कुत्री खातील.' आहाबचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील."
(आहाबसारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करण्यास स्वत:ला विकून टाकले होते. परमेश्वराने इस्राएलपुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली.)
एलियाचे हे शब्द ऐकून आहाबा ने आपली वस्त्रे फाडली आणि अंगाभोवती गोणपाट गुंडाळून उपवास केला, तो गोणपाटावर निजू लागला आणि मंदगतीने चालू लागला. यांनतर एलिया तिश्बी याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, “आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना ? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१:३-६,११,१६
प्रतिसाद : प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे.
१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर.
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.
मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक,
२) माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.
कारण मी आपले अपराध जाणून आहे,
माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.
तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे,
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
३ ) माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव;
माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा,
माझ्या उद्धारक देवा,
तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर,
म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि
जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत,.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“आपल्या वैऱ्यांवर प्रीती कर."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करतात ना? तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना नवीन आणि सर्वात अवघड अशी गोष्ट सांगत आहे. ती म्हणजे आपल्या वैऱ्यावर प्रेम करून त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. हे करणे खूप अवघड आहे. आपण आपल्या वैऱ्यावर प्रेम कसे करू शकतो हे आपण नक्कीच विचारतो ? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देव आपल्याविषयी हा प्रश्न विचारत नाही. जरी आपण त्याच्याविरुद्ध गेलो तरी तो आपल्याला क्षमा करणारच. आपण पापी होतो तरीही येशूने आपल्यावर प्रेम केले. येशूने आपल्या मारेकऱ्यांना, ज्यांनी त्याला असंख्य वेदना दिल्या, त्यांना येशूने क्षमा केली व त्यांच्यासाठी क्रुसावरून प्रार्थना केली. जर आपल्याही जीवनात असे लोक असतील ज्यांचा आपण द्वेष करतो किंवा तो आपला द्वेष करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण ख्रिस्ती आहोत म्हणून कुणाचेही वाईट व्हावे अशी इच्छा आपण आपल्या मनात धरू नये. जे आपल्याला दुखावतात त्यांना आपण आशीर्वाद देऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. आज आपण ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सर्व व्यक्तींसाठी प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू, जिथे द्वेष आहे तिथे मला प्रेम पेरू दे, जिथे दुखावलेली मनं आहेत तिथे मला क्षमा आणू दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या