सामान्य काळातील ११वा सप्ताह
बुधवार १५ जुन २०२२
“एक अग्नीरथ दृष्टीस पडला आणि एलिया स्वर्गात गेला. "
तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
- कुमारिका (१५७९-१६०१)
तौलोसे (फ्रान्स) येथल्या एका गरीब शेतमजूराची ही मुलगी, एका हाताने अधू होती. केवळ नवजात बालिका असतानाच तिची आई देवाघरी गेली होती. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईने तिला अत्यंत तिरस्कारणीय अशी वागणूक दिली. बऱ्याच वेळा तिला घराबाहेर ठेवण्यात येई. परतुं जर्मेन हिची नम्रता व सहनशीलता पाहून देवाने तिला आपल्या दिव्य सहवासाचे, अतिपवित्र साक्रामेंतावरील प्रेमाचे आणि पवित्र मरियेच्या कृपापूर्ण उपस्थितीचे वरदान दिलेले होते. त्यामुळे त्याही परिस्थितीत ती हसतमुख होती.
तिला घराबाहेर काढल्यानंतर ती दुर्मुखलेल्या चेहऱ्यांनी रडत बसली नाही तर तिने आपल्या परिसरातील लहान मुले जमविली. त्यांना येशू व मरियेविषयीच्या कथा सांगितल्या. इतकेच नव्हे तर तिला जे थोडेथोडके अन्न मिळत असे त्यातील थोडासा वाटा ती आणखी गरीब असलेल्या मुलांना देत असे.
आपल्या परिसरात वाढत असलेल्या पाखंडवादी विचारसरणीमुळे तिने उपवास आणि आत्मक्लेश करायला सुरूवात केली. वयाच्या २२ व्या वर्षी तिला देवाघरचे बोलावणे आले. तेव्हा कुठे जनमाणसांत तिच्या पावित्र्याविषयीची जाणीव लोकांना होऊ लागली होती. पोप पायस नववे ह्यांनी २९ जून १८६७ साली तिला संतपद बहाल केले. प्रत्येक वर्षी १५ जून रोजी तिचे अवशेष असलेल्या पिबँक चर्चमध्ये तीर्थयात्रा आयोजित केली जाते.
✝️
पहिले वाचन : १राजां २:१,६-१४
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन “एक अग्नीरथ दृष्टीस पडला आणि एलिया स्वर्गात गेला. "
परमेश्वराने एलियाला वावटळीच्याद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला त्यावेळी एलिया अलिशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. तेव्हा एलिया म्हणाला, “अलिशा, परमेश्वर मला यार्देनकडे पाठवत आहे. तू तेथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वरांच्या आणि आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही." मग ते दोघे पुढे चालले. संदेष्ट्यांचे पन्नास शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देनतीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभंग झाले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग." अलिशा म्हणाला, “आपल्याठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्याठायी यावा.” एलिया म्हणाला, "तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्यासमयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही." ते बोलत चालले असता, पाहा, एकाएकी एक अग्निरथ आणि एक अग्निवारू दृष्टीस पडले आणि त्यांनी त्या दोघांना अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गात गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, "माझ्या बापा ! माझ्या बापा! इस्राएलच्या रथांनो!इस्राएलच्या राउतांनो!" तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे दोन दोन तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनतीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे ?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३१:२०,२१,२४
प्रतिसाद : (अहो परमेश्वराची आशा धरणारे,)
तुम्ही सर्व हिंमत धरा धीर सोडू नका.
१ )तुझे चांगुलपण किती थोर आहे !
तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे,
तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी
मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.
२) तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी
मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस,
शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.
३) अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो,
तुम्ही त्याच्यावर प्रेम करा,
परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो
परंतु गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे;
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:१-६,१६-१८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.
“जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशारीतीने तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.
"तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे करू नका, लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानांत आणि चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे ढोंगी लोकांना आवडते. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.
"तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आजच्या शुभवर्तमानात येशू सांगू इच्छितो की, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृतीनुसार प्रतिफळ मिळेल. आजची दोन्ही वाचने प्रतिफळाबद्दल सांगत आहेत. दाविद राजा, त्याच्या मुलाला शलमोनला, सूचना देतो, की जे राजाचे मित्र आहेत व ज्यांनी स्वतःला राज्याचे शत्रू बनविले त्यांच्याशी कसे वागावे. त्यांना त्यानुसार त्यांचे प्रतिफळ मिळेल. शुभवर्तमानातही, येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की, मानवांकडून नव्हे तर देवाकडून प्रतिफळ मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण इतरांचे चांगले करत राहावे. लक्षात ठेवा, आपल्यासाठी जर लोक चांगले करतात त्यांना आपण चांगले प्रतिफळ देतो, तर मग देव आपल्याला आपल्या चांगुलपणाचे प्रतिफळ आपल्या पेक्षा जास्त देणार नाही काय ? आज आपण एक चांगले कृत्य करण्याचा निर्णय करू या. कदाचित आज आपण गोरगरीब लोकांना काही दान देऊ शकतो किंवा आपण आपल्या देवाबरोबर काही क्षण एकाकी बसूया. देव आपल्याला याचे प्रतिफळ नक्कीच देणार.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमचे आचरण शुद्ध कर व तुला संतोषकारक असावे म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या