Marathi Bible Reading | Thursday 16h June 2022 | 11 week in ordinary Time

सामान्य काळातील ११वा  सप्ताह 

गुरुवार १६ जुन २०२२




 संत जॉन फ्रान्सिस रेजिस
- वर्तनसाक्षी (१५९७-१९६४०)

चिंतन : हे माझ्या देवा! तुझ्या पवित्र नावासाठी आणखी आत्मक्लेश भोगण्याची संधी मला दे, ह्या दुःखसहनात किती आनंद आहे! मी आता सुखाने मरणाला सामोरा जाईन. - संत जॉन रेजिस

तुझे राज्य येवो.'
एलिया सतत देवाच्या सहवासात असायचा व देवाबरोबर जणू तो संवाद  साधायचा. एलियाच्या प्रार्थनेने अनेक चमत्कार घडले. एलियाने लोकांवर दुष्काळ ओढवला. आकाश बंद पाडले. तीन वेळा अग्नी खाली उतरविला. एलियाने पाऊस पाडला तसेच एलियाला स्वर्गात घेतले गेले. एलिया प्रार्थनेद्वारे देवाशी एकरुप झाला होता.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रार्थना करायला| शिकवत आहे. 'हे आमच्या स्वर्गातील पित्या' ही सुंदर व प्रभावी प्रार्थना सर्व जगाच्या कल्याणासाठी एक वरदान आहे. देवाबरोबर सहभागिता वाढविणारी, बंधुत्व नाते वृद्धिंगत करणारी ही प्रार्थना  केली पाहिजे. ह्या प्रार्थनेचा अर्थ लक्षात घेऊन ती केली तरच देवाचे राज्य पृथ्वीवर येईल. प्रभू येशूने शिकवलेली ही एकमेव प्रार्थना जगातील सर्व  ख्रिस्तीजनांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देवाचे राज्य ह्या पृथ्वीवर यावे  यासाठी प्रभूने ही प्रार्थना शिकवली. कारण प्रभू देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आला  होता.आपला सर्वांचा पिता स्वर्गात आहे म्हणजेच आपण सुद्धा स्वर्गीय राज्याचे सहभागीदार आहोत मात्र आपण आपली वागणूक व आचरण पद्धतीवर विचार मंथन करणे गरजेचे आहे.

प्रार्थनेसाठी अडथळा बनणाऱ्या सर्व गोष्टी बाजूला सारुन देवाला साद | घालू या. स्वर्गातील आपला पिता प्रेमळ, दयाळू व कनवाळू आहे. आपण सर्वजण त्याला प्रिय आहोत. आपण त्याच्याशी अंतर्मनातून संवाद साधण्याचा प्रयत्न करु या. 
✝️   
पहिले वाचन :  बेनसिरा  ४८:१-१४
वाचक : बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“एलियाला वावटळीने आच्छादले आणि अलिशास त्याची आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली."

एलिया संदेष्टा अग्निसमान प्रकट झाला, त्याचे वचन मशालीप्रमाणे धगधगीत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि आपल्या उत्साहाच्या भरात त्यांची संख्या कमी केली. त्याने परमेश्वराच्या शब्दाद्वारे आकाशाचे दरवाजे बंद केले आणि तीन वेळा अग्निवर्षाव पण केला. हे एलिया, तू आपल्या चमत्कारात किती महान होतास? तुझ्यासमान दुसरा कोण प्रौढी मिरवू शकेल ? सर्वश्रेष्ठ प्रभूच्या आज्ञेने तू एका मृत मनुष्याला मृत्यू व अधोलोकातून परत आणलेस; तू राजांचा सर्वनाश केलास, प्रतिष्ठितांना खाली पाडलेस; सिनाई पर्वतावर आरोप आणि होरेब पर्वतावर प्रतिकार तुझ्या कानी पडले; तू सूडास योग्य शिक्षा देण्यासाठी राजांना आणि तुझा वारसा चालवण्यासाठी संदेष्ट्यांना अभिषेक केलास. अग्नीच्या वावटळीने आणि अग्निअश्वरथातून तू वर आकाशात घेतला गेलास. तुझ्या बाबतीत असे लिहिले आहे की, परमेश्वराचा क्रोध भडकण्याआधी, बाप आणि मुलगा यांचा समेट करण्यासाठी आणि याकोबच्या वंशांचा उद्धार करण्यासाठी, नेमलेल्या वेळी तू हजर होशील. ज्यांना तुझे दर्शन घडले ते आणि ज्यांचा सुखदायी प्राणान्त झाला ते सर्व भाग्यशाली होत. आम्हीसुद्धा सर्व अवश्य जिवंत राहू.
जेव्हा एलियाला वावटळीने आच्छादले तेव्हा अलिशास त्याची आध्यत्मिक शक्ती प्राप्त झाली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तो कोणत्याही राज्यकर्त्यापुढे डगमगला नाही आणि त्याच्यावर कोणीही आपला अधिकार चालवू शकला नाही. त्याला काहीच अशक्य नव्हते आणि जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे मृत शरीर दैवी संदेश देऊ लागले. जसे आपल्या जीवनात त्याने अनेक चमत्कार केले, त्याचप्रमाणे त्याने मृत्यूनंतरही अद्भुत कृत्ये केली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९७:१-७
प्रतिसाद :   नीतिमान जनहो, प्रभूठायी हर्ष करा.

१) परमेश्वर राज्य करो, पृथ्वी उल्हास करो;
 द्वीपसमूह हर्ष करो; ढग आणि 
अंधार त्याच्याभोवती आहेत, नीती आणि 
न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.

२) त्याच्यापुढे अग्नी चालतो, की आणि 
त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो. 
त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले, 
ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली.

३) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर 
पर्वत मेणाप्रमाणे वितळले. 
आकाशाने त्याची नीती प्रकट केली; 
सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.

४) जे कोरीव मूर्तीची उपासना करतात,
जे मूर्तीचा अभिमान बाळगतात
ते सर्व लज्जित झाले.
अहो, सर्व दिव्यदूतहो, त्याच्या चरणी लागा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो,
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात,
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ६:१-६,७-१५
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तुमच्या स्वर्गातील पित्याकडे प्रार्थना करा."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा :“हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव."“कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :जेव्हा आपण इतरांबरोबर व देवाबरोबर चांगले संबंध ठेवतो. तेव्हा आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आजच्या समाजात राहून असे म्हणता येईल की, देवावर विश्वास ठेवणे असंभव आणि ती ज्याची त्याची खाजगी बाब आहे. आजच्या जगात जीवन जगत असताना काही लोकांना वाटते की आपल्याकडे पुरेसा पैसा आहे, आपण आपले जीवन स्वतःच्या हिमतीवर जगू शकतो. आजचे पहिले वाचन आपल्याला आठवण करून देते की, परमेश्वर आपल्या जीवनाचा स्त्रोत आहे, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. शुभवर्तमानात येशू आपल्याला शिकवत आहे की, आपण देव आणि मानवांशी आपले नाते जोडले पाहिजे, हीच आपली रोजची गरज आहे. देव पित्यावर विश्वास ठेवा म्हणजे एका पित्याच्या नात्याने आपल्या सर्व गरजा तो पूर्ण करील. आणि आपण आपल्या क्षमाशील स्वभावाद्वारे एकमेकांशी शांती-सलोख्याने राहायला हवे. आज प्रार्थना करीत असताना आपण हेच मागूया की आपला देवावरील विश्वास दृढ होवो. आपली रोजची गरज आपल्या पिता परमेश्वराला सांगूया. आपण स्वतःला विचारूया की, आपले देवाबरोबर व इतरांशी चांगले संबंध आहेत का, कारण हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी गरज आहे.

प्रार्थना : हे प्रेमळ पित्या, तुजबरोबर संवाद साधण्यास, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझे राज्य आम्हामध्ये आणण्यास आमचा वापर कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या