सामान्य काळातील ११वा सप्ताह
शुक्रवार १७ जुन २०२२
जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन लागेल
“स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.' "
संत ग्रेगरी बार्बारिगो
- महागुरू , वर्तनसाक्षी (१६२५-१९९७)
आपल्याला जे प्रिय आहे, ज्याची आवड आहे, जे मौल्यवान वाटते, जे काही सुख व आनंद देते अशा ठिकाणी आपले मन व हृदय आकर्षित होत असते. जिथे तुझे धन तिथे तुझे मन, अशा उक्तीने आपण जीवनातील गोष्टींना प्राधान्य देत असतो. विशेषत: जगातील गोष्टींचे असे आकर्षण आपल्याला खऱ्या देवापासून परावृत्त करीत असते. खरे पाहता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीनच मूलभूत गरजा असतात, , तरी सुद्धा माणसे पैसा, संपत्ती व धनदौलत मिळविण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत असतात. त्याच धनसंपत्तीचा वापर करून मान-सन्मान व अधिकार मिळविण्यासाठी अनेकजण आपले जीवन खर्ची घालतात. प्रभू येशू आज आपल्या अशा क्षणभंगूर जीवनावर चिंतन करायला सांगत आहे.
आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक सुख, वैभव व आनंद देणारे जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्नशील बनू या. आध्यात्मिक संपत्ती साठवू या.
✝️
पहिले वाचन : २ राजां ११:१-४,.९-१८.२०
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“त्यांनी योवाश याला अभिषेक करून राजा केले आणि टाळ्यांचा गजर करून म्हटले, 'राजा, चिरायू होवो!"
जेव्हा अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. तरी योराम राजाची कन्या आणि अहज्याची बहीण यहोशेबा हिने अहज्याचा पुत्र योवाश याला त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि त्याला आणि त्याच्या दाईला बिछाने ठेवण्याच्या कोठडीत छपवून ठेवले. अथल्याच्या दृष्टिआड त्याला केल्यामुळे त्याचा वध झाला नाही. यावर परमेश्वराच्या मंदिरात त्याला सहा वर्षे तिच्याजवळ लपवून ठेवले होते. इकडे अथल्याने देशावर राज्य केले.
परंतु सातव्या वर्षी यहोयादने हुजरे आणि गारदी यांच्यातल्या शतपतींना बोलावणे पाठवले. त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाक करवून त्यांना तो राजपुत्र दाखवला.
यहोयाद याजकाने केलेल्या हुकुमाप्रमाणे त्या शतपतींनी केले; शब्बाथ दिवशी जे लोक कामावर यावयाचे होते आणि कामावरून घरी जावयाचे होते ते सर्व घेऊन ते यहोयादी याजकाकडे आले; तेव्हा दावीद राजाच्या बरच्या आणि ढाली परमेश्वराच्या मंदिरात होत्या त्या याजकाने शतपतींना दिल्या. ते पहारेवाले हाती हत्यारे घेऊन मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यापासून उत्तर कोपऱ्यापर्यंत वेदीच्या आणि मंदिराच्या जवळ राजासभोवार उभे राहिले. मग त्याने राजकुमाराला बाहेर आणले, त्याच्या शिरी मुकूट ठेवून त्याच्या हाती आज्ञापट दिला; मग त्यांनी त्याला अभिषेक करून राजा केले आणि टाळ्यांचा गजर करून म्हटले, “राजा चिरायू होवो!”
पहारेकऱ्यांचा आणि लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्याच्याकडे आली. तो वहिवाटीप्रमाणे राजा उच्चस्थानी उभा आहे, त्याच्यापाशी सरदार आणि कर्णे वाजवणारे उभे आहेत आणि सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवत आहेत असे तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून “फितुरी रे, फितुरी!” असे ओरडली. मग यहोयाद याजकाने सेनेवर असलेल्या शतपतींना आज्ञा केली की, “तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा, तिच्याभागून जो जाईल त्याचा वध करा.” “परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये." म्हणून याजकाने असे सांगितले. तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली आणि राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्यावाटेने ती बाहेर गेली. मग त्यांनी तेथे तिला जिवे मारले.यानंतर राजा आणि प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करविला. तसाच त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही करार करविला. तेव्हा देशातील सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले आणि त्याच्या वेद्या आणि मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बआलचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला. भग याजकाने परमेश्वराच्या मंदिरांचे कामदार नेमले. अथल्यास हिला राजमंदिरापाशी तरवारीने ठार केले, तेव्हा सर्व लोक आनंदित झाले आणि नगर शांत झाले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३२ : ११, १२, १३-१४,१७-१८
प्रतिसाद : परमेश्वराने सियोन निवडून घेतले आहे.
१) परमेश्वराने दावीदजवळ खरी शपथ वाहिली आहे,
तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की
“मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवीन.”
२) “जर तुझी मुले माझा करार आणि
मी शिकवलेले निर्बंध पाळतील,
तर त्यांचीही मुले सर्वकाळ तुझ्या राजासनावर बसतील."
३ )कारण परमेश्वराने सियोन निवडून घेतले आहे,
आपल्या निवासासाठी त्याला ते आवडले आहे.
“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन,
माझी तशी इच्छा आहे.
४)“तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल असे मी करीन;
मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.
मी त्याच्या वैऱ्यांना लज्जेने वेष्टित करीन,
पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकूट झळकेल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे;
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:१९-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल."
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत. आणि चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन लागेल.“डोळा शरीराचा दिवा आहे. ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार महाभयंकर आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :जगात आपल्याला असे लोक सापडतात की, जे पैसा आणि शक्ती यांचा खजिना म्हणून पाठलाग करीत आहेत. त्यांना वाटते की, यामधूनच आनंद आणि शांती मिळेल. परंतु त्यांना हे समजले नाही की, यामुळे त्यांना शांती मिळणार नाही. इतिहास आपल्याला शिकवतो की सत्ता मिळवण्याच्या लालसेपायी व संपत्तीच्या आंधळ्या शोधामुळे युद्ध होतात. त्यामुळे विनाश आणि दुःख होते. येशू आपल्याला सांगतो की, खरा खजिना पैसा, शक्ती आणि मालमत्ता नसून, देवाचे राज्य आहे. दयाळूपणा, दया आणि सेवा यांच्या कृतीतून हा खरा खजिना आपल्याला सापडतो. हा खजिना कधीही नष्ट होऊ शकत नाही, परंतु तो आपल्याला देवाच्या राज्यात अनंतकाळचे जीवन देईल. चला हा खजिना साठवू या. आजचे शुभवर्तमान आपल्याला खरा खजिना शोधण्यास आव्हान करीत आहे. तुमचे हृदय काय शोधत आहे ? तुमचे खरे धन काय आहे ? ह्यावर चिंतन करू या.
प्रार्थना : हे स्वर्गीय प्रेमळ बापा, नाशवंत संपत्तीचा मोह टाळण्यास व स्वर्गीय संपत्तीचा ध्यास घेण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या