सामान्य काळातील ११वा सप्ताह
शनिवार १८ जुन २०२२
“तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा "
संत मार्क आणि मार्सेलियन
- रक्तसाक्षी (... २८७)
रोममधील एका उच्चवर्णीय व प्रतिष्ठित घराण्यात मार्क व मार्सेलियन ह्या जुळ्या बंधूंचा जन्म झाला. तरुणपणातच त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला होता आणि मोठ्या सन्मानाने व थाटामाटात ख्रिस्ती पद्धतीने त्यांचा विवाहसंस्कार पार पडलेला होता.
इ. स. २८४ साली डायक्लेशियन हा सम्राट रोमच्या गादीवर आला आणि ख्रिस्ती धर्मियांच्या छळाला सुरूवात झाली. त्यात मार्क मार्सेलियन ह्यांना पकडूनतुरूंगात टाकण्यात आले आणि त्यांचा शिरच्छेद केला जावा अशी आज्ञा देण्यात आली. परंतु त्या दोघांच्या मित्रांनी मध्यस्थी करून त्यांची शिक्षा ३० दिवसांनी स्थगित केली. आपल्या या दोन ख्रिस्ती मित्रांना आपण मूर्तीपूजेस प्रवृत्त करू शकू असा वेडा आशावाद त्यांना वाटत होता.
दरम्यानच्या काळात त्यांचे मातापिता, पत्नी आणि अगदी कोवळी बालके ह्यांनी या दोघांना ख्रिस्ती श्रद्धा सोडून देण्याची विनंती केली. आपल्या कोवळ्या लेकरांचे व प्रिय पत्नीचे अश्रू पाहून कुणाचे हृदय द्रवणार नाही परंतु “ज्याने माझ्यासाठी आपले घरदार, भाऊबहिणी, बायको मुले, शेतीवाडी आणि संपत्ती ह्यांचा त्याग केलेला आहे त्याला येणाऱ्या युगात ह्याच गोष्टी शतपटीने प्राप्त होतील" ह्या प्रभुवचनानुसार त्यांनी आपल्या जीवनाद्वारे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रद्धेचे नाते अधिक भक्कम असते हे दाखवून दिले.
त्याकाळी सम्राटच्या घराण्यातील एक बडा अधिकारी (संत) सेबेस्टीयन (सण २० जानेवारी ) दररोज मार्क व मार्सेलियन ह्यांना भेटून आपल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यास त्यांना प्रोत्साहन देत असे. मार्क आणि मार्सेलियन ह्यांच्याकडे पाहून निकोस्ट्राटस या लिपिकाने आणि क्रॉमिशिअस या न्यायाधीशानेदेखील ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि दोघांना तुरूंगातून मुक्त केले.
पुढे फेबियन हा न्यायाधीश न्यायासनावर बसला. तो क्रूर कर्मी होता. त्यामुळे श्रद्धावंतांनी मार्क व मार्सेलियन ह्यांना राजवाड्यातच लपवून ठेवले. मात्र एका मूर्तिपूजक सेवकाने त्यांना शोधून काढले. फेबियन या न्यायाधीशाने दोघांना खांबावर बांधले. त्यांच्या पायांना जोरजोराने खिळे ठोकले. एक दिवस व एक रात्र दोघे त्या अवस्थेत प्रभू ख्रिस्तासाठी दुःखसहन करीत होते. शेवटी त्यांच्या कुशीत भाला भोसकून त्यांना ठार करण्यात आले.
✝️
पहिले वाचन : २ इतिहासा २४:१७-२५
वाचक : इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात तुम्ही जखऱ्याला ठार केले. "
यहोयाद मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला आणि राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती आणि इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपरांधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर आणि येरुशलेमवर भडकला, तरी त्यांना आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले; त्यांनी त्यांचा निषेध केला पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयाद याजकाचा पुत्र जखऱ्या याच्या ठायी आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, 'तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराला सोडले म्हणून त्यानेही तुम्हाला सोडले आहे. " पण त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयाद याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रांना वधले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून याचे उराने फेड."
नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने यांवाशवर स्वारी यहुदा आणि येरुशलेम यांच्यावर चालून येऊन त्यांनी त्या लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला आणि त्याचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. याप्रकारे त्यांनी योवाशला शासन केले.
ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी गहोयाद याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असताना त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्थानात दिली नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८९:४-५, २९-३०, ३१ - ३३,३४
प्रतिसाद : मी त्याच्यावर नेहमी दया करीन.
१) "मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे,
मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे;
मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन,
तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन."
२) "मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम ठेवीन.
त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील,
त्यांची संतती सर्वकाळ राहील आणि
त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे
अक्षय राहील असे करीन."
३) "जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले,
माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत,
जर माझे नियम त्यांनी मोडले,
माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत;
तर मी त्याच्या अपराधांचे शासन दंडाने करीन.
त्याच्या अनीतीचा शासन फटक्यांनी करीन."
४) “तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करण्यासाठी
मी आपल्या सत्य वचनाचा भंग करणार नाही,"
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:२४-३४
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“उद्याची चिंता करू नका."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.
“ह्यांस्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयाला देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढविण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता ? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो तुम्हांला विशेष पोषाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हांला पोषाख घालणार नाही काय? ह्यास्तव 'काय खावे,' 'काय प्यावे,' 'काय पांघरावे,' असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.
"ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :येशू आपल्या शिष्यांना असे सांगत आहे की, आपल्या जीवनाविषयी चिंता करीत बसू नका व तुमच्या स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवा. परंतु आपल्याला आयुष्यावर पूर्ण ताबा मिळवायचा असतो. परंतु जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा आपण अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होतो. जेव्हा आपल्याकडे नसलेल्या गोष्टी मिळण्याची इच्छा असते तेव्हा देखील आपण काळजी करतो. देवाचे वचन आपल्याला सांगते की, “कशाविषयीही काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” आज आपल्याला अनावश्यक चिंता थांबवून आणि देवावर आपला विश्वास ठेवण्याची आठवण करून दिली आहे. देवावर भरवसा ठेवण्याचा अर्थ असा नाही की, आपण केवळ निष्क्रीय प्रतिक्षा करावी आणि सर्व देवावर सोडावे.त्याऐवजी आपण यथायोग्य प्रयत्न करू व उरलेल्या सर्व गोष्टी देवाच्या हातात सोडून देऊ. कारण तुमच्या स्वर्गीय पित्याला हे माहित आहे की, तुम्हांला कोणत्या गोष्टींची गरज आहे. आपण स्वतःला विचारू या की, मी देवावर विश्वास ठेवतो की, चिंतेत माझा वेळ घालवितो ? आज तुम्ही तुमची सर्व दुःखे व संकटे देवाच्या हातात सोपविली का?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या