Marathi Bible Reading | Sunday 19th June 2022 The The Body & The Blood of Christ.

सामान्यकाळातील १२व सप्ताह 

रविवार १९ जुन २०२२


Feast of corpus christ
ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीर व रक्ताचा सोहळा.

 ख्रिस्तसभा आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले शरीर सर्वाच्या उद्धारासाठी मोडले व आपल्या रक्ताने प्रभू येशूने सर्व पापांपासून मुक्त केले आहे. वल्हाडणाच्या दिवशी प्रभू येशूने प्रतिकात्मक रूपाने त्याच्या शरीराचे व रक्ताचे समर्पण करुन  ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली. ख्रिस्ताच्या समर्पणाचा विधी आपण प्रत्येक मिस्सा बलीदानात साजरा करीत असतो.

आपली आध्यात्मिक तहान व भूक भागविण्याचे सामर्थ्य प्रभू येशूच्या शरीर व रक्ताच्या कृपासंस्कारात आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासे  ह्यांचा चमत्कार करुन पाच हजारांपेक्षा अधिक लोकांची शारीरिक भूक तृप्त  केली होती. मौल्यवान अशी आध्यात्मिक भूक शमविणारी भाकर प्रभू  येशूख्रिस्ताने आपल्या सर्वांना दिली आहे. ह्या कृपासंस्काराद्वारे प्रभू येशू  ख्रिस्ताने आपल्यासाठी देवाबरोबर नवा करार स्थापन केला आहे. प्रभूने म्हटले आहे, 'हे माझ्या स्मरणार्थ करा.'
आपण सर्वजण त्याच्या  शरीराचे अवयव आहोत, म्हणूनच आपल्या सर्वांना जीवन देणाऱ्या भाकरीचा आपण योग्य तो सन्मान करुन आपले जीवन अधिक पवित्र, शुद्ध व परोपकारी  बनविण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
✝️   
पहिले वाचन :  उत्पत्ती  १४ : १८-२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मलकीसदेक भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला.' "
शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला, हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला आशीर्वाद दिला :
"आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामला आशीर्वाद देवो, "ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य !
तेव्हा अब्रामने त्याला सर्वांचा दहावा भाग दिला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४
प्रतिसाद : मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.

१). माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो :
“मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत 
तू माझ्या उजवीकडे बैस.'

२.) परमेश्वर तुझा राजदंड सीयोनेतून पुढे नेईल. 
तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.

३). तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने तुझे होतात,
पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.

४) परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही.
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.'

दुसरे वाचन  १करिंथ  ११:२३-२६
वाचक:  पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता.

जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.' मग भोजन झाल्यावर त्याने प्याला " घेऊन तसेच केले आणि म्हटले, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा." कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता..
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक ९:११-१७
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सर्वजण जेवून तृप्त झाले."

येशूने लोकसमुदायांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा बारा जवळ म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप येऊन त्याला म्हणजे ते द्या, भोवतालच्या गावात आणि शेतांमळ्यांत जाऊन उतरतील   आणि खाण्याची सोय करतील, कारण आपण येथे। रानातल्या ठिकाणी आहो,' पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या." ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी आणि दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांस बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी आणि ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  “कॉर्पूस ख्रिस्ती” ह्या नावाने ओळखला जाणारा येशूच्या अतिपवित्र शरीराचा आणि अतिमौल्यवान रक्ताचा सोहळा आपल्याला तीन महत्वाच्या सत्याची आठवण करून देतो व त्यावर चिंतन करायला लावतो. 
१. आपल्या शरीर व रक्ताने येशूने पाप व मृत्यू यावर विजय मिळविला : आजच्या पहिल्या वाचनात युद्धात विजयी झालेला आब्राहाम हा परात्पर देवाचा याजक असलेल्या मलकीसदेकाकडून भाकर व द्राक्षारस ह्यांचे अर्पण स्वीकारताना दिसतो. आब्राहाम केवळ युद्धात विजयी झाला म्हणून नव्हे तर त्याच्याठायी बीजरूपाने असलेल्या अहरोनाच्या याजकपदाची जाणीव ठेवून मलकी सदेक त्याला हे अर्पण करतो. आब्राहामचा युद्धातील विजय ही येशूच्या दिग्विजयाची पूर्वछाया होती. तर मलकीसदेकाचे अर्पण हे त्याच्या प्राणार्पणाचे चिन्ह होते. 
२. येशू भाकर व द्राक्षारसाच्या रूपाने आपल्यामध्ये सतत हजर असतो: आजच्या दुसऱ्या वाचनातील पवित्र मिस्सेच्या स्थापनेचे वर्णन आपल्याला येशूच्या दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थानाची आठवण करून देते. त्याचबरोबर येशूच्या पुनरागमनाचे स्मरण करून देते. ह्या दोन "घटनांच्या " मधोमध ख्रिस्ताची पवित्र मिस्सेमधील व अतिपवित्र साक्रामेंतामधील उपस्थिती भाकर व द्राक्षारसाच्या रूपाने आपल्यामध्ये सदैव असते. 
३. येशू मानवी हृदयाची सर्वात मोठी भूक व तहान भागवू शकतो : आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर पाच हजारांना भोजन हा चमत्कार सादर करते. हा चमत्कार येशूच्या उपदेश व रोगनिवारण कार्याच्या संदर्भात लूक सादर करतो. हा चमत्कार येशूच्या सामर्थ्याचे दर्शन घडवितोच परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे देवराज्याविषयी लोकांची जी भावना होती ती अधिक समृद्ध करतो. ह्या राज्यामध्ये विपुलता आणि भरभराट आहे. त्यामध्ये असंख्य लोकांना तृप्त करण्याची क्षमता आहे. भाकर व द्राक्षारसाच्या रूपात उपस्थित असलेला येशू आज जगभराच्या लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या तृप्त आणि समाधानी करीत आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र शरीराने व रक्ताने आमचे आध्यात्मिक पोषण कर व आम्हाला तुझी सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या