Marathi Bible Reading | Monday 20th June 2022|12th week in Ordinary Time

सामान्यकाळातील १२वा  सप्ताह 

सोमवार २० जुन २०२२

“तुम्ही कोणाचे दोष काढू नका."


संत सिल्वेरियन
परमगुरू, रक्तसाक्षी (५३८)


परमेश्वराची आज्ञा धुडकावून लावल्यामुळे इस्त्राएल जनतेला| परमेश्वराच्या क्रोधाला सामोरे जावे लागले, परमेश्वराच्या दृष्टीने जे चागंले व वंदनीय ते आपण आचरणात आणावे.
 आपण सर्वजण गुण-दोषांनी भरलेले असतो. आपल्यामध्ये  अनेक चांगले गुण असतील तर आपण त्यांची जोपासना करून इतरांमधीलचांगले गुण शोधावेत. नकारार्थी भावनेने जेव्हा आपण इतरांचे केवळ दोषकाढीत असतो तेव्हा आपण जणू त्यांचा न्याय करतो. कुणाचाही न्याय करावयाचा अधिकार आपल्याला नाही. आपण आपल्या स्वतःच्या जीवनावर चिंतन करून आपल्यातील अवगुण शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, हा सल्ला प्रभू येशू आज आपल्याला देत आहे. आपले गुण व अवगुण ह्यांची आपण यादी तयार करावी. आपल्या गुणांनीशी अवगुणांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. 
✝️   
पहिले वाचन :  २ राजे १७ : ५-८. १३,१५,१८
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने इस्त्राएलींना आपल्या दृष्टीआड केले; यहुदाच्या वंशा खेरीज कोणी उरला नाही."
असिरिया राजाने सर्व देशांवर स्वारी केली आणि शोमरोन येथे जाऊन तो तीन वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी असिरियाच्या राजाने शोमरोन सर केले. त्याने इस्राएल लोकास अश्शूर देशी नेऊन हलह,  हाबोर, गोजान नदीतीरी आणि मेद्यांच्या नगरात ठेवले.
कारण इस्राएलचा देव परमेश्वर याने त्यांना इजिप्त देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून इजिप्त देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले आणि अन्य देवांची पूजा केली व ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम आणि इस्राएलच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे इस्त्राएल आणि यहुदा यांस बजावून सांगितले होते की, "तुम्ही आपले वाममार्ग सोडून द्या आणि तुमच्या पूर्वजांना मी जे नियमशास्त्र पाळण्यास फर्मावले होते आणि जे नियमशास्त्र माझे सेवक, संदेष्टे ह्यांच्यामार्फत मी तुम्हाकडे पाठवले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा आणि नियम पाळा." इतके असूनही ते ऐकेनात, तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली. त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेले त्याचा करार आणि त्यांस पढवलेले त्याचे निर्बंध यांनी त्यांनी अव्हेर केला. त्यामुळे परमेश्वर इस्राएलवर अति कोपायमान झाला, त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहुदाचा वंश खेरीज करून तेथे कोणी उरला नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६०: ३-५,१२-१३
प्रतिसाद : प्रभो, आमचे ऐकून घे.

१) हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, 
आमची दाणादाण केली आहेस.
तू कोपायमान झाला आहेस;
तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण.

२ तू भूमी कंपित केली आहेस,
ती विदारली आहेस.
तिची भगदाडे भरून काढ,
कारण ती डळमळत आहे.
तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस,
तू आम्हांला जणू काय झोकांड्या लावणारा
द्राक्षरस पाजला आहेस.

३ हे देवा, तू आमचा त्याग केला ना ? 
हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. 
शत्रूपासून तू आमची सुटका कर, 
कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभो म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.

आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय  ७:१-५
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक.'

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा 'तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे' असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पाहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आपण बहुतेक लोकांच्या चुकीच्या कृत्यानुसार त्यांचा न्याय करतो. परंतु जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांनी क्षमा करावी अशी आपली अपेक्षा असते. तथापि, इतरांनी आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे अशी आपली इच्छा असते. पण उपरोधिकपणे आपण शेवटी त्यांचा न्याय करतो. शुभवर्तमानात, आपल्याला दुसऱ्या व्यक्तीबरोबरच्या आपल्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्ण पैलूची आठवण करून देते. आपण हे लक्षात ठेवूया आपण इतरांचा कधीही दोष काढू नये, कारण आपण स्वतः चुकतो. प्रथम आपण आपल्या दोषांकडे पाहिले पाहिजे आणि स्वतःला सुधारले पाहिजे. “नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे; तर आपल्या शेजाऱ्यांस दोषी ठरविणारा तू कोण ? " (याकोब ४:१२). आपली न्याय वृत्ती आपल्याला देवाच्या स्थानावर असल्याचा दावा करते. आज |शुभवर्तमान आम्हाला एक क्षमाशील व्यक्ती होण्यास आव्हान देत आहे. येशू आपल्याला इतरांना सुधारण्याऐवजी स्वतः सुधारावे म्हणून सांगत आहे. “तू आपल्या डोळ्यांतले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?” (मत्तय ७:३) स्वतःला विचारू या की, मी इतरांचे दोष काढणारी व्यक्ती आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वतःला परिपूर्ण ओळखण्यास व इतरांना समजून घेण्यास मला सकारात्मक दृष्टी दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या