Marathi Bible Reading | Tusedsday 21st June 2022|12th week in Ordinary Time

सामान्यकाळातील १२वा  सप्ताह 

मंगळवार  २१ जुन २०२२

लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याच्याशी वागा, 


संत अलॉयशिअस गोन्झागा

- वर्तनसाक्षी (१५६८-१५९१)


चिंतन : आपला जन्म कोणत्या घराण्यात झालेला आहे त्यावरून आपली महानता ठरत नाही. राजे आणि रंक दोघांची एक दिवस माती होणारच आहे ना! - संत अलॉयशिअस गोन्झागा 

प्रभू म्हणतो, 'लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा| आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.' जीवनाचा हा सुवर्ण नियम आपल्याला  अंतर्मूख बनून चिंतन करायला भाग पाडतो. प्रत्येकाला वाटते की इतरांनी  माझ्याशी प्रेमाने, सामंजस्याने, शांतीने व संयमाने वागावे. त्याचप्रमाणे इतरांनी माझी सुख दुःखे, अडचणी व समस्या समजून घ्याव्यात. इतरांनी माझ्यावर दया  करावी. इतरांनी मला मदत करावी. आपल्याला इतरांकडून चांगल्या वागणुकीची जशी अपेक्षा आहे तसेच आपण सुद्धा त्यांच्याबरोबर चांगुलपणाने वागणे गरजेचे आहे. अशा वागण्याने सर्वांचे जीवन सुरळीत, सुसह्य आणि शांतीपूर्ण बनू शकते  आज खरोखरच ह्या सुवर्ण नियमावर शक्य होईल तेवढे चिंतन करु-

✝️   
पहिले वाचन :  २ राजे १९ : ९,११,१४-२१,३१-३६
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी स्वतः करिता आणि दावीदकरिता या नगराचे सरंक्षण करीन. "

सन्हेरिबने पुन्हा हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “तुम्ही यहुदाचा राजा हिज्कीया याच्याकडे जाऊन सांगा : 'ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, असिरियाच्या राजाच्या हाती येरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.' असिरियाच्या राजांनी सर्व देशांचे काय  केले ते पाहा, त्याचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच. तर मग तू सुटशील काय ?”
हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. त्यानंतर हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. मग हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच एकमेव पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस, तूच आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर असिरियाच्या राजांनी सर्व राष्ट्रे आणि त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत. कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ आणि पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्यांच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे म्हणतील की, तूच एकमेव परमेश्वर देव आहेस.
तेव्हा आमोजचा पुत्र यशया याने हिज्कीयाला पाठवून सांगितले की, "परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो : असिरियाचा राजा सन्हेरीब यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : येरुशलेमेतून अवशिष्ट निघेल आणि सियोन डोंगरातून बचावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.
“ह्याकरिता असिरियाच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने जो आला त्या वाटेने तो परत जाईल; त्यांचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. मी स्वतः करिता आणि माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता या नगराचा उद्धार करण्यासाठी त्याचे संरक्षण करीन."त्या रात्री परमेश्वराच्या देवदूताने जाऊन असिरियाच्या गोटातले एक लक्ष पंचाऐशी हजार लोक मारले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते ! सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेस जाऊन राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४८:२-४,१०-११
प्रतिसाद :  परमेश्वर आपले नगर सर्वकाळ स्थिर राखतो.

१) परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात,
 त्याच्या पवित्र डोगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे; 
उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.

२) उत्तम सीमेवरील सियोन पर्वत, 
राजाधिराजाचे नगर ! 
देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.

३ हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या 
वात्सल्याचे चिंतन करतो.
हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती 
पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे,
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय  ७:६,१२-१४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “लोकांनी जसे तुमच्यापाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोत्ये कदाचित आपल्या पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हांला फाडतील."
लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत. “अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणरे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आज जगात एक तत्वज्ञान वेगाने पसरत आहे, ते म्हणजे, "सर्वजण हे करत आहेत, म्हणून , ते ठीक असेल.” बरेच लोक या तत्वज्ञानानुसार आपले जीवन जगत आहेत व त्यांना ठाऊक नाहीकी, त्याद्वारे ते दुर्गुणांमध्ये पडत आहेत आणि हे त्यांना विनाशाकडे नेत आहे. उदाहरणार्थ गर्भपात योग्य किंवा अयोग्य आहे? आपण असे म्हणू शकतो का, बरेचजण गर्भपात करीत आहेत म्हणून आम्ही पण करू शकतो. बरेच लोक खोटे बोलतात, म्हणून मी खोटे बोलू शकतो का? आपण बहुसंख्यांसमवेत जाऊ नये तर येशूला आपल्याकडून काय हवे आहे ते करूया. “अरूंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.” (मत्तय ७:१३) लक्षात ठेवा आपण जगाच्या आनंदात वाहून जाऊ नये त्याऐवजी पवित्र आणि चांगले जे आहे ते निवडूया. आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे जाणून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्वतःला विचारणे की, जे शब्द, जे विचार, जी कृती मी करत आहे ती मला देवाजवळ नेते का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील परस्पर संबंधाचे गुपित जाणून त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या