सामान्यकाळातील १२वा सप्ताह
बुधवार २२ जुन २०२२
'ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. '
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला फळझाडाचे उदाहरण देत आहे.सर्व फळझाडांना लागलेली फळे चांगली स्वदिष्ट आणि खाण्यालायक असतातच असे नाही. सुंदर मोहक व आकर्षक दिसणारी फळे विषारी असू शकतात. प्रत्येक फळ झाडाचे वैशिष्ट्य असते, त्यांचा विशिष्ट हंगाम असतो आणि उपजावू जमीन असते. प्रभू म्हणतो 'काटेरी झाडावरून द्राक्षे व रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय ?' त्याचप्रमाणे वरवरून भक्तीमान वाटणारी, धार्मिकतेच्या गोष्टी सांगणारी व नीतिमत्तेविषयी शिकवण देणारी सर्वच माणसे चांगली असतातच असे नाही. आपण चांगल्या व खऱ्या नीतिमान आणि धार्मिक माणसांना ओळखायला शिकले पाहिजे. चांगल्या माणसांच्या जीवनात देवाला प्रथम प्राधान्य असते. अशा चांगल्या माणसांच्या जीवनरूपी झाडाला चांगलीच फळे येतात.
✝️
पहिले वाचन : २ राजे२२ : ८-१३,२३:१-३
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन“नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली, मग त्याने परमेश्वरासमोर करार केला. "
मुख्य याजक हिल्किय याने शाफान चिटणीस याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे." हिल्कियाने तो ग्रंथ शाफानला दिला आणि त्याने तो वाचला. शाफान चिटणिसाने योशीया राजाकडे परत येऊन त्याना असे कळवले की, “आपल्या सेवकांला मंदिरात जो पैसा मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यांत भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांच्या हवाली केला आहे." शाफान चिटणिसाने योशीया राजाला आणखी असे सांगितले की, "हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे." शाफानने तो राजाला वाचून दाखवला.
त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. मग त्याने हिल्किया याजक, शाफानचा पुत्र अहीकाम, मिखायचा पुत्र अखबोर, शाफान चिटणीस आणि राजसेवक असाया यांस आज्ञा केली की, “हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्यातर्फे आणि सर्व यहुदाच्यातर्फे परमेश्वराला विचारा; आमच्या पूर्वजांनी या ग्रंथातील वचने ऐकली नाहीत आणि आमच्यासाठी जे यात लिहिले आहे ते पाळले नाही म्हणून परमेश्वराचा आम्हांवर मोठा क्रोध भडकला आहे."
मग राजाने यहुदातील आणि येरुशलेमतील सर्व वडीलजनांना बोलावणे पाठवून जमा केले. यहुदा येथील सर्व लोक, सर्व येरुशलेमातले रहिवाशी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, मी परमेश्वराचे अनुसरण करीन आणि त्याच्या आज्ञा, निर्बंध आणि नियम जिवेभावे पाळीन, या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन; तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९:३३-३७,४०
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचे मार्ग मला दाखव.
१) हे परमेश्वरा,तू आपल्या नियमांचे मार्ग मला दाखव,
म्हणजे ते मी शेवटपर्यंत धरुन राहीन.
तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि
ते मनापासून पाळावयास मला शिकव.
२) तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव.
त्यातच मला आनंद आहे.
माझ्या मनाचा कल अन्याय्य लोभाकडे नको.
तर तुझ्या निर्बंधांकडे असू दे.
३) निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव.
तुझ्या मार्गात मला नवजीवन दे.
पाहा, मला तुझ्या आदेशांचा ध्यास लागून राहिला आहे, तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो,
तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंतःकरणे प्रफुल्लित कर..
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ७:१५-२०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजचे शुभवर्तमान आपल्याला खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध करीत आहे. असे संदेष्टे मेंढरांच्या वेषातील लांडगे आहेत. बाहेरून ते स्वतःला येशूसारखे कोमल व प्रेमळ भासवतात. परंतु ते धर्माचे भक्षक आहेत. ते धर्माच्या नावाखाली त्यांच्या मधूर वाणीने व खोट्या आश्वासनाने लोकांना फसवतात. मग आपण त्यांना खोटे संदेष्टे म्हणून कसे ओळखू शकतो ? प्रभू येशू सांगतो की, तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. झाड हे फळावरून ओळखले जाते. एखाद्या वाईट झाडाला चांगले फळ येणे व चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही. आपल्याला खोट्या संदेष्ट्यांना ओळखून त्यांची खोटी शिकवण नाकारता आली पाहिजे. असे जे लोक खोटी मूल्ये चांगल्या रितीने पटवून सांगतात त्यापासून आपल्याला सावध राहता आले पाहिजे. जे फक्त भरभराटीचे, ऐश्वर्याचे, प्रसिद्धीचे व चांगल्या आरोग्याचेच शुभवर्तमान घोषवून दुःख वेदनेतही जे तारण दडलेले आहे त्याला बगल देतात अशांपासून आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, चांगले व योग्य त्याचा स्वीकार करण्यासाठी आम्हाला शहाणपण व विवेकबुद्धी दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या