सामान्यकाळातील १२वा सप्ताह
गुरुवार २३ जुन २०२२
त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला.
संत योहान बाप्तिस्ता महान संदेष्टा
त्याचा जन्मोत्सव
ख्रिस्तसभा आज संत योहान बाप्तिस्ता जो प्रभूचा मार्ग तयार करणारा महान संदेष्टा झाला त्याचा जन्मोत्सव साजरा करीत आहे. योहान आपली आई अलीशिबा हिच्या उदरात असतानाच मरियामातेद्वारे प्रभूच्या पावन स्पर्शाने पवित्र आत्म्यात परिपूर्ण झाला होता. त्याची आई अलीशिबा व बाप जखऱ्या वयातीत होते व त्यांना मूलबाळ होणे अशक्य होते. मात्र देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. देवाच्या तारण कार्याच्या योजनेतील महत्त्वाचा संदेश देणारा योहान पवित्र आत्म्याठायी बलवान व सामर्थ्यशाली बनला. त्याने लोकांना पश्चात्तापाचा व पाण्याचा बाप्तिस्मा दिला. तारणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी त्याने लोकांची पूर्व तयारी केली.
याकोबाच्या वंशाचा उद्धार व्हावा व इस्त्राएलच्या लोकांना परत आणावे म्हणूनच योहान बाप्तिस्ताचा जन्म झाला होता.
जखऱ्या व अलीशिबा हे वृद्ध जोडपे म्हणजे जे अपत्यहीन आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या मध्यस्थीने आपण अपत्य नसलेल्या सर्व जोडप्यांसाठी प्रार्थना करु या. योहान बाप्तिस्ताप्रमाणे लोकांना येशूची ओळख करून देण्यासाठी आपण धैर्याने साक्ष देऊ या.
✝️
पहिले वाचन : यशया ४९ :१-६
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन"मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."
द्वीपांनो, माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले, त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस." मी तर म्हणालो होतो की, "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो: “याकोबाच्या वंशाचा उध्दार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३९:१-३,१३-१५
प्रतिसाद : अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती
१.) हे परमेश्वरा, तू मला पारखतोस. तू मला ओळखतोस,
माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस,
तू दुरून माझे मनोगत समजतोस.
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतासे,
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
२. )तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस,
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे.
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.
३.) तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव
पूर्णपणे जाणून आहे,
मी गुप्त स्थळी निर्माण होत असता
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण
प्रकारे माझी घडण होत असता
माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
दुसरे वाचन प्रेषितांची कृत्ये १३ : २२-२६
वाचक :प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने घोषणा केली होती."
पौल म्हणाला, "देवाने आपल्या पूर्वजांना राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिध्दीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाच्या स्नानसंस्काराची सर्व इस्त्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, 'मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे. तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.'
"अहो बंधुजनहो, आब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १:५७-६६,८०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्याचे नाव योहान आहे."
अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बाळकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, "ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.” ते तिला म्हणाले, "ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून "ह्याचे नाव योहान आहे, " असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्यासभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणांत ठेवून म्हटले, "हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.
तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्राएलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आज आपण संत योहान बाप्तिस्ताचा जन्मदिवसाचा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र ख्रिस्तसभा तीन व्यक्तींचे जन्मदिवस किंवा वाढदिवस साजरे करते, आणि ते म्हणजे, येशू ख्रिस्ताचा, पवित्र मरियेचा व बाप्तिस्मा करणारा संत योहान. आपले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपण बाप्तिस्मा करणाऱ्या संत योहानाकडून तीन महत्वाची मूल्ये शिकू शकतो.
सर्वप्रथम योहान बाप्तिस्ता निर्भयतेने सत्य बोलला. त्याने मोठ्या धाडसाने जे चुकीच्या मार्गावर चालत होते ( अशा पापी लोकांना चांगला मार्ग दाखविला.
दुसरे महत्वाचे मूल्य म्हणजे विनम्रपणा. येशू ख्रिस्तालाबाप्तिस्मा देताना त्याने लोकांस सांगितले, मी ख्रिस्त नव्हे, तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे, येशूने महान व्हावे आणि मी लहान व्हावे हेच योग्य आहे. (योहान ३:२८-३०)
तिसरे मूल्य म्हणजे संदेष्टा योहान बाप्तिस्ता जे बोलला ते त्याने स्वतः करून दाखविले. त्यांनी पश्चात्ताप करण्यास आव्हान केले, कारण तो स्वतः अरण्यात एक पश्चातापी जीवन जगत होता. जेणेकरून तो स्वतःच्या पापांचा पश्चात्ताप करू शकेल. बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला सत्य धैर्याने सांगण्यास आणि देवासमोर नम्र होण्यास शिकवतो. आपण आपले जीवन योहान बाप्तिस्ताप्रमाणे जगणार आहोत असे वचन आज आपण येशू ख्रिस्ताला देऊया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, जखऱ्या, अलीशिबा आणि योहान ह्यांचा आदर्श जीवनातून प्रकट करता यावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या