Marathi Bible Reading | Friday 24th June 2022|12th week in Ordinary Time

सामान्यकाळातील १२वा  सप्ताह 

शुक्रवार २४ जुन २०२२

पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो.' "




(येशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा)

 देवावरील श्रद्धेपासून आणि सन्मार्गापासून बहकून गेलेल्या सर्वांचा प्रभूयेशू ख्रिस्त शोध घेत असतो. आपल्या प्रत्येकाच्या नांवाने ख्रिस्त आपणास साद घालित असतो.  त्याची वाणी ऐकणाऱ्या आणि त्याला आपला स्वामी म्हणून स्वीकारणाऱ्यास तो  जणू आपल्या खांद्यावर घेऊन आनंद साजरा करीत असतो.

प्रभू येशू दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे.  त्याच्या अतिपवित्र हृदयातून कृपेचा झरा अखंडपणे वाहत असतो. ख्रिस्त   आपणास म्हणतो, 'अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे  या, मी तुम्हांला विसावा देईन' (मत्तय ११:२८). आज प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा आपण सन्मान करीत आहोत. ख्रिस्त प्रभू त्याचे दोन्ही बाहू  पसरुन आपल्याला त्याच्या हृदयाशी कवटाळण्यासाठी तयार आहे. आपल्या सर्व वेदना, कष्ट, संकटे, दु:खे, चिंता व ईश्वरापासून जे जे आपणास दूर घेऊन जाते अशा सर्व घटना/ विचार घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व समर्पित करू या. 
 
✝️   
पहिले वाचन :  यहेज्केल ३४ : ११-१६ 
वाचक :  यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “मी स्वतः माझी मेंढरे चारीन आणि त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन."
“कारण प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, मी स्वतः आपल्या मेंढरांचा शोध करीन, त्यांना मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणातून त्यांना वाचवून आणीन. मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यांस जमा करीन, मी त्यांना स्वदेशी परत आणीन. मी इस्राएलच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ आणि देशातल्या सर्व वसतिस्थानात त्यांस चारीन. मी त्यांना चांगल्या कुरणात चारीन, त्यांचे कुरण इस्राएलच्या उंच पहाडांवर होईल. ते तेथे चांगल्या कुरणात बसतील, इस्राएलच्या पर्वतावर त्यांना उत्तम चारा मिळेल. मी स्वतः माझी मेंढरे चारीन आणि त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथान्याय चारीन."

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद :  परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.

१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. 
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो.

२) तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. 
मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो 
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. 
कारण तू माझ्याबरोबर आहेस,

३)तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
 तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस.
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४). खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण 
आणि दया ही लाभतील. 
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

दुसरे वाचन   पौलचे रोम ५:५-११
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो."
आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहो. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्याठायी अभिमान बाळगतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक  १५:३-७
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा." "

येशूने शास्त्री आणि परुशी ह्यांना हा दाखला सांगितला : “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, 'माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.' त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो.' "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  येशूच्या पवित्र हृदयाचा सोहळा अकराव्य शतकात स्थापन केला गेला. हृदय परंपरेने प्रेम आसन म्हणून स्वीकारले जाते. येशूचे पवित्र हृदय देवाचे प्रेम दर्शविते. येशूच्या पवित्र हृदयाचा सण साजरा करताना, आपण आपल्यावर असलेले देवाचे महान प्रेम साजरे करतो. या सोहळ्यात केवळ पित्याचे दयाळू हृदयच प्रकट होत नाही तर येशूचे प्रेमळ अंतःकरणही प्रकट होते, हे एक सामान्य मेंढपाळाचे हृदय आहे. जे प्रेमळ व काळजीपूर्वक आहे. हा प्रेमळ मेंढपाळ आपल्या मैकरांना कधीच सोडणार नाही. आज आपण त्याच प्रेमाचा आनंद साजरा करतो की, ज्याने येशूला मानव होण्यास व कुसावर आपले प्राण अर्पण करण्यास प्रेरित केले. "देव आपणावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. (रोमकरास पत्र ५:८). आजचा सोहळा फक्त येशूच्या पवित्र हृदयाची आराधना करण्यासाठी जव्हे तर आपले अंतःकरण दयाळू व प्रेम बनविण्यासाठी देवाचे आमंत्रण आहे. आज आपण देवाकडे प्रार्थना करू या की, आपल्याला देव एक क्षमाशील आणि सहानुभूतीदायक हृदय देवो. आज आपण पित्याकडून येशूसारखे प्रेमळ व्यक्ती होण्याचे वरदान मागूया.

प्रार्थना : हे येशूच्या अतिपवित्र हृदया, आम्ही सर्वदा तुझ्या सहवासात असावे आणि तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या