Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Saturday 22nd October 2022 | 29th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील २९ वा सप्ताह  

शनिवार २२ ऑक्टोबर २०२२

पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.



 संत पोप जॉन पॉल २रे 

२२ ऑक्टोबर 
.

आपल्या सर्वांना देवाच्या वचनाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आचरण करण्यासाठी पाचारण आहे, विशेषतः देवाच्या प्रीतित वाढण्यासाठी येशू आवाहन करीत आहे.  प्रभू येशू आज सर्वांना पश्चातापाचा मार्ग सुचवित आहे. प्रभू म्हणतो, “जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल.  आपल्यातील कला-गुणांचा विकास करून  प्राप्त वर दानांचा वापर करून आपण आपले जीवन देवाठायी फलद्रुप  बनविण्यासाठी प्रभू येशू आज आवाहन करीत आहे.

आपण देवाच्या कृपेला अपूरे पडतो कारण आपण देवाविरुद्ध आणि  बंधुभगींनी विरुद्ध पाप करतो. आपल्याला पश्चात्तापाची व परिवर्तनाची गरज | आहे. जीवन फलदायी बनविण्यासाठी संत पौल सांगतो त्याप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावणे गरजेचे आहे. आपण आपल्या आचरणावर चिंतन व परीक्षण करुन घडलेल्या सर्व पापांबद्धल पश्चाताप करावा. चांगले पाप निवेदन करण्यास आपल्याला प्रेरणा लाभावी.


✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ४:७-१६

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"मस्तक ख्रिस्त आहे, त्याच्यापासून आपल्या संबध शरीराची वाढ होते."

आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले आणि मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक, असे नेमून दिले. ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांला सेवेच्या कार्याकरिता आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेला नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या आणि तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व पोहचू तोपर्यंत दिले. आपण ह्यापुढे बालकांसारखे असू नये. म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गाला नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्याने हेलकावणारे आणि फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्तत्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्याद्वारे संपूर्ण शरीराची जुळवणूक आणि जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : १२२: १ - ५

प्रतिसाद : आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. 

१) आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.

२) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू 
बांधलेली आहेस. 
तुझ्या वंश, परमेश्वराचे वंश
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण 
करण्यासाठी चढून येतात.

३) इस्राएलला लावून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण 
करण्यासाठी चढून येतात. 
कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्याची 
राजासने मांडली आहेत.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, 
माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि 
आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १३:१-९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“जर पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल."

त्याच वेळी तेथे असलेल्या काही जणांनी येशूला, ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञामध्ये मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीचे सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते येरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय ? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.
त्याने एक दाखला सांगितलाः कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अजिरांचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला. परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अजिरांच्या झाडावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी ? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज आणखी एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्या सारखा नाश होईल. प्रभू येशू  आपल्याला पश्चात्ताप करण्यास विनंती करतो. त्यासाठी त्याने आपणांस अंजिराच्या झाडाचा दाखला देऊन आपल्यावरील असलेले प्रेम प्रकट केले. त्याला आपली काळजी वाटते म्हणून तो आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देतो. आपल्यातील जे वाईट आहे व ज्यामुळे आपण चांगले जीवन जगण्यात अडचणी येतात ते सर्व दूर करणे आवश्यक आहे. तसेच इतरांना दोष न देता किंवा दुसऱ्याच्या चुकांवर बोट दाखवण्याऐवजी प्रथम आपल्या जीवनात असलेले दोष पश्चात्ताप करून त्यात सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे. पश्चात्ताप करणे म्हणजे केवळ माफी मागणे किंवा सॉरी बोलणे नव्हे तर कृती करून आपल्या जीवनात बदल करणे होय. म्हणून थोडावेळ प्रभू  शब्दावर मनन करून आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी काय करावे लागले ? मला प्रभू येशू दररोज एक नवीन संधी देत, मी त्याचा कसा उपयोग करतो ? आजवर खरा पश्चात्ताप करण्यास मी कसा कमी पडतो व मी या पुढे काय करणार ह्यावर थोडावेळ विचार करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, सफलतेने जीवन जगण्यास आम्ही सर्वदा जागृत असावे व पश्चाताप करुन नुतनीकरण करावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.




सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️