Marathi Bible Reading | Thursday 1st December 2022 |1st week of Advent


आगमनकाळातील पहिला सप्ताह   

गुरुवार १ डिसेंबर  २०२२

माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल.”

संत एलिजियस (एलोई ) 

महागुरू, वर्तनसाक्षी (५८८-६६०)

 सात्विक म्हणजेच देवावर विश्वास ठेवणारे, देवाची आदरयुक्त भीती बाळगणारे व देवाच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणारी माणसे स्वर्गराज्याचे वारस बनतील. 
 प्रभू येशूच्या वचनात आपल्या सर्वांच्या जीवनाचे मर्म आणि परमेश्वराच्या कृपेचे सामर्थ्य  सामावलेले आहे. प्रभूची वचने आपल्याला शहाणपण आणि सुज्ञता  शिकवतात. 
ह्या आगमनकाळात विशेष रितीने आपण बायबल वाचन व त्यावरील  मनन चिंतन ह्यासाठी वेळ काढू या. आपले वैयक्तिक, कौटुंबिक आणि  सामुहिक जीवन देवाच्या वचनावर उभारलेले असावे म्हणून देवाच्या दृष्टीने  सुज्ञ बनू या.  
✝️   

पहिले वाचन : यशया २६:१-५

वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“सत्याचे पालन करणाऱ्या धार्मिक राष्ट्राचा उदय होवो.”

यहुदी देशात हे गीत गातील. आमचे नगर तटबंदी केलेले आहे. तारण हेच त्याचे कोट आणि तट नेमले आहेत. वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. उच्चस्थळी राहणाऱ्यांना त्याने खाली आणले आहे. त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे, धुळीला मिळवले आहे. नगर पायांखाली तुडवले जात आहे. गरिबांचे पाय, दीनांची पावलेदेखील त्या नगराला तुडवत आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :११८:१.८-९,१९-२१,२५-२७अ

प्रतिसाद :   प्रभूचे नाव धारण करून येणारा धन्य आहे. 

१. प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.
त्याचे वात्सल्य अनंत आहे.
माणसाच्या भरवंशावर राहण्यापेक्षा प्रभूला शरण जाणे बरे.

२.  माझ्याकरिता नीतिमंदिराची दारे उघडा 
मग आत जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन. 
प्रभूकडे जायचे हे दार. यातून सज्जन प्रवेश करील. 
प्रभू तू माझे ऐकलेस, माझा उद्धारकर्ता झाला, 
म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

३.  प्रभू आम्हांला वाचव. प्रभू आमची भरभराट कर. 
प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. 
प्रभूसदनातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. 
प्रभू, परमेश्वर, आमचा प्रकाश आहे.



जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
येरुशलेमला सुवार्ता सांगण्यासाठी आपला स्वर उंच कर पहा, प्रभू परमेश्वर पराक्रमी पुरुषासारखा येत आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ७ : २१, २४-२७
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांना स्वर्गराज्य मिळेल."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले “मला प्रभुजी, प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाला स्वर्गराज्यात प्रवेश मिळेलच असे नाही. माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल.”
“तेव्हा, हे माझे बोल ऐकून त्याप्रमाणे वागणारा प्रत्येकजण आपले घर एखाद्या खडकावर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला पण ते पडले नाही कारण ते खडकावर बांधलेले होते. तसेच माझे हे वचन ऐकून त्याप्रमाणे न वागणारा प्रत्येकजण, आपले घर वाळूवर बांधणाऱ्या माणसासारखा मूर्ख ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला तेव्हा ते पडले. अगदी कोसळून पडले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या शिष्यांना खडकावर आणि वाळूवर बांधलेल्या घरांचा दाखला सांगतो. या दाखल्याद्वारे ख्रिस्तआपणांस जाणीव करून देतो की, आपले हृदय हा आपल्या शरीराचा गाभा आहे. या गाभ्यामध्ये जर आपण ख्रिस्त, देवशब्द आणि प्रार्थना यामध्ये दृढ असलो आणि त्यांना प्राधान्य दिले तर जगातील कुठलीच शक्ती किंवा संकट आपला पराभव करू शकणार नाही. परंतु जर का आपण भौतिक शक्तीवर विसंबून राहिलो तर आपला विनाश नक्कीच आहे. आपल्या जीवनाचा पाया ख्रिस्त, देवशब्द आणि प्रार्थना ह्यांच्या खडकावर बांधला आहे की मानवी शक्तीच्या वाळूवर ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने श्रद्धेने आचरणात आणून सुज्ञतेने जीवन जगण्यास प्रेरणा व बळ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या