Marathi Bible Reading | Friday 2nd December 2022 |1st week of Advent

आगमनकाळातील पहिला सप्ताह   

शुक्रवार २ डिसेंबर  २०२२

“तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो. "



 संत बिबियाना  

कुमारिका व रक्ताक्षी (३६३)

रोम शहरामध्ये पाचव्या शतकात संत विवियाना हिच्या नावाने एक ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यामध्ये तिचा मृत देह अविनाशी अशा अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला होता. पोप संत सिम्प्लीसिऊस ह्यांनी ते मंदिर आशीर्वादित केले होते. तिचे दुःखसहन आणि त्यामागची पार्श्वभूमी ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही.
एका मौखिक परंपरेनुसार रोम शहराचे माजी प्रमुख फ्लेवियन आणि त्याची पत्नी डॅफ्रोझा ह्यांची विवियाना ही मुलगी होती. दोघेही पती-पत्नी खूप श्रद्धाळू व धार्मिक वृत्तीचे जीवन जगत होते. त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे संतापून मूर्तिपूजकांनी फ्लेवियन ह्याला तापत्या लोखंडी सळीने भाजून काढले. त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला व त्याला एका जंगलात हाकलून दिले. तिथे जखमी अवस्थेत तो मरण पावला.
बिबियानाची आई हीसुद्धा आपल्या पतीप्रमाणे अतिशय भक्तिमान व साध्वी वृत्तीचे जीवन जगत होती, त्यामुळे तिचाही तसाच छळ करण्यात आला... तिला बराच वेळ एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले व शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला.
त्यांच्या मागे उरलेल्या बिबियाना आणि डेमेट्रीया ह्या दोन बहिणींना खूप दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यांच्याकडची सर्व संपत्ती व मालमत्ता मूर्तिपूजकांनी व त्यांच्या मातापित्याच्या मारेकऱ्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. पाच महिने या दोन कुमारिका उघड्यावर वणवण हिंडू लागल्या. परंतु अशाही अवस्थेत उपवास व प्रार्थना करीत दोघींनी ते दिवस कृपावंत करून टाकले.
रोमचा राज्यपाल अॅप्रोनियानुस ह्याने ज्युलियन ह्या सम्राटाच्या काळात ह्या
दोन्ही बहिणींना आपणासमोर हजर होण्याचा हुकूम सोडला. विवियानाची बहीण डेमेट्रीया हिने न्यायालयामध्ये सर्वांसमक्ष आपली ख्रिस्ती श्रद्धा धैयाने प्रकट केली त्यानंतर ती थरथर कापू लागली आणि काही क्षणातच खाली पडली व मरण पावली.
विवियाना हिला त्या शहरातील कुप्रसिद्ध स्त्री रुफिना हिच्या ताब्यात देण्यात आले. ती चांगली कलावंतीण होती, परंतु तिने विवियानाला वेगळ्या पद्धतीने छळायला सुरुवात केली. परंतु रूफिनाचे सर्व प्रयत्न असफल ठरले. तिला श्रद्धेपासून आणि शुद्धतेपासून छळण्याचा रूफिनाने खूप खूप प्रयत्न केला पण सारे मुसळ केरात !
शेवटी बिबियाना हिला एका खांबाला बांधण्यात आले. काटेरी चाबकाने तिला फोडून काढण्यात आले. मरेपर्यंत तिला चाबकाचे फटके मारण्यात आले. हे सर्व तिने अगदी प्रसन्नमुखाने सहन केले आणि आपल्या मारेकल्यांच्या समोर तिने आपली मान टाकली.
बेवारशी कुत्र्यांनी तिचे शरीर फाडून खावे ह्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह उघड्यावर टाकून दिला. परंतु एकही कुत्रा तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करण्यास धजला नाही. शेवटी दोन दिवसांनी तिच्या मातापित्यांच्या बहिणीच्या खाचेशेजारी जॉन नावाच्या धर्मगुरूंनी लिसिनिअस राजवाड्यानजीकच रात्रीच्या वेळी तिला पुरले.
✝️   

पहिले वाचन : यशया २९:१७-२४

वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"त्या दिवशी आंधळ्यांना दृष्टी मिळेल."

प्रभू परमेश्वर म्हणतो : “लबानोनची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील आणि आंधळ्याचे डोळे काळोखापासून मुक्त होऊन पाहतील. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल. लोकांतील दीनजण इस्राएलच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील. कारण जुलूम करणारे नाहीसे झाले आहेत. हेटाळणी करणारे संपले आहेत. वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत. ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्टवक्त्यांसाठी जाळे पसरतात आणि धार्मिकांना धडधडीत लबाडीने उलथून पाडतात.”
म्हणून आब्राहामचा उद्धारकर्ता परमेश्वर, याकोबच्या घराण्या विषयी म्हणतो “यापुढे याकोब लज्जास्पद ठरणार नाही आणि त्याचा चेहरा फिका पडणार नाही. कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाव पवित्र मानतील, याकोबच्या पवित्र प्रभूला पवित्र मानतील आणि इस्राएलच्या देवाचे भय बाळगतील. भ्रांतबुद्धी जनांना समज येईल आणि कुरकुर करणारे बोध घेतील.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :२७:१-४, १३-१४

प्रतिसाद :   प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे.

१ ) प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे 
मी कोणाला भिऊ ? 
प्रभू माझ्या जिवाची संरक्षक तटबंदी आहे. 
मला कुणाची भीती ?

२ ) मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली 
आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन. 
ती म्हणजे साऱ्या आयुष्यभर मी प्रभुसदनी रहावे. 
प्रभूचे सुंदर ध्यान पहात रहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे. 

३) माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल,
अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर. 
हिंमत बाळग, धीर धर. प्रभूचीच प्रतीक्षा कर.



जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे आकाशा, वरून वृष्टी कर. आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो. तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित होवोत.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ९ : २७-३१
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 येशूवर श्रद्धा ठेवल्याने दोन आंधळे बरे होतात.

येशू त्याच्या गावातून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे येऊ लागले ते मोठमोठ्याने ओरडू लागले. “अहो, दावीदपुत्र आमच्यावर दया करा."
येशू घरात गेला तेव्हा ते आंधळे त्याच्याकडे आले. येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला हवे ते मी करू शकतो अशी तुमची श्रद्धा आहे काय ?"
“होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, “तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो. "
त्याबरोबर त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “हे कोणाला कळू नये म्हणू खबरदारी घ्या."
पण ते तेथून निघाले आणि त्या साऱ्या प्रदेशात येशूविषयी सांगत सुटले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : उत्पत्तीच्या पुस्तकात नमूद केले आहे की, परमेश्वराने सहा दिवसांत सृष्टी निर्माण केली.  आकारविरहीत सृष्टीला आकार दिला. ख्रिस्त परमेश्वराचे हे सत्कार्य अखंडीत पुढे चालू ठेवतो. याची प्रचीती आपल्याला आजच्या शुभवर्तमानात होते. शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू दोन आंधळ्यांना दृष्टी देतो. दृष्टी मिळण्याआधी ते अपूर्ण होते. परंतु दृष्टी लाभल्याने ते पूर्ण झाले. ख्रिस्ताने त्यांना पूर्ण केले. त्यांची नवनिर्मिती केली. आंधळ्यांप्रमाणे आपणामध्ये जर कसली उणीव, कमरता किंवा कमजोरी असेल तर ती ख्रिस्ताच्या चरणी ठेवूया आणि आपणांस परिपूर्ण करावयास मोठ्या श्रद्धेने कळकळीची विनंती करूया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्यातील अश्रद्धेचा व पापाचा अंधकार दूर कर. तुझ्या तारणदायी प्रकाशात येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या