आगमनकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२
“तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत.
संत ह्यूबर्ट
महागुरू वर्तनसाक्षी (६५६-७२७)
१५ व्या शतकातील एका परंपरेनुसार ह्या संताचे परिवर्तन गुडफ्रायडेच्या दिवशी झाल्याचे सांगण्यात येते. तो एक हाडाचा शिकारी आणि प्रामाणिक राजदरबारी (सरदार) म्हणून जीवन जगत असताना त्याला साक्षात्कार झाला. एकदा शिकारीवर असताना मिळालेल्या शिकारीत त्याला क्रुसावर तळमळणारा प्रभू येशू ख्रिस्त दिसला. तेव्हापासून त्याने शिकार करणे सोडले आणि मानवी आत्मे जिंकण्यासाठी शब्दांचे बाण घेऊन तो निघाला. ह्या घटनेमुळे तो शिकाऱ्यांचा आश्रयदाता संत म्हणून ओळखला जातो. तसेच हायड्रोफोबिया ह्या आजारापासून रोगमुक्ती मिळविण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
प्रेषितांनी जसा ख्रिस्त येशूचा सहवास अनुभवला तसा तो आपण सुद्धा अनुभवित आहोत. पुनरुत्थित प्रभू आपल्या मध्ये हजर आहे. त्याने केलेल्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाने आपण त्याची सहभागिता अनुभवीत असतो. आजही प्रभू येशू पवित्र भाकरीच्या रुपाने आपल्याशी एकरुप होत असतो. प्रभूची वचने आपल्याला जीवनदायी मार्ग दाखविताता.आपल्या प्रार्थनेद्वारे व त्याचे वचनें आणि त्याच्या आज्ञा पाळल्यानेप्रभूचा सहवास आपल्यला मिळतो
प्रभू येशू सर्वांना तारणदायी जीवन देण्यास आणि सर्वकाळच्या आनंदात सहभागी बनविण्यास आला होत. ह्या आगमन काळात आपण त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची प्रयत्न करु या.
✝️
पहिले वाचन : यशया ११ :१-१०
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर राहील."
इशायाच्या खोडाला धुमारा फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे आज्ञापालन त्याला आनंददायक वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय देणार नाही. तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीला ताडण करील. आपल्या मुखाच्या फुंकरीने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल.
लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र राहतील. त्यांना लहान मूल वळील. गाय आणि अस्वल मित्र बनतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. छोटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत आणि नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ७२:१-२, ७- ८,१२-१३,१७
प्रतिसाद : त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल.
१) हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे.
या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे,
म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्यरीतीने न्यायनिवाडा करील.
तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल.
२) त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल
आणि चंद्र लोप पावेपर्यंत, सर्वत्र शांती नांदेल.
एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत,
युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल.
३)त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत
आणि असहाय्य लोकांनादेखील तो सोडवील.
गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील.
गरजवंतांच्या जिवांचे तो रक्षण करील.
४) त्याचे नाव चिरंजीव होवो, सूर्यासारखे अनंत टिको.
त्याच्या नावाने लोक आपल्याला धन्य म्हणोत
सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे.
तू सिद्ध केलेले तारण आम्हांला प्रदान कर
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १० : २१-२४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करतो."
येशू पवित्र आत्म्याने प्रभावित होऊन प्रार्थना करीत म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो. कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू लहान मुलांना प्रकट केल्या आहेत. होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसेल. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून कोणाला ठाऊक नाही.
मग शिष्यांकडे वळून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी आणि राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा सांगतो की, देवराज्य हे असे आहे की, जिथे लांडगा किंवा कोकरू एकत्र राहील, चित्ता हा लहान कोकरासमोर शांतपणे झोपलेला दिसेल, वासरू आणि सिंहाचे पिल्लू एकत्र चरतील आणि एक लहान मुल त्यांना चरण्यासाठी दिशा दाखवेल व त्यांच्या पुढे चालेल. ह्या गोष्टी ऐकून आपण म्हणू की, हे अशक्य आहे. असे होऊच शकत नाही आणि खरंतर यशया संदेष्टा तोच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अतिशयोक्ती पूर्ण अलंकारिक भाषा वापरत आहे. लांडग्याला कोकराबरोबर शांतीने राहताच येऊ शकत नाही, जोपर्यंत लांडगा त्याचा कपटीपणा आणि स्वार्थीपणा सोडत नाही. सिंहाला हे शक्यच नाही की, तो गायीबरोबर चरेल जोपर्यंत तो मांसाहारी आणि क्रूरता सोडून स्वःअर्पण करायला शिकत नाही. सर्पाला एका लहान मुलाबरोबर खेळणे अशक्य आहे जोपर्यंत सर्प डंख मारणे सोडून आणि आपले विष दुसऱ्यात सोडून द्यायचे लहान बालकासारखा निरागस होत नाही. त्याचरितीने जोपर्यंत आपण आपल्यातीलवाईट गोष्टी सोडून नितीने वागत नाहीत तोपर्यंत आपण नवीन देवराज्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ह्या अतिशयोक्ती उदाहारणाद्वारे यशया संदेष्ट्याने आपल्यात आमुलाग्र / संपूर्ण बदल घडून यावा म्हणून आव्हान केले आहे. हा संपूर्ण बदल आपल्या जीवनात व्हावा आणि स्वर्गाचे राज्य आपणास प्राप्त व्हावे म्हणून प्रभू येशू मानवरूपात ह्या पृथ्वीवर आला आणि आपल्यामध्ये राहिला. पण अनेकांनी त्याचा स्वीकार केला नाही. दीन- दुबळे, पीडित, गरीब, शोकग्रस्त ह्यांनी मात्र येशूला ओळखले आणि येशूचा आणि त्याच्या शिकवणुकीचा स्वीकार केला. म्हणूनच प्रभू येशूख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात देवाला धन्यवाद देत असताना म्हणतो की, “ज्ञानी आणि , विचारवंत ह्याच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून तू लहान मुलांना प्रकट केल्या आहेत.” येशूचा आणि त्याच्या शिकवणुकीचा आपल्या जीवनात स्वीकार करायला आपण तयार आहोत का ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्हाला तुझे दर्शन घडविल्याबद्दल आणि दिलेल्या कृपादानांबद्दल तुला धन्यावाद देतो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या