Marathi Bible Reading | Monday 28th November 2022 |1st week of Advent


आगमनकाळातील पहिला सप्ताह   

२८ नोव्हेंबर २०२२

येशू त्याला म्हणाला, “मी येतो आणि त्याला बरे करतो." 




संत कॅथरीन लाबोरे   

कुमारिका (१८०६-७६)

बर्गंडी येथील एका श्रीमंत फ्रेंच शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या अकरा मुलांपैकी नववी मुलगी कॅथरीन ही होय. इ.स. १८३० साली पॅरीसमधील सेंट विन्सेंट डी पॉलच्या सिस्टर्स ऑफ चॅरिटी संस्थेमध्ये नवशिष्या म्हणून तिने प्रवेश घेतला. इथेच तिला अतिपवित्र साक्रामेतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत उपस्थितीची प्रखरतेने जाणीव झाली व दर्शन घडले. शिवाय पवित्र त्रैक्याच्या सणाच्या रविवारी तिला ख्रिस्तराजाचा दृष्टांत झाला. त्याहीनंतर तिला पवित्र मरियेने तीन वेळा दर्शन दिले. ह्या दर्शनाविषयी "द सिअर ऑफ रूइ द बाक” मध्ये सविस्तरपणे तिच्या शंकेखोर मार्गदर्शकानेच लिहिलेले आहे.

तिला झालेल्या तीन दर्शनांपैकी दुसऱ्या दर्शनाच्या वेळी २७ नोव्हेंबर रोजी पवित्र मरियेभोवती एक सुंदर मेडल तिच्या दृष्टीस पडली. त्या मेडलवर पुढील शब्द सोनेरी अक्षरांमध्ये कोरण्यात आले होते. “हे पवित्र मरिये तुझ्या, आश्रयाची अपेक्षा करणाऱ्या आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, कारण तू पापांवाचून गर्भी संभवलेली आहेस.” त्यानंतर कॅथरीनच्या कानी एक वाणी पडली, “ह्या दर्शनाचे एक मंडल तयार कर आणि ते आपल्या गळ्यात घाल. जो कोणी श्रद्धेने ही मेडल गळ्यात घालील त्याला खूप मोठ्या कृपादानांची प्राप्ती होईल "

पुढे पवित्र मरियेने तिला असेही स्पष्टीकरण दिले की तिच्या हातातून निघणारे प्रकाश किरण म्हणजे वेगवेगळ्या भाविकांनी केलेल्या मागण्यांच्या उत्तरार्थ दिलेली कृपादाने होती. मेडलच्या मागील बाजूस 'M' ह्या इंग्रजी अक्षरावर प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाच्या वरच्या भागावर एक क्रूस कोरलेला होता आणि त्या हृदयाभोवती काटेरी मुकुटासारखा मुकूट गुंफलेला होता. बाजूला पवित्र मरियेच्या अतिनिष्कलंक हृदयाचे चित्र होते. यातून तलवार भोसकून आरपार गेलेली दिसत होती. हा सर्व जणू आपल्या संपूर्ण श्रद्धेचा सारांश होता.

ह्या सर्व दृष्टान्ताचे गुपित फक्त कॅथरीनच्या आध्यात्मिक सल्लागारालाच ठाऊक होते. जेव्हा प्रत्यक्ष मेडल तयार करून जिकडे तिकडे वाटण्यात आली, त्यावेळी उलट सुलट अफवांना ऊत आला त्यामुळे नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट करून सांगण्यासाठी सिस्टर्स ऑफ चॅरीटींच्या भगिनींनी (खरी वस्तुस्थिती समजून सांगण्यात) ४० वर्षे 'पोल्टी यार्ड' येथे घालविली. ह्या चाळीस वर्षानंतर कॅथरीन मरण पावली.

लवकरच ही मेडल धारण केल्यामुळे वेगवेगळे आजार बरे करणे, आध्यात्मिक कृपादानांचा लाभ होणे अशा प्रकारचे चमत्कार घडू लागले. त्यामुळे त्या मेडलला 'चमत्कारी मेडल' असे नाव पडले.

१८४२ साली अल्फान्से रॅटिस्बॉन ह्या कॅथलिक विरोधी यहुदी किंबहुना नास्तिक व्यक्तीचे परिवर्तन झाले. हा ह्या मेडलच्या सामर्थ्याचा परिणाम मानला जातो. पवित्र मरियेच्या विनंतीनुसार “मरियेची मुले” नावाची संघटना स्थापन झाली ह्या संघटनेचे सभासद चमत्कारी मेडल धारण करतात

तितकीच साधी सोपी होती. ती म्हणत असे, “मी स्वतःला देवापुढे सादर सिस्टर कॅथरिनची चिंतन मनन करण्याची पद्धत अतिशय सुरेख होती. करते" आणि त्याला म्हणते, “हे प्रभो, मी इथे आहे तुला जे काही द्यायचं आहे ते मला दे." जर त्याने मला काही दिले तर मी आनंदी होऊन त्याचे आभार मानीत असे, जर त्याने मला काही दिले नाही तरीही मी त्याला धन्यवाद देत असे कारण मी काही प्राप्त करून घेण्यास पात्र नाही ह्याची मला जाणीव असे. त्यानंतर माझ्या मनात येणारे सर्व विचार मी त्याच्यापुढे मांडीत असे व त्याची वाणी ऐकत राही.”

संत कॅथरीन हिचा मृत्यू ३१ डिसेंबर १८७६ रोजी झाला. तिच्या मरणानंतर ५६ वर्षांनी तिचे थडगे उघडण्यात आले तेव्हा तिचे शरीर न कुजलेल्या अवस्थेत आढळते. हात आणि चेहरा गुलाबी रंगाचा, बाहू मऊ मलमली आणि डोळे खोबणीमध्ये व्यवस्थितपणे शांत असलेले दिसून आले. पोप पायस बारावे ह्यांनी २७ जुलै १९४७ रोजी तिला संतमालिकेमध्ये गुंफून घेतले.

चिंतन : पवित्र मरियेने संत कॅथरीन लाबोरे हिला म्हटले, "माझ्या मुली चांगुलपणाचा देव तुझ्यावर एक प्रेषितकार्य सोपवू इच्छितो. त्यामुळे तुला बरेच आत्मक्लेश सहन करावे लागतील. परंतु तू त्यावर मात करशील. कारण तू जे काही करशील ते देवाच्या गौरवासाठीच होईल.”
✝️   

पहिले वाचन :  यशया ४ : २-६

वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “भूमीचे उत्पन्न इस्राएलच्या बचावलेल्या लोकांना वैभव आणि शोभा देणारे होईल."

परमेश्वराचा अंकुर शोभिवंत आणि तेजस्वी होईल. भूमीचे उत्पन्न इस्राएलच्या बचावलेल्या लोकांना वैभव आणि शोभा देणारे होईल. सियोनेत, उरलेल्या येरुशलेमात शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव येरुशलेमातील जीवन पावणाऱ्यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील. प्रभू न्याय करणाऱ्या आणि दहन करणाऱ्या आत्म्याद्वारे सियोनातून कन्यांची मलिनता धुवून टाकील आणि येरुशलेमातून तिचा रक्तदोष दूर करील, परमेश्वर सियोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर आणि त्याच्या सणमेळ्यावर दिवसासाठी धूपमय मेघ आणि रात्रीसाठी प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील. त्याच्या सर्व वैभवावर छत्र असेल आणि दिवसा ऊन लागू नये, सावली मिळावी आणि वादळ आणि पाऊस यापासून रक्षण व्हावे, निवारा आणि आश्रय असावा म्हणून हा मंडप घालण्यात येईल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  १२२:१-२, ३-४, ८-९

प्रतिसाद :चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ 

१) "चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत

२) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी 
तू बांधलेली आहेस.
इस्राएलला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे 
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, 
परमेश्वराच्या नावाने उपकारस्मरण 
करण्यासाठी चढून येतात.

३) “माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता 
तुझ्यामध्ये शांती वसो !” अशी मी प्रार्थना करीन. 
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता आणि
तुझ्या कल्याणाकरिता मी झटत जाईन.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण तुझी कृपादृष्टी आम्हांवर वळव म्हणजे आमचे तारण होईल.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ८:५-११
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण स्वर्गराज्यात येतील "

येशू कफर्णहूम गावात आला, तेव्हा एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि याचना करू लागला, महाराज, माझा चाकर पक्षघाताने घरात पडून आहे आणि त्यालाभयंकर वेदना होत आहेत.
येशू त्याला म्हणाला, “मी येतो आणि त्याला बरे करतो."
पण तो शताधिपती त्याला म्हणाला, “महाराज, आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही. आपण एक शब्द फक्त उच्चारा म्हणजे माझा चाकर बरा होईल. मी एक हुकमाचा ताबेदार आहे. माझ्या हाताखाली सेवक आहेत. एखाद्याला मी जी म्हणालो, की तो जातो; दुसऱ्याला ये म्हणालो, की तो येतो; चाकराला म्हटले, हे कर, की तो ते करतो."
हे ऐकूण येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येणाऱ्यांना तो म्हणाला "मी तुम्हांला खरे सांगतो, एवढी जबरदस्त श्रद्धा मला इस्राएलातही आढळली नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर स्वर्गराज्यात पंगतीला बसतील.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :रोमन साम्राजाच्या अमदानीत शताधिपती हे एक महत्त्वाचे पद होतं. शिपाई, कामगार त्यांच्या हाताखाली असायचे. त्याकाळी हे शताधिपती यहुदी लोकांवर हुकुमत गाजवित मात्र आजच्या शुभवर्तमानातील हा शताधिपती फारच निराळा होता. त्याला ठाऊक होते की, यहुदी लोक परराष्ट्रीयांच्या घरी जाण्याअगोदर स्वच्छतेच्या रुढी परंपराचे पाळण करीत. म्हणून तो प्रभूला म्हणतो, “महाराज, आपण माझ्या घरी पायधूळ झाडावी एवढी माझी योग्यता नाही.” या शताधिपती पासून काही गोष्टी शिकूया. 
१. हा शताधिपती येशूवर हुकूम न गाजवता आपली विनंती अगदी नम्रपणे येशू पुढे ठेवतो. 
२. ह्या शताधिपतीचे त्याच्या चाकराविषयी असलेले खरे प्रेम, सहसा शताधिपती आपल्या चाकरांना तुच्छ लेखीत पण हा शताधिपती मात्र आपल्या सेवकासाठी येशूकडे दया याचना करत असताना दिसतो. 
३. त्याचा येशूवर असलेला विश्वास आणि त्याची येशूवरील अवलंबिता ही वाखाणण्याजोगी होती. त्यांची ही श्रद्धा पाहून येशू आश्चर्यचकित झाला. शताधिपतीच्या श्रद्धेची त्याने वाहवा केली. त्याच्या श्रद्धेमुळे आणि ठाम विश्वासामुळे प्रभू येशूने त्यांच्या पक्षाघाती सेवकांस लांबूनच बरे केले. आपणही त्या शताधिपतीसारखे आपल्या श्रद्धेत बळकट व्हावे म्हणून दररोज वैयक्तिक प्रार्थना, बायबल वाचन आणि त्याच्यावर मनन-चिंतन, कौटुंबिक प्रार्थना, मिस्साविधीमध्ये सहभाग ह्या सर्व गोष्टी करण्याची गरज आहे....

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व श्रद्धेत दृढ बनण्यास मला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या