Marathi Bible Reading | First Sunday of Advent | 27th November 2022


आगमनकाळातील पहिला रविवार  

२७ नोव्हेंबर २०२२

 तुम्हीदेखील तयारीत रहा, करण तुम्हांला कल्पना नाही अशा वेळी मानवपुत्र येईल."



आशा  (Hope ) 

आशेचे किरण घेऊन प्रभू येशू येत आहे


आपला अंत आपणास ठावूक नाही, म्हणूनच प्रभू येशू आपल्याला जागृत राहण्याचे आवाहन करीत आहे. आपण प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आचरण करतो का ह्यावर चिंतन करणे गरजेचे  आहे. संत पौल सल्ला देताना म्हणतो की, 'आपण शिष्टाचाराने वागावे, चैनबाजीत, मद्यपानात, कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. '

प्रभू येशूच्या आगमनाची तयारी करीत असताना आपण आपल्या विचारांवर, शब्दांवर, कृतीवर चिंतन करु या. सर्व प्रकारची सत्कृत्ये करुन व प्रभूबरोबर त्याच्या सहवासात जाऊन ख्रिस्तप्रभूला अपेक्षित पवित्र व शुद्ध जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
✝️   

पहिले वाचन :  यशया २ : १-५

वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या चिरशांतीच्या राज्यात एकत्रित करतो"

आमोजचा पुत्र यशया याला यहुदा आणि येरुशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन : शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत, पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वतांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील, देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, “चला, परमेश्वराने आपले मार्ग आम्हांला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे, याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ या." कारण सियोनातून धर्मशास्त्र आणि येरुशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. देशोदेशींच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तरवार उचलणार नाही. ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत. याकोबच्या घराण्या चल, ये. आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  १२२:१-२, ३-४, ८-९

प्रतिसाद :चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ 

१) "चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत

२) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी 
तू बांधलेली आहेस.
इस्राएलला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे 
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, 
परमेश्वराच्या नावाने उपकारस्मरण 
करण्यासाठी चढून येतात.

३) “माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता 
तुझ्यामध्ये शांती वसो !” अशी मी प्रार्थना करीन. 
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता आणि
तुझ्या कल्याणाकरिता मी झटत जाईन.

दुसरे वाचन :पौलचे रोम १३:११-१४ 

वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"आपले तारण आता जवळ आले आहे."

बंधुजनहो, आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे, कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता तारण आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून अंधकाराची कर्मे टाकून द्या आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करा. दिवसाढवळ्या साजेल असे शिष्टाचाराने चाला. चैनबाजी, मद्यपान, विषयविलास, कामासक्ती, कलह आणि मत्सर यामध्ये राहू नका, तर प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय २४:३७-४४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"प्रभूच्या स्वागतासाठी तयार रहा"

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला : “नोहाच्या काळात जी परिस्थिती होती तीच मानवपुत्राच्या आगमनाच्या वेळी असेल. त्या काळी महापूर येण्याअगोदर, म्हणजे नोहा गलबतावर चढला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते आणि लग्न लावून देत होते. महापूर येऊन ते सगळे वाहून जाईपर्यंत त्यांना काही कळले नाही. मानवपुत्राचे आगमन असेच होईल. शेतात दोघे असतील, त्यातल्या एकाला घेतले जाईल आणि दुसरा मागे ठेवला जाईल. दोघी जात्यावर दळत असतील, त्यातल्या एकीला काढून घेतले जाईल आणि दुसरी मागे ठेवली जाईल. तेव्हा दक्ष रहा. कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येणार आहे हे तुम्हांला माहीत नाही. एवढे मात्र लक्षात ठेवा की, चोर रात्री कोणत्या वेळी येणार आहे हे जर घरमालकाला अगोदर कळले तर तो लक्ष ठेवील आणि आपले घर फोडू देणार नाही. तेव्हा तुम्हीदेखील तयारीत रहा, करण तुम्हांला कल्पना नाही अशा वेळी मानवपुत्र येईल."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आजपासून ख्रिस्तसभा एका नवीन उपासना वर्षात प्रवेश करीत आहे. हा आगमनकाळ दोन टप्प्यात विभागण्यात आलेला आहे. पहिल्या विभागात येशूच्या पुनरागमनाच्या तयारीकडे ख्रिस्तसभा भाविकांचे लक्ष वेधते. दुसऱ्या विभागात ख्रिस्तसभा येशूच्या पहिल्या आगमनाची स्मृती साजरी करते. आजची वाचने प्रभूच्या पुनरागमनासाठी आपण तीन प्रकारची  उलथापालथ करावी असा विचार मांडतात. 
अ. हिंसात्मक प्रवृत्तीकडून शांतीकडे : यशया संदेष्ट्याने ज्या काळात संदेश दिला. (इसपू. ७४१ ते ७०१) तो काळ राजकीय धामधुमीचा होता. शेजारी असलेले असिरिया राष्ट्र इस्राएलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. अशा पार्श्वभूमीवर आजचे पहिले वाचन दोन परस्परविरोधी प्रतिमा आपल्यासमोर उभी करते. युद्धाचे प्रतीक असलेली राष्ट्रे आणि शांतीचे प्रतीक असलेले जेरूसलेम. भाविकांनी हिंसेकडून शांतीच्या दिशेने वाटचाल सुरू करावी असे त्यात | सूचित करण्यात आलेले आहे. 
ब. अंधारातून प्रकाशाकडे : रोमचे ख्रिस्ती लोक छळाच्या भीतीने पुन्हा एकदा आपल्या पुर्वायुष्याकडे वळण्याच्या विचारात होते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल दिवस व रात्र, अंधार व प्रकाश या प्रतिमा वापरून हे त्यांना पापी जीवनाकडून नीतिमान जीवनाकडे येण्याचे आवाहन करतो. 
क. निष्काळजीपणा-कडून सतर्कतेकडे : आजच्या शुभवर्तमानामध्ये संत मत्तय दोन प्रतिके वापरतो. शेतात काम करणारी माणसे आणि जात्यावर दळणाऱ्या स्त्रिया. ह्या दोन्ही प्रतिकामध्ये एक व्यक्ती घेतली जाईल तर दुसरी तशीच ठेवली जाईल. ह्याचा अर्थ, प्रभूच्या आगमन समयी काही लोक निष्काळजीपणे जीवन जगणारे असणार आहेत तर काही डोळ्यांत तेल घालून, जागृत राहून, सतर्कतेने जीवन जगत असणार आहेत. त्यासाठीच आपण या आगमन काळात निष्काळजीपणाकडून सतर्कतेकडे वाटचाल  करायला हवी.
आत्मपरीक्षण : प्रभूचे स्वागत योग्यप्रकारे करता यावे यासाठी मी कोणकोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तू अनपेक्षितपणे येणार आहेस, तुझ्या स्वागतास आम्ही पात्र ठरावेत व तयार असावेत म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या