सामान्यकाळातील ३४ वा सप्ताह
शनिवार २६ नोव्हेंबर २०२२
देवाचे राज्य जवळ आले आहे.
चिंतन : आपल्या विकृत वासनांना शमविण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या अडचणींना वेंगेत घेत असतो. परंतु त्या टाळण्यासाठी आपण बोटदेखील लावीत नाहीत. एक पैशाचेदेखील दुःख भोगण्यास आज कुणी तयार नाही हीच जीवनाची खरी शोकांतिका आहे. - पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड
✝️
पहिले वाचन : प्रकटी. २२:१-७
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पुढे रात्र असणार नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील.”
देवदूताने देवाच्या आणि कोकराच्या राजासनातून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला, योहान ह्याला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूला बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्याला आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील आणि त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुगे राज्य करतील.
नंतर तो मला म्हणाला, "ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्या सेवकांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. पाहा, मी लवकर येतो.”
ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९५:१-७
प्रतिसाद : ये प्रभू ये, प्रभू येशू ये.
१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू या,
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.
उपकारस्मरण करत आपण त्याच्यापुढे जाऊ,
स्तोत्रे गाऊन त्याचा जयजयकार करू.
सर्व देवाहून तो थोर राजा आहे.
२) त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत.
पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला,
कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली.
३ )याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्याला नमन करू,
कारण तो आपला देव आहे आणि
आपण त्याच्या कुरणातील प्रजा,
त्याच्या हातचा कळप आहो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २१:३४-३६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंत:करणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला फासाप्रमाणे अकस्मात पकडील, कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आजचे शुभवर्तमान आपणांस आपल्या जीवनात डोकावण्यास सांगत आहे. येशू आपणा सर्वांस जागृतेचा संकेत देऊन आपल्याला सावधान करीत आहे. “सांभाळा” नाहीतर आपल्या जीवनातील अनैतिकता आपणांस नष्ट करील. आपल्या जीवनात अनेकप्रकारचे मोह येतात आणि अनेकदा आपण ह्या मोहांना बळी देखील पडतो. येशू आज आपणांस सावध करीत आहे जेणेकरून आपण आपल्या मोहांवर | परमेश्वराच्या कृपेद्वारे विजय मिळवू शकू. आपले जीवन ही एक परमेश्वराची देणगी आहे आणि म्हणून ही देणगी पवित्र ठेवण्याचे कर्तव्य आपले आहे. आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा एक दिवस शेवट होणार आहे. त्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे. म्हणजेच आपल्या जीवनाची पावित्र्यता राखली पाहिजे. जेणेकरून आपण परमेश्वरासमोर त्याच्या न्यायासाठी समर्थ होऊ. त्यामुळे सर्वप्रकारच्या अधाशीपणापासून,
दारूबाजी आणि संसाराच्या चिंता यांपासून आपण दूर राहिले पाहिजे. आपण हे कसे करू शकतो तर प्रभू येशूवर विश्वास ठेवून, सर्व परिस्थितीत आपला वेळ प्रार्थनेत घालवून आणि प्रभूयेशूने शिकवलेल्या शिकवणुकीनुसार आपले जीवन जगून हे सर्व करण्यासाठी परमेश्वराचे सामर्थ्य आपणांस लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
प्रार्थना : हे परमेश्वरा, सर्वदा तुझ्याशी संवाद करण्यास व तुझा सहवास, 'अनुभवण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या