Marathi Bible Reading | Friday 25th November 2022 | 34th Week In Ordinary Time |


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह 

शुक्रवार २५ नोव्हेंबर  २०२२

देवाचे राज्य जवळ आले आहे.





अलेक्सझांन्द्रियाची संत कॅथरीन 

प्रभूची वचने आपल्या संपूर्ण जीवनाला पोषक असून ह्या अमृत वचनांमुळे आपण प्रभूच्या प्रकाशात व सहवासात आनंदी जीवन जगू शकतो. ही  वचने आपल्याला ह्या जगातीला आव्हानांना सामोरे जाण्यास प्रेरणादायी आहेत.  म्हणूनच दररोज आपण बायबल वाचन-चिंतन व मनन करुन ह्या अमृवचनांचा साठा आपल्या अंत:करणात साठवायला हवा. 
✝️   

पहिले वाचन :  प्रकटी.  २०:१-४,११-२१:२

वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. मी नवी येरुशलेम स्वर्गातून उतरताना पाहिले."

मी स्वतः योहानने एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती आणि त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर ह्याला धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडलेले पाहिले.
नंतर मी राजासने पाहिली, त्यांवर कोणी बसले होते. त्यांना न्याननिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
नंतर मोठे पांढरे राजासन आणि त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी आणि आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांना बाहेर सोडले, मृत्यू आणि अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला तेव्हा मरण आणि अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.
नंतर मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही पाहिली, पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर, नवे येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते वरासाठी शृगांरलेल्या वधूप्रमाणे सजवलेले होते.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  ८४:३-६,८

प्रतिसाद :  परमेश्वर लोकांमध्ये निवास करतो.

१) माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची 
उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. 
माझा जीव आणि देह जिवंत देवाला हर्षाने 
आरोळी मारत आहेत.

२) हे सेनाधीश परमेश्वरा, 
माझ्या राजा, माझ्या देवा, 
तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास 
आणि निळवीला आपल्या पिलांसाठी 
कोटे बांधायला स्थळ मिळाले आहे.

३) तुझ्या घरात राहणाऱ्यांनी केवढी धन्यता ! 
ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. 
ज्या मनुष्यांना तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, 
ते केवढे धन्य! 
त्यांची शक्ती अधिकाअधिक वाढत जाते.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:२९-३३

वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.'

येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड आणि इतर झाडे पाहा, त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना शिकवण देताना त्यांचे लक्ष निसर्गातील काही घटकावर केंद्रित करीत आहे. आपणा सर्वांस ठाऊक आहे की, निसर्गातील वेगवेगळ्या ऋतुं प्रमाणे निसर्गात वेगवेगळे बदल घडून येतात. येशूख्रिस्त येथे वसंत ऋतूचे उदाहरण देतो. वसंत ऋतूत अनेक झाडांचा जुना पाला गळून पडतो आणि पाने पडलेल्या झाडांना पाहून असे वाटते की, ती झाडे ओसाड झालेली आहेत किंवा मरुन गेली आहेत. पण त्यांना नवीन पालवी आल्यावर मात्र ही झाडे टवटवीत दिसतात, नवीन दिसतात. जे जुने आहे ते नष्ट होते आणि काहीतरी नवीन पहायला मिळते. येशू ख्रिस्त सांगत आहेत की, ह्या जगातील सर्व तयार केलेल्या किंवा बनवलेल्या सजीव-निर्जीव गोष्टी नष्ट होतील परंतु प्रभूची वचने मुळीच नाहिशी होणार नाहीत. आपल्या स्वतःच्या अनुभवातून आपणांस ठाऊक आहे की, आपल्या जीवनात आणि ह्या जगात अनेक बदल घडून येतात, काही बदल चांगले तर काही दुःखदायी आणि कठीण; परंतु प्रभू ख्रिस्त आपणांस खात्री देत आहे की, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर अवलंबून राहू शकतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या वचनांचे चिंतन करुन ती आचरणात आणण्यास व  तुझ्या शी संवाद साधण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या