Marathi Bible Reading | Thursday 24th November 2022 | 34th Week In Ordinary Time |


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह 

गुरुवार २४ नोव्हेंबर  २०२२

ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे







संत अँड्रयू डँग लाक व सहकारी 

रक्तसाक्षी,


✝️   

पहिले वाचन :  प्रकटी.  १८:१-२.२१-२३;१९:१-३.९

वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

महान नगरी बाबेल पडली आहे."

मी, स्वतः योहानने दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला,
"पडली, मोठी बाबेल पडली. ती भुतांची वस्ती आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय सर्व प्रकारच्या अशुद्ध आणि ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.”नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले: "अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल आणि ह्यापुढे कधीही सापडणार नाही. वीणा वाजवणारे गवई, पावा वाजवणारे आणि कर्णा वाजवणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही आणि वधुवरांचे शब्द तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाहीत. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकवली गेली. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली: "आलेलुया ! तारण, गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे आणि नीतीचे आहेत.
ज्या मोठ्या कलावंतीणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.” ते दुसऱ्यांदा म्हणाले,
“आलेलुया ! तिचा धूर युगानुयुगे वर चढत आहे." तेव्हा देवदूत मला म्हणाला: “हे लिही की, कोकराच्या लग्नाच्या मेजवानीला बोलावलेले ते धन्य होत.”

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  १००:१-५

प्रतिसाद : कोकराच्या लग्नभोजनाला बोलावलेले ते धन्य होत.

१) अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा, 
हर्षगीत गात त्याच्यापुढे या.

२) परमेश्वर हाच देव आहे हे जाणा 
त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, 
आम्ही त्याचेच आहो. 
आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.

३) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात, 
स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, 
त्याचे उपकारस्मरण करा. त्याच्या नामाला, 
धन्यवाद द्या.

४) खरोखर परमेश्वर किती चांगला आहे, 
त्याची दया सनातन आहे.
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:२०-२८
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"परराष्ट्रीयांच्या वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील.”

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “येरुशलेमला सैन्यांचा वेढा पडत आहे असे पहाल तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे येरुशलेमत असतील त्यांनी बाहेर निघून जावे आणि जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये. कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसांत ज्या गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार ! कारण देशावर मोठे संकट येईल आणि ह्या लोकांवर कोप होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करतील सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांचा वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील.”
तेव्हा आकाशात सूर्य, चंद्र आणि तारे ह्यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभीत होऊन गोंधळात पडतील. भयाने आणि कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगळीत होतील. आकाशातील शक्ती कंपायमान होतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आजची दोन्ही वाचने आपणांस भयानक, नैराश्य, उजाडपणा आणि भीती अशाप्रकारची चित्रे दाखवत आहे. प्रभू येशूख्रिस्त येरूसलेमच्या नाशाबद्दल तसेच शेवटच्या काळात कोणत्या तऱ्हेची चिन्हे आपणास दृष्टीस पडतील त्याचा उल्लेख आजच्या शुभवर्तमानात केला आहे. खरे पाहाता सध्याच्या काळातच आपण ह्या सर्वप्रकारच्या चिन्हांचा अनुभव घेत आहोत.२०२० हे वर्ष संपूर्ण मानवजातीला आव्हान देणारे वर्ष होते. कोरोना ह्या महामारीने संपूर्ण जगाला हादरून टाकले, अनेकांना ह्या रोगाची बाधा होऊन ते मरण पावले. कुटुंब उध्वस्त झालेली होती. संशोधक, तज्ञ विचारवंत, डॉक्टर्स यांच्या अथक प्रयत्नांनी सुरुवातीला लसीकरणाच्या रूपाने मानवाला दिलासा देण्याचे प्रयत्न केले. परंतु तिथे देखील बराच गोंधळ चालला होता. सरकारी योजनाचा सर्व सामान्यांना सुरुवातीला लाभ उठवता आला नाही. सर्व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजच्या दोन्ही वाचनांनी जरी आपणांस भयानक परिस्थिती दाखवली असली तरी वाचनाच्या शेवटला आपणास आशेचा किरण दाखवला आहे. शुभवर्तमान आपणास आपल्या विश्वासात सरळ, ताठ उभे राहून वर पहाण्यास सांगत आहे. दुःख, वेदना, संकटे आणि भीती हैं। क्षणिक आहे पण परमेश्वराचे प्रेम अनंत काळचे आहे. परमेश्वराच्या ह्या प्रेमाला आपण शरण जाऊया. परमेश्वरावर भिस्त ठेवून प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार चालणाऱ्यास प्रभू येशू मुक्तीचे आश्वासन देत आहे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानाचे भागिदार बनण्यास व तुझ्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र बवावेत म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या