Marathi Bible Reading | Wednesday 23rd November 2022 | 34th Week In Ordinary Time |


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह 

बुधवार २३ नोव्हेंबर  २०२२

तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”





संत क्लेमेंट पहिले

पोप, रक्तसाक्षी, धर्मपाल (---१००)

चिंतन : प्रत्येक चांगले काम प्रसन्नतेने करण्यासाठी आपण मोठ्या उत्साहाने आणि पूर्ण तयारीनिशी पुढे आले पाहिजे. कारण सर्व वस्तूमात्रांचा निर्माता आणि प्रभू आपल्या हाताच्या कृतीकडे पाहून प्रसन्न होतो.-संत क्लेमेंट

ख्रिस्त प्रभूमध्ये आपण सर्वांनी स्नान संस्कार स्वीकारला आहे.  प्रभु येशूद्वारे आपण सर्वजण परमेश्वर पित्याची मुले बनलो आहोत. त्याच प्रेमळ  पित्याची प्रेमाची साक्ष देण्यासाठी प्रभू येशू आपल्याला बोलवित आहे. ख्रिस्ताची देवराज्याची  सुवार्ता जाहीर करून त्याच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे. खरा विश्वासु ख्रिस्ती माणूस कुठल्याही परिस्थितीत ख्रिस्ताची साक्ष अगदी छोट्या-छोट्या आचरणातून देत असतो. केवळ नावाने ख्रिस्ती असणे आणि कर्मकांड म्हणून सर्व ख्रिस्ती विधी पाळणे म्हणजे ख्रिस्ती जीवन जगणे नसावे.

आपल्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबात, शेजोळात, समाजात, सार्वजनिक ठिकाणी अनेक वेळा ख्रिस्ताची साक्ष देण्याची संधी मिळत असते. आपण आपल्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे व आचरणाद्वारे ख्रिस्ती जीवनाचा आदर्श इतरांसमोर ठेवू या. परस्पर प्रेम, सेवा व शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यास प्रयत्नशील बनू या.
✝️   

पहिले वाचन :  प्रकटीकरण १५:१-४
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

"ते मोशेचे गीत आणि कोकराचे गीत गातात.”

मी स्वत: योहानने फार मोठे आणि आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. सात पीडा घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले, त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.
मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काही तरी माझ्या दृष्टीस पडले, श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्यांच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकराचे गीत गात होते:
हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था,
तुझी कृत्ये थोर आणि आश्चर्यकारक आहेत. 
हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे आणि सत्य आहेत,
 हे प्रभो, तुला कोण भिणार नाही ? 
तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही ? 
कारण तूच मात्र पवित्र आहेस 
आणि तुझीन्यायकृत्ये प्रकट झाली आहेत. 
म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  ९८:१,२-३, ७-८, ९

प्रतिसाद : प्रभू तुझी सर्व कृत्ये किती महान आहेत !

१ )परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.

२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले, 
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता 
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.

३) समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग 
आणि त्यात राहणारे हर्षनाद करोत. 
नद्या टाळ्या वाजवोत, पर्वत एकवटून 
परमेश्वरासमोर आनंदाने गावोत.

४) कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. 
तो जगाचा न्याय यथार्थतेने करील 
आणि लोकांचा न्याय सरळपणे करील


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी 
मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.

आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:१२-१९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


 "माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “लोक तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हांला सभास्थाने आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नामासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवायला किंवा तिच्याविरुद्ध बोलायला तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काहीजणांना ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आपल्या बाप्तिस्म्याद्वारे येशू ख्रिस्ताने | आपणांस परमेश्वर पित्याची मुले बनवले आहे. आणि ही परमेश्वराच्या प्रेमाची साक्ष देण्यास आपणा सर्वांस संधी मिळालेली आहे. पण ख्रिस्ताचे खरे शिष्य बनने तितकेसे सोपे नाही. ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार जीवन जगताना आणि इतरांसाठी साक्ष बनताना अनेक अशा आव्हानांना सामोरे जावे लागते. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू येशू आपल्या शिष्यांस त्यांच्या जीवनात येणाऱ्या छळाविषयी सूचित करतो. शिष्यांना कोणत्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतील. त्याचे चित्र तो त्यांच्यापुढे ठेवतो. “तुमच्यावर हात टाकतील,तुमचा छळ होईल, तुरुंगवास भोगावा लागेल.” आज देखील ख्रिस्ती सुवार्तिक आणि गरिबांची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती जनांवर अत्याचार होत आहेत. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जेज्वीट संस्थेचे फा. स्टॅन स्वामी त्यांच्या समाज सेवेद्वारे सुवार्ता घोषवित असताना त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात टाकले गेले व त्यांना न्याय | मिळण्यापूर्वच ते मरण पावले. अशा परिस्थितीत ख्रिस्त आपणांस हमी देत आहे. “तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. " (लुक २१:१८) तसेच मत्तयलिखित शुभवर्तमानात येशू म्हणतो, “जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका.” (मत्तय १०:२८) “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे." (मत्तय ५:११-१२)

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यापासून आमचा कधी ही वियोग होऊ नये म्हणून तुझ्या संरक्षक पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या