Marathi Bible Reading | Tuesday 22nd November 2022 | 34th Week In Ordinary Time |


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह 

मंगळवार २२ नोव्हेंबर  २०२२

"तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. 






संत सिसिलिया

कुमारिका, रक्तसाक्षी (२५०)

संत सिसिलिया हिचा जन्म दुसऱ्या शतकाच्या अखेरीस आलेक्झांडर सेवेरस ह्या सम्राटाच्या कारकीर्दीत रोममध्ये झाला. बालपणापासून तिला संगीत कलेची विलक्षण आवड होती. तशी ती एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्माला आली होती; परंतु तिला ख्रिस्ती वातावरणात लहानाचे मोठे करण्यात आले. लहानपणीच तिने केवळ देवाच्या प्रेमाखातर कुमारिका राहण्याचा निर्णय घेतलेला होता. ती उपवास, प्रायश्चित्त आणि सर्व प्रकारची दयाकृत्ये करीत असे. परंतु तिच्या पालकांची मात्र तिच्यासाठी वेगळीच योजना होती. त्यांनी तिचे लग्न व्हेलेरियन नावाच्या एका सरदारपुत्राशी ठरविले आणि मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात ते पार पडले.
लग्नाच्या सायंकाळी आपल्या कानात लग्नाचे वाधसंगीत घुमत असतानाच आपण देवाकरिता आमरण कुमारिका राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तिने स्वत:शी नूतनीकरण केले. रात्री जेव्हा ती आपल्या पतीसह आपल्या निजावयाच्या खोलीत गेली तेव्हा तिने धीर करून त्याला 'हटले. "मला आपणांस एक गुपित सांगावयाचे आहे. आपणास ठाऊक असेलच की देवाचा एक दूत माझ्यावर लक्ष ठेवून आहे. जर आपण माझ्याशी वैवाहिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तो कोपिष्ट होईल आणि आपणास भयंकर यातना भोगाव्या लागतील आणि जर आपण माझ्या कौमार्याचा आदर राखला तर माझ्याप्रमाणे तो देवदूत आपणावरही प्रेम करील व आपले रक्षण करील.' "

एक शूर सरदारपुत्र अशा प्रकारच्या भावनिक आव्हानाला सहज बळी पडणारा नव्हता, उलट त्याने सिसिलिया हिला तो देवदूत कुठे आहे तो आपणास दाखविण्याची विनंती केली आणि जर आपणास तो देवदूत दिसला तर आपण सिसिलियाची विनंती आयुष्यभरासाठी मान्य करण्याचे वचन त्याने दिले.
त्यावर सिसिलियाने उत्तर दिले की, “जर आपण एकाच खऱ्या व जिवंत
देवावर विश्वास ठेवून स्नानसंस्काराचे पाणी स्वीकारलेत तर आपणांस तो
देवदूत दिसू शकेल." उत्सुकतेपोटी व्हेलेरियनने तेही मान्य केले.
सिसिलियाने व्हेलेरियन ह्याला विशप अर्बन ह्यांच्याकडे पाठविले. त्यांनी व्हेलेरियनला बाप्तिस्मा दिला आणि आनंदाश्चर्याने तो थक्कच झाला. आपल्या घरी परतत असतानाच सिसिलिया एका पांढऱ्या शुभ्र देवदूताच्या शेजारी उभी असलेली त्याच्या दृष्टीस पडली. तो देवदूत व्हेलेरियनच्या जवळ आला आणि त्याने दोघांच्या मस्तकावर गुलाब व जुईच्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी केली.
ह्या संपूर्ण घटनेने व्हेलेरियन अंतर्बाह्य पालटून गेला. त्याने आपल्या भावालाही ख्रिस्ती श्रद्धेचे शिक्षण दिले. त्याचा भाऊ तायबेर्शियस ह्याचीही श्रद्धा दृढ झाली. शेवटी दोघांनी आपल्या रक्तसाक्षित्वाद्वारे आपल्या श्रद्धेवर शिक्कामोर्तब केले. पण अमाल्विअस नावाच्या सेनापतीने त्यांचा शिरच्छेद केला.
त्या दोघांचे मृतदेह पुरून परतलेल्या सिसिलिया हिला सेनापतीने बोलावून घेतले आणि आपली श्रद्धा पायदळी तुडविण्याचा तिला आदेश दिला. सेनापतीच्या धमक्यांना न जुमानता सिसिलिया उत्तरली, "मी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे हे तुला ठाऊक नाही काय?" हे उत्तर ऐकून अपमानित झालेला सेनापती रागाने लालबुंद झाला. त्याने तिला एक संपूर्ण दिवस गुदमरून ठेवले आणि एक संपूर्ण रात्र उकळत्या पाण्यात डुंबवून ठेवले तरीही तिच्या शरीराला यत्किंचितही इजा पोहोचली नाही. शेवटी तिच्या डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले. त्यामुळे ती तीन दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिलेली होती. तिला भेटी देणाऱ्या सर्वांसाठी ती प्रार्थना करीत होती आणि मोठ्या कळकळीने ख्रिस्ताची शिकवण देत होती.
शेवटी ती देवाचे गुणगौरव गात मरण पावली. उपासना संगिताची आश्रयदाती संत म्हणून तिला गौरविण्यात आलेले आहे.

चिंतन: "ख्रिस्तासाठी मरण्याइतके दुसरे काहीही मला अधिक आनंदी करणारे नाही हे आपणांस ठाऊक नाही का?" - संत सिसिलिया


✝️   

पहिले वाचन :  प्रकटीकरण १४:१४-१९
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन

"कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. "

मी स्वतः योहानने पाहिले आणि पाहा, पांढरा मेघ आणि त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक दृष्टीस पडला, त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली."
मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला, त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, "तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलींचे घड तोडून घे, तिची द्राक्ष पिकली आहेत.” तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :  ९६:१०-११,१२-१३
प्रतिसाद :परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

१) राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की, 
परमेश्वर राज्य करतो, जग स्थिर स्थापलेले आहे, 
ते डळमळणार नाही, तो सरळपणे लोकांचा न्याय करील. 
आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, 
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत

२ )शेत आणि त्यातील सर्वकाही उत्सव करोत, 
मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर 
आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे, 
पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे. 
तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
 मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा, 
म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक २१:५-११
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“चिऱ्यावर चिरा राहणार नाही".

मंदिर उत्तम पाषाणानी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी काहीजण बोलत असता येशूने म्हटले, “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही." तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि ज्याकाळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय ?" तो म्हणाला, "तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे आणि तो काळ जवळ आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.
मग त्याने त्यांना म्हटले, "राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणांस जागृत राहण्यास सांगत आहे. "तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावधान रहा.” त्याच्या नावाने अनेक जण येतील आणि लोकांची फसवणूक करतील. आपल्या अंतःकरणात असलेले देवाचे वचन काढून घेण्यासाठी सैतान सतत कार्यशील असतो. सैतानी प्रवृत्ती धारण करून अनेक ढोंगी संदेष्टे  आपल्याकडे येतील. या खोट्या संदेष्ट्यापासून सावध राहण्यास येशू सांगतो. “खोटे संदेष्टे आणि खोटे ख्रिस्त उठतील व साधेल तर निवडलेल्या लोकांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भूते दाखवितील. (मत्तय २४ः२४)” आताच्या काळात अनेक लोक ख्रिस्ताच्या नावाने चुकीची शिकवण देत असताना आपण पाहतो. त्यांच्या गोड वाणीला लोक आकर्षित होऊन चुकीची शिकवण | आत्मसात करतात. आरोग्य दानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. पवित्र शास्त्राची शिकवण चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडली जात आहे. पवित्र शास्त्राला त्यांच्या गरजेपुरता चुकीच्या रितीने वापरले जात आहे. मरीया भक्ती व संताच्या मध्यस्थीविषयी गैरसमज पसरविले जात आहेत. आपली साधी माणसे सहज अशा प्रवृत्तींना बळी पडतात आणि त्याचा मार्ग विसरतात. प्रभू येशूख्रिस्तावरील आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी आणि ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहण्यासाठी पवित्र आत्म्याठायी प्रार्थना करूया.

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यापासून आमचा कधी ही वियोग होऊ नये म्हणून तुझ्या संरक्षक पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या