Marathi Bible Reading | Monday 21st November 2022 | 34th Week In Ordinary Time |

सामान्यकाळातील ३४ वा  सप्ताह 

सोमवार  नोव्हेंबर २०२२

पाहा, माझी आई व माझे भाऊ ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छे- प्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.



धन्य कुमारी मरियेचे समर्पण

कॅथोलिक पंथातील एका रूढ परंपरेनुसार धन्य कुमारी मरिया हिचे आईवडील संत ज्योकिम व संत आन्ना ( सण २६ जुलै) ह्यांनी बाळ मरियेला वयाच्या तिसऱ्या वर्षी येरुशलेम मंदिरात आणले. नाझरेथ ते येरुशलेम हे अंतर किमान ८० मैलांचे आहे. हे अंतर पायी चालून त्यांनी आपली कन्या देवाला आर्पण केली. तिथे पवित्र स्त्रियांच्या सहवासात तिचे धार्मिक शिक्षण व्हावे म्हणून देवाच्या सेवेशी आपले जीवन वाहिलेल्या इतर मुलांमध्ये तिला ठेवण्यात आले. आपल्या म्हातारपणी झालेले हे नवसाचे बाळ त्यांनी देवालाच समर्पित केले.

हा समर्पण सोहळा सिरिया येथून साजरा करण्यात येऊ लागला. पुढे पोप महाशय अविग्रॉन येथे असताना तो पाश्चात्य ख्रिस्तसभेमध्येही पसरला.सर्व ऐहिक गोष्टींपासून दूर राहून आपण प. मरियेचे अनुकरण करावे असे आवाहन संत अल्फान्सोस ह्यांनी केलेले आहे. आपल्या पालकांपासूनही दूर राहण्याचा प्रसंग आला तरीही आपण मरियेप्रमाणे संपूर्णत: स्वत:ला देवास सादर करण्यास तयार असावे.

चिंतन : मातेने केलेल्या शारीरिक त्यागामुळे पुत्र शरीर धारण करून तिच्याठायी राहिला. तो तिच्या प्रार्थनांना उत्तर देण्यास तत्पर असतो. संत थिओफिलस.साभार: संत सहवास भाग-२

पवित्र मरियेने जसे प्रार्थनेला व देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले व ती समर्पित जीवन जगली, तसेच तिचे अनुकरण करावे व परमेश्वराठायी समर्पित जीवन जगावे, तसेच प्रार्थनेची व सद्गुणांची ओढ आपणास लागावी म्हणून प्रयत्नशील बनू या. पवित्र मरियेच्या गुणांचे अनुकरण करु या.


पहिले वाचन : जखऱ्या : २:१०-१३

वाचक :  जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन

"हे सीयोनकन्ये, उल्हास कर, कारण मी येत आहे."

हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यांत वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसांत बहुत राष्ट्र परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायीं वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुजकडे पाठविलें आहे. परमेश्वर पवित्र भूमींतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुनः यरुशलेम निवडील. सर्व मनुष्यहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासांतून उठला आहे.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


मरीयेचें स्तोत्र १:४६-५५

प्रतिसाद : माझा जीव प्रभूला थोर मानितो.

१) माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या मुळे माझा आत्मा उल्हास आहे; कारण 'त्याने आपल्या 'दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढया मला धन्य म्हणतील 

२) कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्ये केली आहेत: आणि त्याचें नांव पवित्र आहे. आणि जे 'त्याचे भय धरितात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या आहे." 

३) त्याने आपल्या 'बाहुने पराक्रम केला आहे; जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने 'गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे 'त्याने अधिपतींस' राजासनांवरून 'ओढून काढिले आहे' व 'दीनांस उंच केले आहे.''

४) त्यानें भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनीं तृप्त केले आहे, व 'धनवानांस रिकामें लावून दिले आहे.आपल्या पूर्वजांस त्याने सांगितलें त्याप्रमाणे अब्राहाम व त्याचें 'संतान ह्यांच्यावरील दया' सर्वकाळ 'स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.


जयघोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय १२:४६-५०

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 

मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असतां पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हां कोणीएकानें त्याला सांगितलें, पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणांबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हां त्यानें सांगणाऱ्याला उत्तर दिलें, कोण माझी आई व कोण माझे भाऊ ?आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पाहा, माझी आई व माझे भाऊ ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छे- प्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

चिंतन :  आज आपण धन्यकुमारी मरियेच्या मंदिरातील समर्पणाचा सण साजरा करीत आहोत. ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीनुसार धन्यकुमारी मरीयेला तिच्या आई-वडिलांनी देवाच्या सेवेसाठी तिचे समर्पण देवमंदिरात केले होते. बालवयात तिला स्वतःला प्रभूची दासी मानण्यात धन्यता वाटत असे. तारण प्राप्तीच्या योजनेत परमेश्वराने मरियेची निवड तिच्या गर्भधारणापासूनच केली होती. मरियेचे जीवन सुरुवातीपासूनच पवित्र, निष्कलंक व देवावरील अपार भक्तीने भरलेले होते. मूळपापाच्या कलंकापासून परमेश्वराने तिला राखून ठेवले होते। आणि देव कृपेच्या देणगीद्वारे तिला इतर स्त्री मनुष्यांपेक्षा अधिक परिपूर्ण केले होते. येशू ख्रिस्ताची आई बनण्यासाठी कुमारी मरियेने दिलेला होकार म्हणजेच तिने संपूर्ण जीवन देवाठायी समर्पित केले होते. नम्रता, सेवा, आज्ञाधारकपणा आणि आत्मत्याग करून पवित्र मरियेने आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केले होते. कुमारी मरियेचे उदाहरण आपल्या समोर ठेवून देवाची इच्छा प्रमाण मानण्यात आणि त्याप्रमाणे आपले जीवन अनुसरण्याचे परमेश्वराची कृपा आपण मागू या.

प्रार्थना : हे पवित्र मरियामाते, प्रार्थना करण्यास व पवित्रतेने जीवन जगून सेवा करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी विनंती कर,आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन ! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या